संध्याछाया....

युवा विवेक    13-Jul-2021   
Total Views |

shadow_1  H x W 
जवळजवळ दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट! मी एका सेल्स कंपनीत काम करत होतो. कामाच्या निमित्ताने पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत असायचो. विविध प्रकारच्या लोकांना भेटायचो. संध्याकाळच्या वेळी खूपदा एक दृश्य हमखास बघायला मिळायचं. एखाद्या मोठ्या बंगल्याच्या किंवा टुमदार घराच्या समोरच्या बागेत कोणीतरी वृद्ध व्यक्ती एकटीच खुर्ची टाकून बसलेली असायची. अंगात स्वच्छ कुर्ता-पायजमा, समोर टीपॉयवर चहाची किटली आणि कप,कधी हातात पेपर तर कधी नुसतीच घडी घालून टीपॉयवर ठेवलेली सुरळी..... दारावर नावाची चकचकीत पितळी पाटी.... नावापुढे डिग्र्यांची यादी.... कधी निवृत्त मिलिटरी अधिकारी, कधी शासकीय सेवक तर, कधी प्राध्यापक.... कधी वेळ असलाच तर, मी अशा लोकांकडे पाहत उभा राहायचो, क्वचित कधीतरी आत जाऊन त्यांच्याशी बोलायचा प्रयत्नही करायचो..... त्यांच्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यातही एक विचित्र अलिप्तता सतत जाणवत राहायची.
अनोळखी माणसाबद्दलचा अविश्वास, एकांताचा भंग केल्याची नाराजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बराच वेळ शांत बसल्यावर एकदम कोणीतरी बोलायला लावल्यावर होणारा त्रागा, हे सगळं थोड्याफार प्रमाणात कधी थेट तर कधी आडून आडून दिसत राहायचं. काही लोक आस्थेनं बसवूनही घ्यायचे, चहा द्यायचे, जुजबी चौकशी करायचे, गप्पाही मारायचे आणि निघायची वेळ झाली की चेहऱ्यावरची निराशा लपवायचा प्रयत्नसुद्धा करायचे..... ही सगळी माणसं साठी-पासष्टीच्या पुढची असायची.... विशेष म्हणजे त्यांच्यात पुरुषमंडळींची संख्या जास्त असायची.
हे सगळं बघताना, त्यांच्याशी बोलताना नेहमी प्रश्न पडायचा, कशी जगत असतील ही माणसं? काहींचे साथीदार संसार अर्ध्यावर टाकून अनंतात गेलेले, काहींची मुलं परदेशात, मुली सासरी.... घरात असलाच तर एखादा नोकर किंवा लाडका कुत्रा! काही लोक मुलाचं किंवा नातवाचं कौतुक सांगावं, तसं आपल्या कुत्र्याबद्दल बोलायचे. मला नेहमी वाटायचं, यांची नातवंडं असतील का? कुठं असतील? कशी असतील? त्यावेळी आजच्याइतकं व्हिडिओ कॉलचं पेव फुटलेलं नव्हतं. फार थोड्या वृध्द माणसांना इमेल्स किंवा फेसबुक ऑपरेट करता यायचं, पण नातवाच्या गालाचा मुका इमेलवरून कसा घेणार? मुलाला फेसबुकवरून मिठी कशी मारणार? ऑर्कुटवरून सुनेच्या डोक्यावर हात कसा ठेवणार? असे कितीतरी उत्तरं नसलेले प्रश्न घेऊन ही मंडळी दिवसचे दिवस ढकलत असतील...
संसार, पैसा, लोन्स, इन्क्रिमेंट, मुलं, त्यांची शिक्षणं, नोकऱ्या, लग्नं आणि आता जगू म्हणता म्हणता हुश्श वाटावं तर गुढगे वाजायला लागलेले नाहीतर आयुष्यभराची सोबतच कायमची हरवून गेलेली..... जन्मभर काडी काडी जोडून उभं केलेलं घरसुद्धा अशा वेळी चिमणीच्या घरट्याइतकं लहान वाटायला लागतं. मुलगी मायेनं म्हणतही असेल, या माझ्याकडे राहायला, मुलगा रोज परदेशातून विचारतही असेल, येताय का इथं, मी पाठवतो तिकीट, पण आता, या टप्प्यावर स्वतःची सोबत तर हवी असते, पण एकांताचा सहवास नकोसा वाटतो.
कधी कधी भरल्या घरातूनही असे खूप लोक बघायला मिळतात. जुन्या झालेल्या वाड्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडून मुलगा-सुनेनं नवीन घर घेतलेलं असतं. आपल्या आईला, वडिलांना निवांतपणा वाटावा, म्हणून सगळ्या सोयी-सुविधा अतिशय नेटकेपणानं केलेल्या असतात, पण त्या आरामातही जीव घाबरा होतो. एखादं झाड मुळापासून उपटून दुसरीकडे लावलं, म्हणून कितीही सुपीक माती असली तरी ते रुजेल का? नाही रुजणार....
माणसाचंही तसंच असतं ना.... भिंतींवरच्या आठवणी ओढ लावत असतात, ओसरीवरचा झोपाळा कानात करकरत राहतो रात्रभर आणि कुठल्यातरी जुन्या सुहृदाच्या आठवणीनं डोळे भरून येतात. अशा वेळी डोळे पुसायला आपलंसं कोणीतरी लागतंच ना जवळ.....
दोष कोणाचाच नाही, असेलच तर निसर्गानं दिलेल्या वृद्धत्व नावाच्या अटळ कालगतीचा..... तारुण्याची ओढ सगळ्यांनाच असते, वृद्धत्व मात्र कोणीच आपण होऊन मागत नाही..... ते येतंच.... कधी संध्याकाळची पाखरं होऊन येतं, कधी दिवेलागणीचा गडद अंधार होऊन येतं तर कधी सकाळच्या हास्यक्लबमधल्या आनंदाच्या लहरी घेऊनही येतं. कधी तरी दुपारचे रमीचे अड्डेही पडतात, सहली निघतात, गाण्याच्या भेंड्या, भिशी, सत्संग, काही ना काही सुरु असतं.... एकटेपणाला दूर ठेवण्यासाठी काहीतरी सुरू ठेवत राहावंच लागतं..... पण तरीही.... तो चोरपावलांनी येतोच..... संध्याकाळी बागेत चहाच्या कपातून, वाफाळत्या किटलीच्या नळीतून, लाडक्या कुत्र्याच्या चाटण्यातून, निरभ्र आकाशातून आणि घराभिरी परतणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांमधून.... तो येतोच....
उन्हं उतरत जातात तशा सावल्याही लांबलचक वाटायला लागतात. अशा कितीतरी सावल्या आपल्या आजूबाजूला माणसांच्या रुपात वावरत असतात. एखाद्या उबदार मिठीची वाट बघत..... इतकं तर आपण करूच शकतो ना....
- अक्षय संत