पुन्हा एकदा हबल ट्रबल

युवा विवेक    12-Jul-2021   
Total Views |

trouble_1  H x
विश्वातील अनेक गूढ रहस्यांचे शोध घेणाऱ्या मानवाच्या 'डोळ्यावर' सध्या गेल्या काही आठवड्यांपासून अनिश्चिततेचे वादळ घोंघावत आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते आणि वैज्ञानिक आपल्या संपूर्ण तांत्रिक क्षमता पणाला लावून ते नीट पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित हा लेख लिहीला जाईल, तोवर त्यावर उपाय सापडेल अशी आशा आहे. हे डोळे म्हणजेच "हबल दुर्बीण". नुकतंच नासाने ४ जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिवसाचं निमित्त साधत हबलने वेध घेतलेला एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. असं म्हटलं जातं की, "हबलने वेध घेतलेल्या प्रतिमांनी जगातील कॉम्पुटरच्या डेस्कटॉपची जितकी जागा व्यापली आहे, तितकी कोणालाच व्यापता आलेली नाही". तर नक्की काय आहे या प्रतिमेत? आणि हबल दुर्बिणीला नक्की काय झालं आहे? हे समजून घेऊ.
हबलने जी प्रतिमा टिपली आहे, ती अप्रतिम अशी असून विश्वाच्या अनेक रहस्यांना समोर आणणारी आहे. हबलने टिपलेली ही प्रतिमा तब्बल १ लाख ८० हजार प्रकाशवर्षं अंतरावरची आहे. याचा अर्थ हा आहे, की ज्यावेळेस प्रतिमा टिपली गेली तो प्रकाश १,८०,००० वर्षांपूर्वी तिथून निघालेला होता. आत्ता कुठे तो पृथ्वीपर्यंत पोहोचलेला आहे. या मती गुंगवणाऱ्या अंतरापेक्षा जे या प्रतिमेत टिपलं गेलं आहे, ते अवाक् करणारं आणि विश्वाची अनेक रहस्यं उलगडणारं असू शकेल असं नासाच्या वैज्ञानिकांचे म्हणणं आहे. तर ही प्रतिमा आहे 'एन.जी.सी. ३३०' या तारकासमूहातील. वर लिहिल्याप्रमाणे हा तारकासमूह तसं १,८०,००० प्रकाशवर्षं आपल्यापासून लांब आहे. ह्या प्रतिमेत ताऱ्यांच्या कारखान्यातून बाहेर पडलेले खूप सारे तारे आपण बघू शकतो. ताऱ्यांचे क्लस्टर किंवा समूह हा ज्या धुळीपासून आणि गॅसपासून बनलेला असतो, त्यातूनच अश्या नवीन ताऱ्यांचा जन्म होत असतो. एकाच तारकासमूहातील अश्या ताऱ्यांचे वय साधारण सारखे असते. या प्रतिमेत जे निळे लाल तारे दिसत आहेत, ते जवळपास एकाचवेळेस जन्माला आले आहेत. नासाने असं म्हटलं आहे,
"This makes them useful natural laboratories for astronomers to learn how stars form and evolve."
मुळातच तारे जन्माला कसे येतात आणि त्यांचं वस्तुमान, त्यांचं आयुष्य आणि त्यांचा शेवट याबद्दल आपल्याला असलेली माहिती तुटपुंजी आहे. एखाद्या ताऱ्याचं संपूर्ण आयुष्य कसं असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो, पण ते तसं का असेल याची फार माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच अश्या प्रतिमांमधून वैज्ञानिकांना अनेक शक्यतांचा अभ्यास करता येतो आणि त्यातून नवीन विज्ञान जन्माला येत असतं. नासाच्या मते,
The first aimed to understand why stars in star clusters appear to evolve differently from stars elsewhere, a peculiarity first observed with Hubble. The second aimed to determine how large stars can be before they become doomed to end their lives in cataclysmic supernova explosions.
अश्या अनेक रहस्यांची उकल करून देणारे मानवाचे डोळे सध्या एका अनिश्चित प्रवासातून जात आहेत. हबलचा आजवरचा प्रवास म्हणजे मानवाच्या तांत्रिक क्षमतेचं आणि त्याच्या प्रगतीचं एक प्रतीक आहे. साधारण १९२३ च्या दशकात अवकाशात दुर्बिण पाठवून त्यातून विश्वाचा वेध घेतला जावा अशी कल्पना मांडली गेली. १९७० च्या दशकात यावर काम सुरू झालं. या दुर्बिणीला अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ 'एडविन हबल' यांचं नाव देण्यात आलं. १९९० मधे हबल दुर्बिणीला पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करण्यात आलं. तेव्हापासून ते आजतागायत हबल दुर्बीण विश्वाचा वेध घेत आहे. ती अजून २०३०- २०४० पर्यंत आपलं काम सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त उपक्रमातून हबल बनवायला त्या वेळेस (१९९०) ४३० कोटी अमेरिकन डॉलरचा खर्च आला. (आज हबल बनवायची झाली तर हा खर्च १००० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल.)
हबल दुर्बिण प्रक्षेपित केल्यानंतर तिचा मुख्य आरसा बनवताना त्रुटी झाल्या होत्या. त्यामुळे हबलकडून येणाऱ्या प्रतिमा सुस्पष्ट येत नव्हत्या. हबल अशी एकमेव दुर्बीण आहे की जिला अवकाशात दुरूस्त करता येईल असं बनवलं गेलं होतं. त्यानुसार गेल्या ३० वर्षांत हबल दुर्बिणीत अनेक गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला गेला आहे. हबलला दुरूस्त करण्यासाठी विशेष मोहिमा आखल्या गेल्या आहेत. अश्या विविध अडचणींतून मार्ग काढत हबल दुर्बिणीने मानवाच्या विश्वाबद्दल असलेल्या दृष्टिकोनाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.
१३ जून २०२१ ला हबल दुर्बिणीवरच्या कॉम्प्युटरने काम करणं अचानक बंद केलं. हा कॉम्प्युटर १९८० च्या दशकात बनवला गेला आहे. ज्याप्रमाणे कॉम्प्युटरच्या सिस्टीममध्ये गडबडी लक्षात येताच आपला लॅपटॉप अथवा डेस्कटॉप 'सेफ मोड' मधे जातो, त्याप्रमाणे हबलचा कॉम्प्युटर हा सेफ मोड वर गेला. याचा अर्थ दुर्बिणीने काम करणं बंद केलं असा नाही तर त्यावर असलेली कोणतीच वैज्ञानिक उपकरणे आता काम करू शकणार नाहीत किंवा मिळालेल्या माहितीचं वैज्ञानिक अवलोकन आता शक्य होणार नाही. आपण जे घरात कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्यावर पहिली गोष्ट करतो, तीच नासाने आत्तापर्यंत ३-४ वेळा केली आहे. ती गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरला पूर्णपणे बंद करून पुन्हा सुरू करणं. पण तरीही आलेला बिघाड दुरुस्त करण्यात नासाला अपयश आलं आहे. त्यानंतर नासाने हबल दुर्बिणीचा बॅक अप कॉम्प्युटर सुरू करण्याचा प्रयत्न केला. हा कॉम्प्युटर गेली १२ वर्षं निद्रावस्थेत आहे. याआधी त्या कॉम्प्युटरला पृथ्वीवर असताना चालू केलं गेलं होतं. त्याला चालू केल्यावरही सिस्टीम चालू झाली नाही. एकाचवेळी दोन्ही कॉम्प्युटर नादुरुस्त होणं नासाच्या दृष्टीने अनाकलनीय आहे. त्यामुळेच हबलचं भविष्य काय असेल यावर सध्यातरी टांगती तलवार आहे.
१९९० मध्ये प्रक्षेपित केल्यापासून हबलने आजवर १५ लाख विश्वाच्या प्रतिमा घेतलेल्या आहेत. ज्यातून विश्वाचे स्तिमित करणारे अंतरंग तिने टिपले आहेत. २००९ मधे हबलला शेवटचं दुरुस्त करण्यात आलं होतं. हबलची दुर्बीण आणि त्यावरील वैज्ञानिक उपकरणं आज चांगल्या स्थितीत आहेत. जर का नासाचे वैज्ञानिक आणि अभियंते हा दोष दूर करण्यात यशस्वी झाले, तर हबल अजून कित्येक वर्षं विश्वाची अनेक रहस्यं उलगडत राहील.
फोटो स्त्रोत :- गुगल , नासा
१) हबल दुर्बिणीने टिपलेली 'एन.जी.सी. ३३०' या तारकासमूहातील १,८०,००० वर्षांपूर्वीची प्रतिमा.
२) २००९ साली हबल दुर्बिणीला अवकाशात दुरुस्त करताना अमेरिकन अंतराळयात्री मायकल गुड