एक दिवस

युवा विवेक    10-Aug-2021   
Total Views |
एक दिवस

day_1  H x W: 0
तसा तो कोणी फार प्रसिद्ध व्यक्ती नव्हता. अजूनही नाही, मग तरीही त्याची गोष्ट मी का सांगावी आणि तुम्ही तरी का ऐकावीत? कारण एकच.... तो प्रसिद्ध नव्हता; पण एक दिवस त्याला प्रसिद्ध व्हायचं होतं. सगळा अट्टाहास त्यासाठीच तर होता. नाही, तशी सगळी गोष्ट एकदम लक्षात यायची नाही, त्यामुळं जरा सविस्तरच सांगतो.
साधारण वीसएक वर्षांपूर्वी नगरच्या एका शाळेत तो शिकत होता. बऱ्यापैकी नकला करायचा, गाण्याचंही थोडंफार अंग होतं. सकाळी रेडिओवर ऐकलेली अजय देवगण किंवा शाहरुख खानची गाणी मोठ्या झोकात मित्रांना म्हणून दाखवायचा. एक दिवस तर हेडमास्तरांची नक्कल करताना तेच मागून आले आणि अनवस्था प्रसंग ओढवला. पण त्या प्रसंगातूनच हेडमास्तरांचं लक्ष बहुदा त्याच्यावर गेलं असावं, कारण शाळेतल्या एका कलासक्त मास्तरांनी शाळेच्या नाटकात काम करण्यासाठी मुलं हवी असल्याची नोटीस लावली, तेव्हा हेडमास्तरांनी आवर्जून त्याची शिफारस केली. तोही एक नटसम्राट आणि एक संभाजीचं स्वगत पाठ करून ऑडिशनला गेला. त्यानं पाठ केलेलं बऱ्यापैकी सादर केलं, पण त्याचं सिलेक्शन मात्र झालं नाही. त्याच्यापेक्षा कमअस्सल असलेल्या (हे अर्थातच त्याचं मत ) दुसऱ्या एका मुलाला तो रोल देण्यात आला. अगदीच काही नाही म्हणून नाट्यकलेच्या प्रेमापोटी त्यानं बॅकस्टेजची जबाबदारी स्वीकारली.
तालीम सुरू होऊन वीस दिवस झाले, दृष्ट लागण्यासारखं नाटक बसलं आणि प्रयोगाच्या दोन दिवस आधी तो 'कमअस्सल' मुलगा तापानं आडवा झाला. सगळ्यांचं रीतसर धाबं दणाणलं आणि त्याचवेळी आपल्या हिरोचं नशीब फळफळलं. दोन दिवसांच्या तालमीवर त्यानं तो रोल असा काही सादर केला की शाळेतल्या पोरांचीच नव्हे तर हेडमास्तरांचीही शाबासकी मिळवली. झालं.... इथं आपल्या हिरोच्या स्वप्नांना पंख फुटले. त्यातच ते कलासक्त मास्तरांनी हिरोला सुचवायला सुरुवात केली की त्याची खरी जागा पुण्या-मुंबईत आहे.... स्वतःचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला त्यांना आता एक हक्काचा हिरा मिळाला होता. हिरोच्या नशिबाचा हिरा चमकून देण्यासाठी आता ते स्वतः त्या हिऱ्याला पैलू पाडणार होते. हिरो आपल्या धुंदीतच आईवडिलांशी हे सगळं बोलायला गेला तर वडिलांनी वेतानं फोडून काढलं त्याला.... घरच्या किराणा दुकानाला वारस शोधणारे वडील, त्यांना हिरोच्या स्वप्नांचं आभाळ कुठलं हो दिसायला.... पण आता काहीही झालं तरी ऍक्टर व्हायचंच, असं ठरवून हिरोनं दोन शर्ट आणि एक फाटकी जीन्स पिशवीत कोंबली आणि त्या कलासक्त सरांकडून पैसे अन आशीर्वाद घेऊन सरळ मुंबईची बस पकडली. त्या सरांनी घडवलेले काही कलासक्त लोक मुंबईत आधीच येऊन बसले होते. आता हिरोही त्यांच्यात सामील झाला. इथून पुढं त्याच्या आयुष्याचा वेगळाच प्रवास सुरू झाला.... त्याचं नाव होतं, एक दिवस....!
एक दिवस.... एक दिवस असा उगवेल, ज्या दिवशी मी या मुंबईवर आणि लाखो करोडो लोकांच्या मनावर राज्य करेन.... थेट शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये बांद्रा बँडस्टँडवर समुद्राला साक्षी ठेवून त्यानं ही शपथ घेतली. रोज सकाळ संध्याकाळ स्टुडिओच्या चकरा सुरू झाल्या. खिरापत वाटल्यासारखं फोटोजचं वाटप सुरू झालं. ओठांत सिगारेट भिजवून कटिंग चहा पीत कोणाचं कुठं जुळत आलंय, कोण
 कुठं ऑडिशन देतंय, कुठल्या स्टुडिओत कोणाचं शूट सुरू आहे, यासगळ्या गप्पा सुरु झाल्या. सामान्यतः या परिसंवादाचं भरतवाक्य एकच असायचं.... 'साला, एक दिवस हे लोक आपल्या दारात लाईन लावतील, बघ!'
नजरेत झुंजण्याची आग असली ना की डोळ्यांनाही सूर्याचं कोंदण लाभतं. इथं तर अशा पेटलेल्या नजरा गल्लोगल्ली तळपत होत्या. एक दिवसाच्या प्रतीक्षेत! त्यांचा दिवस... ऑडिशन म्हटलं की, त्या नजरेत एक वेगळीच चमक यायची. उधार आणि उद्धार हे आता अंगावरच्या कपड्यांइतके जुने झाले होते, पण रग ओसरली तरी धग कायम होती. त्याच धगीवर शेकत शेकत आयुष्याची दहा वर्षं राखेसारखी उडून गेली.
देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात.. स्वप्नांच्या तुटण्यालाही आवाज नसतो, पण दोन्हींचा तडाखा कधीकधी उभ्या आयुष्याची राखरांगोळी करून जातो. दहा वर्षांनी तो इंचभरही पुढं सरकला नव्हता. हां, आता एखाददुसऱ्या सीरियलमध्ये दिसतो हिरोच्या टोळक्यातला एखादा मित्र किंवा हिरोईनवर लाईन मारणारा गुंड म्हणून.... आता गोरेगावच्या एका खोलीतून बांद्राला एक वन बीएचके घेऊन चौघे जण राहाताहेत. त्यातल्या एकानं सिनेमाधंदा सोडून आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिस सुरू केलीय. दुसरा पृथ्वी थिएटरच्या बाहेर घुटमळत असतो आणि फावल्या वेळात वडिलांनी पाठवलेल्या पैशाची दारू पिऊन नव्या पोरांना 'एक दिवस तुम्ही या मुंबईवर राज्य करणार, बघा' अशी स्वप्नं दाखवत राहतो.... तिसऱ्याची आताच थर्ड असिस्टंटवरून सेकंड असिस्टंट पदावर बढती झालीय आणि आपला हिरो आजही त्या एका दिवसाची वाट पाहत स्टुडिओ ते स्टुडिओ चकरा मारतोय. त्याची खरी जागा कुठं आहे, ते शोधत, पण एक दिवस त्याला ती नक्की सापडेल... एक दिवस....!
- अक्षय संत