श्रुतिसंस्कार

युवा विवेक    27-Jul-2021   
Total Views |

cremation_1  H
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी त्यांच्या एका भाषणात बोलता बोलता एक छान शब्द वापरला.... श्रुतीसंस्कार.... खूप दिवस एखाद्या गाण्यासारखा तो शब्द मनात रेंगाळत होता.... श्रुतीसंस्कार म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर आपल्या कानांवर पडणाऱ्या विविध आवाजांचे आपल्यावर होणारे संस्कार..... फार पूर्वीपासून म्हणजे अगदी वेदकाळापासून आपल्या संस्कृतीत श्रुतिसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आपल्या पूजेच्या मंत्रांमध्येही आपण “श्रुतिस्मृती” असा एकत्र उल्लेख करतो. श्रुती आणि स्मृती, अर्थात, नाद आणि त्या नादांशी जोडलेली भावना यांचा फार जवळचा संबंध आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातही अनेक गोष्टी श्रुतीशी, म्हणजे एका अर्थी नादांशीच जोडल्या गेलेल्या आहेत. बघा ना, अगदी महाभारतातही श्रीकृष्णानं सुभद्रेला सांगितलेलं चक्रव्यूहभेदाचं रहस्य तिच्या पोटात असलेला अभिमन्यू ऐकतो, ही गोष्ट आपल्याला लहानपणापासून सांगितली जाते. आज गर्भसंस्कारांमध्येही बाळ पोटात असताना आईनं काही प्रार्थना म्हणणं, प्रसन्न वाटणाऱ्या गोष्टी ऐकणं, यांचा अंतर्भाव असतोच की..... थोडक्यात, हा श्रुतीसंस्कार आपल्या जन्माच्या आधीपासूनच आपल्यात रुजलेला असतो. लहान मूल बोलायच्याही आधी ऐकायला शिकतं. आईवडिलांचे, आजूबाजूच्या विविध गोष्टींचे आवाज कानांत साठवून घेत राहतं आणि त्या त्या आवाजांना विशिष्ट पद्धतीनं प्रतिसाद द्यायला लागतं. कोणताही नवीन आवाज कानांवर पडला की कान टवकारून आवाजाचा कानोसा घ्यायला लागतं. त्यातूनच त्याच्यात श्रुतिसंस्कार रुजत जातो. आणि हळूहळू त्या नादांमधलं 'संगीत' तो टिपायला लागतो.
आपल्याला ठाऊक असलेला, आपल्या जाणिवेच्या पातळीवरचा श्रुतिसंस्कार इथून सुरु होतो. आज आपल्याला खूप लहानपणीचे आवाज फारसे आठवत नाहीत किंवा सवयीनं त्या आवाजांमधलं नाविन्य आपल्याला जाणवत नाही. एखादा आवाज आणि एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांची समीकरणं आपल्या डोक्यात फिट्ट बसलेली असतात. त्यावेळी कुकरच्या शिट्टीचा किंवा अगदी खुळखुळ्याचा आवाजही आपल्याला कोरा वाटायचा, कारण ते समीकरण डोक्यात बसलेलं नव्हतं, पण वय वाढत जातं, तशी आपली आवाजांची आणि पर्यायानं श्रुतीसंस्काराची दुनियाही बदलत जाते. वाघाच्या ओरडण्याला डरकाळी म्हणायचं, हेच आपल्या मनावर इतकं बिंबवलं गेलंय की मांजराच्या आवाजाला आपण डरकाळी म्हणूच शकत नाही.
पण तरीही लहानपणीचे अनेक आवाज मनात निरनिराळ्या आठवणींचे तरंग जागे करत राहतात. चिंचाबोरे विकणाऱ्या माणसाची आरोळी हमखास उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण जागवते. फळ्यावर वाजणाऱ्या खडूचा किंवा घंटेचा आवाज अजूनही आपल्याला शाळेत घेऊन जातो. अजूनही अनेक गावांतली झुंजूमुंजू वासुदेवाच्या भजनानं होते. अशाच असंख्य आवाजांच्या संस्कारांनी व्यक्तिमत्वाचा पिंड दिसामासानं घडत जातो.
भारतीय संगीतातही श्रुतिसंस्कार खूप महत्वाचा घटक मानला जातो. पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्य दिवसरात्र गुरूच्या सहवासात असायचे. गुरूची सेवा करता करता गुरुचं गायनही ऐकायला मिळायचं. मग तेच सूर दिवसभर कानांत घुमत राहायचे आणि गुरुसारखं नाही तरी त्याच्या जवळपास पोहोचण्याइतकं तरी गाण्याचा प्रयत्न शिष्यांकडून आपसूकच व्हायचा. अनेकदा कळत नकळत गुरूच्या गायकीचा प्रभाव शिष्यांच्या संगीतावर झालेला दिसायचा. त्यातही प्रत्येक शिष्याच्या कुवतीनुसार ऐकलेल्या संगीतात काही ना काही नवीन भर पडत जायची. त्यातूनच ‘घराणं’ ही संकल्पना जन्माला आली असावी.
माझ्या लहानपणी आमच्या घरातली सकाळ रेडिओवरच्या बातम्यांनी उगवायची आणि रात्र बेला के फूलच्या गाण्यांबरोबर मावळायची. अगदी लहानपणी रात्रीच्या अंधारात ऐकलेला, एका लयीत चालणारा आईच्या गोष्टीचा आवाज आजही आठवतो. दिवाळीच्या पहाटे रेडिओवर लागणारं किर्तन किंवा घरात पूजा असताना चाललेला तो खर्चातला मंत्रमुग्ध करणारा वेदघोष.... काळानुरूप या सगळ्याशी एक अनामिक नातं जुळत गेलंय माझं.... जाणिवेचं, नेणिवेचं, स्वीकृतीचं आणि संस्कृतीचंसुद्धा....!
शेवटी, संस्कृती म्हणजे तरी काय हो? ऐकू येणाऱ्या आवाजातून अज्ञातनादापर्यंतचा प्रवासच ना..... त्या प्रवासात श्रुतिस्मृतिची साथ लाभली तर जगण्यात काय बहार येते.... फक्त कान आणि मनाचे दरवाजे सतत उघडे ठेवले म्हणजे झालं..... श्रुतिला स्मृतिची जोड आपोआप मिळत जाते आणि त्यातूनच श्रुतिसंस्कार नावाचा चमत्कार जन्माला येतो.... श्रुतिसंस्कार....
अक्षय संत