हनुमान

युवा विवेक    24-Aug-2021   
Total Views |

हनुमान
hanuman_1  H x

हातातली शस्त्र खाली टाकून वीरासनात बसलेला हतबल अर्जुन. नातं आणि हिंसा यांच्यात दोलायमान झालेल्या या वीर धनुर्धराच्या नजरेला 'न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार,' म्हणणाऱ्या नारायणाचं विराट विश्वरूप पेलणं अवघडच होतं. रक्ताच्या तहानेनं वखवखलेला आपल्याच आप्तेष्टांचा जथा एकीकडे आणि कर्तव्याचा विकारहीन आसूड दुसरीकडे. तहानेला आणि विकाराला डोळे नसतात, मग नजरेचा प्रश्नच संभवत नाही..... त्यामुळेच श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असताना सगळं ब्रह्मांडच काही काळ स्तब्ध झालं होतं. त्या स्तब्धतेचंच एक छोटंसं रूप कृष्णानं आपल्या विश्वरूपात अर्जुनासमोर ठेवलं..... बिचारा अर्जुन.... आधीच मोहमायेनं ग्रासलेला तो वीरात्मा अजून झाकोळला..... कोषात गेला...... गोंधळला. धगधगत्या ज्वालांवर एकदम पाण्याचा शिडकावा येऊन पडावा तशी अवस्था झाली त्याची 'कर्माणुबंधिनी मनुष्यलोके' हे तत्वज्ञान किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाच्या वीरत्वाला एक वेगळी दिशा देऊन गेलं खरं, पण त्यानं पुढे झालेला अनर्थ टळला नाही, किंबहुना ऐन युद्धात शस्त्र खाली ठेवल्यानं युद्ध थांबत नाही, नियतीचा पट बदलत नाही, या चिरंतन सत्याला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली. हे सगळं घडत असताना तिथे अजूनही कोणी तरी होतं.

शक्तीरुप, भक्तीरूप, ना नर ना वानर असा विरक्तीरूप असा तो! श्रीकृष्णाच्या विराट रूपानं अर्जुनाला भस्म करू नये म्हणून, नारायणाच्या अस्तित्वानं रथ एकाच बाजूला झुकू नये म्हणून आणि अर्थातच युद्धात पुन्हा एकदा अर्जुन खचू नये म्हणूनही. तो तिथे कुठून आला होता, हा प्रश्न संपूर्ण महाभारतात अनुत्तरीत राहिलाय, तेव्हाच नेमका कसा आला, याचंही उत्तर कदाचित दिलं गेलं नसावं..... युध्द संपल्यावर तो कुठे गेला, कोणालाच माहिती नाही. पण ते विशाल, प्रलयंकारी युद्ध संपेस्तोवर त्यानं आपलं स्थान रेसभरही सोडलं नाही. त्यानं हाती शस्त्र घेऊनही ते खाली ठेवलं नाही आणि त्या शस्त्रानं कोणावर वारही केला नाही...... तो नीती नव्हता, तो बुद्ध नव्हता, तो वीर असूनही युद्ध नव्हता.... रणसंग्राम संपल्यावर श्रीकृष्णानं अर्जुनाला आधी रथातून खाली उतरायला लावलं आणि मग स्वत: कृष्ण खाली उतरला..... कृष्ण उतरताच रथाची जळून राख झाली, तेव्हाही कदाचित तो होताच तिथे कदाचित त्यानंच रथाला अग्नी दिलाही असेल. त्यानं गीता ऐकली.... गीतेतला प्रत्येक शब्द त्यानं प्रसादासारखा ग्रहण केला..... संयमित वीरत्व त्यानं रामरूपात पाहिलंच होतं, कर्तव्यबुद्धीने मांडलेला युद्धपट त्यानं श्रीकृष्णरुपात जाणला.

आज विचार येतो, तो नसता तर?? हिंसा आणि कर्तव्याचा हा लढा अजून किती वर्षं, किती युगं असाच सुरु राहिला असता? तो नसता तर अर्जुनाचा तो रथ पुढे सरकू शकला असता का? मुळात, विश्वरूप दर्शनानंतर अर्जुन जिवंत तरी राहिला असता का? संपूर्ण विश्व स्तब्ध झाल्यावरही, त्यातला अफाट ऊर्जेचा स्त्रोत एकाच ठायी एकवटल्यावरही भगवंतानं सांगितलेलं विश्वाचं सार अर्जुनाला झेपलं, कारण त्या स्तब्ध क्षणांची उर्जा पेलून धरणारा तो होता..... जेव्हा जेव्हा, जिथे जिथे धर्माधर्माचा लढा होईल, अराजक माजेल, सारं काही उध्वस्त होण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा, तिथे तिथे संभवामी युगे युगे म्हणत भगवान येईलच, पण एकटा येणार नाही..... तोही असेल भगवानांबरोबर..... तो हाती शस्त्र घेईल..... तो वार करणार नाही..... तो महाज्ञानी असेल..... तो गीता सांगणार नाही...... तो भक्त असेल..... तो देव असणार नाही..... तो हनुमंत असेल..... भगवंत असणार नाही..... तो..... हनुमंत......

तो आदि नाही ना अंत

चिरदेहातील भगवंत

दिक्कालातील एक परार्ध

तो चिरंजीव हनुमंत

- अक्षय संत