जगणं समजावून सांगणारा लोभस 'जून'

युवा विवेक    22-Jul-2021   
Total Views |

june_1  H x W:
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतल्या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेला मराठी चित्रपट 'जून' नुकताच 'प्लॅनेट मराठी' या मराठी 'ओटीटी प्लॅटफॉर्म'वर प्रदर्शित झाला आहे. तो का पाहावा, याचं एकच कारण सांगता येत नाही. ‘जून' इंटेन्स आहे. अस्वस्थ करणारा आहे. एखाद्या सुंदर, धीरगंभीर कवितेसारखा उत्कट आहे, पण तो डोकी भडकवत नाही. यातली अंगावर येणारी दृश्यं पाहताना मनात नेमकं काय दाटून येतं, ते सांगणं कठीण आहे. आत्महत्या, आत्महत्येचे विचार मनात येणं, आत्महत्या करण्याचे प्रयत्न, औदासिन्य, समवयस्कांकडून होणारी छळवणूक हे विषय आजवर मराठी चित्रपटांतून हाताळले गेले नाहीत, असंही अजिबात नाही. तरीही हा चित्रपट वेगळा ठरतो. तो कुठेही 'कासव'चं एक्सटेन्शन वाटत नाही. तो थेट घुसतो आणि वार करून निघून जातो. यातली पात्रं हळवी आहेत. स्वत:ची चूक मान्य करणारी आहेत आणि त्यामुळेच ग्रेट आहेत.
नील पुण्यात राहून इंजिनीअरिंग शिकतो आहे. त्याला 'ड्रॉप' लागला आहे, म्हणून तो घरी औरंगाबादला परत आलाय. नेहा स्वतःचं वेगळं 'इमोशनल बॅगेज' घेऊन जगते आहे. आपल्या नवऱ्याचं - अभिजीतचं - जगणं, बालपण समजून घेण्यासाठी ती औरंगाबादला आली आहे. या दोघांची भेट होते आणि नेहाला औरंगाबाद फिरवून आणण्याच्या निमित्ताने त्यांच्या गप्पा होतात. मैत्री होते. इतर कुणाला न सांगितलेली, मनात सलणारी गुपितं ते एकमेकांशी शेअर करतात आणि पाणी वाहतं होतं. भवतालच्या गोंधळात या दोघांनाही आपलं चुकतंय कुठेतरी, हे कळतं. भूतकाळातल्या चुकांचं वर्तुळ पूर्ण करण्यासाठी कुठलंही स्पष्टीकरण न देता नील आणि नेहा माफी मागतात, स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतात आणि त्यातून मुक्त होऊन पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडणारा पाऊस जुनं सगळं धुवून काढतो, मे महिन्यातल्या रखरखीत उन्हाला जून कवेत घेऊन शांत करतो, तसाच नील आणि नेहाचा, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या जवळच्या माणसांशी असलेल्या नातेसंबंधांचा प्रवास आहे. या अनुषंगाने चित्रपटाचं 'जून' हे शीर्षकही योग्य वाटतं.
जागतिकीकरणाच्या रेट्यात तरुणांचे प्रश्न बदलले. आधुनिक तंत्रज्ञान जितक्या वेगाने शहरांपर्यंत पोहोचत होतं, त्या वेगाने ते खेड्यापाड्यांत पोहोचलं नाही. त्यामुळे तरुण वर्गातही एक भौगोलिक दरी निर्माण झाली. सामाजिक माध्यमांची लाट आली आणि त्यातून ही दरी अधिकच रुंदावत गेली. भोवळ येईल इतक्या वेगाने आसपासचं जग बदलत गेलं आणि त्याच्याशी ज्यांना जुळवून घेता आलं नाही, त्यांना नैराश्याने ग्रासलं. म्हणूनच नील आणि नेहाचं फ्रस्ट्रेशन हे आजच्या पिढीला रिलेट करता यावं, इतकं जवळचं आहे. सुखाची, समाधानाची चुकीची व्याख्या माध्यमांनी नव्या पिढीच्या गळी उतरवली आणि गॅजेट्स जवळ असणं, छानछोकीचे कपडे घालणं म्हणजे आधुनिकता, अशा भ्रमात अनेकजण राहू लागले. या सगळ्याच्या मागे जीव तोडून पळताना आपण काहीतरी महत्त्वाचं गमावत आहोत, याचंही भान कित्येकांना उरलं नाही. जे प्रामाणिकपणे जगत राहिले, त्यांच्या जगण्याची या भवतालच्या रेट्याने साधी दखलही घेतली नाही कधी. 'जून'मधल्या मोरेश्वरसारखी अशी पात्रं आपल्या आजूबाजूला सहज दिसतात. फार उशीर होण्यापूर्वी आपण फक्त डोळे उघडून नीट पाहायला हवं.
'जून'मधली दुसरी पिढी आहे नीलच्या आईबाबांची. या पिढीचं सगळं आयुष्य आपल्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी जुळवून घेण्यात गेलं आहे. आपल्या मुलांना सर्व सुखसोयी पुरवूनही ती आयुष्यात यशस्वी होत नाहीत, हे या पिढीचं दुःख आहे. नीलच्या गर्लफ्रेंडचे - निकीचे - आईवडीलही याच पिढीचे प्रतिनिधी. तिने लग्न करून मोकळं व्हावं, या विचारांचे. या पिढीने सरळसोट आयुष्य जगण्यात धन्यता मानलेली आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या पिढीचे प्रश्न इतके गुंतागुंतीचे का, हेच त्यांना कळत नाहीये. तरीही ते त्यांच्या परीने ते प्रश्न समजून घेऊन मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलांशी संवाद साधता येत नाही, म्हणून ही पिढी खलनायकी ठरत नाही. मात्र या पिढीत जयस्वाल आणि कॉलनीमधल्या इतर म्हाताऱ्या माणसांसारखी खरी खलनायकी प्रवृत्तीची आडमुठी माणसंही आहेत, जी सगळ्या समाजाचे संस्कार म्हणजे स्वतःची मक्तेदारी असल्याप्रमाणे उजळ माथ्याने वावरतात आणि त्यांच्या घरात मात्र वेगळंच चित्र दिसतं.
निखिल महाजन यांनी केलेलं या चित्रपटाचं नेमकं लेखन आणि सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांचं सफाईदार दिग्दर्शन ही अर्थातच या चित्रपटाची जमेची बाजू. आजच्या पिढीच्या प्रश्नांचा वेध घेताना चित्रपट कुठेही प्रचारकी होत नाही. 'हीलिंग इज ब्युटीफुल' म्हणत एका शांत वळणावर तो संपतो. चित्रपटाचे संवाद सूचक आहेत. नेहाने नीलला पत्ता विचारल्यावर तो सांगून निघून जातो. मात्र, ती चुकते. नंतर तो भेटल्यावर त्याला ती दटावते, तेव्हा नील म्हणतो, "कुठे थांबायचं, हे तुम्हांलाच कळलं नाही." या वाक्याचा संदर्भ पुढे येणाऱ्या घटनांशी जोडलेला आहे. नेहाच्या सहवासात नील बदलत जातो आणि नीलच्या मैत्रीतून नेहाला अभिजीतच्या वागण्याची मुळं गवसू लागतात. या दोन अनोळखी व्यक्ती एकाच दुःखाने एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे नीलच्या खांदयावर नेहा विसावते आणि पार्श्वभूमीला सगळं औरंगाबाद शहर दिसतं, तेव्हा शहरयार यांच्या "सीने में जलन आँखों में तुफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है" या ओळींची सहज आठवण होते. कैस वासीक यांच्या कॅमेऱ्याने टिपलेलं औरंगाबाद शहर सुंदर आहे. मात्र ते नील आणि नेहाच्या नजरेतून दिसत असल्यामुळे कसल्यातरी अनाम अस्वस्थतेची, घुसमटीचीही जाणीव करून देत राहतं.
सिद्धार्थ मेननचा नील डोकं भंजाळून सोडतो. नेहा पेंडसेची नेहा शांत, संयत, तरी स्वाभिमानी आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो किरण करमरकर यांनी साकारलेल्या नीलच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचा. आजच्या कोणत्याही तरुण-तरुणीला या पात्रात आपल्या वडिलांना शोधता येईल, इतकी ही व्यक्तिरेखा त्यांनी सुंदररीत्या साकारली आहे. स्नेहा रायकर यांनी साकारलेली मालिकांमध्ये गुंतलेली आईही उत्तम. सौरभ पचौरीचा प्रितेश गोड आहे. नीलला समजून घेणारा मित्र त्याने खूप समंजसपणे साकारला आहे. जितेंद्र जोशी, संस्कृती बालगुडे लहान भूमिकांतही आपली छाप सोडून जातात. नवोदित रेशम श्रीवर्धन हिनेही निकीच्या व्यक्तिरेखेचा प्रवास सुंदर टिपला आहे. नीलेश दिवेकर यांचा खलनायकी जयस्वाल लाजवाब. श्याम रजपूत यांची लहानशी भूमिकाही उत्तम. 'बाबा' आणि 'हा वारा' ही दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. थोडक्यात, 'जून' ही एक जमून आलेली उत्तम कलाकृती आहे. चांगल्या मराठी चित्रपटांच्या शोधात वणवण भटकत असाल, तर या 'जून'च्या पावसात नक्कीच चिंब भिजून घ्या.
- संदेश कुडतरकर.