सहेली रे....

युवा विवेक    31-Aug-2021   
Total Views |

सहेली रे....
kishori amonkar_1 &n

पावसात चिंब भिजणारी ओली दुपार.... ढगांच्या आडून मधूनच डोकावून जाणारा सूर्य.... लांब पसरलेला ओल्या मातीच्या वासाचा एकांत..... आणि तिचा षड्ज..... अनेक वर्षांपासून तिची हीच ओळख मनात घट्ट रुतून बसलीय.... तिच्या सुरांइतकीच खोल रुजलीय ही ओळख आता..... जग भले तिला गानसरस्वतीम्हणू दे, ती आहेच, पण आमच्यासाठी मात्र ती किशोरीताईच.....!!

जितकी आपुलकीची, प्रेमाची तितकीच कडक शिस्तीची आणि तत्वांची..... मोगूबाईंची ही कडक शिस्त तिच्या गाण्यातच नाही तर जगण्यातही काठोकाठ भरून राहिली होती. अगदी रोजच्या रियाजापासून ते मैफलीतल्या अतीव तल्लीनतेपर्यंत गाण्याचे आणि घराण्याचे सगळे कुळधर्म तिनं व्रतस्थपणे जपले. पण तरीही नाठाळ कर्मठपणाचा एकही डाग तिच्या सुरांवर उमटला नाही. आपली आई इतकी मोठी गायिका असताना आणि कुमारांपासून मन्सूर, भीमसेनांपर्यंत प्रत्येक कलावंताबद्दल नितांत आदर असतानाही तिनं कधीच त्यांच्या सावलीत आयता घरोबा केला नाही. जे गायली ते अगदी बावनकशी सोन्यासारखं, नितळ आणि आरस्पानी..... हो, पुलंनी म्हटलंच आहे ना तिच्याबद्दल, “नाव किशोरी असलं तरी तिचं गाणं मात्र प्रौढ आहे....

गाण्याच्या दुनियेत अनेकदा मूळ धर्मापेक्षा कुळधर्माचाच ब्रभ्रा अधिक होताना दिसतो. कोणाच्यातरी नावानं कान पकडून आपलं दुकान चालवताना रसिक प्रेक्षक आपलं संगीत ऐकून स्वतःच्या कानांत कितीदा बोटं घालत असतील, याचं यत्किंचितही भान या स्वघोषित गानसम्राटांना नसतं. मुळात, मैफलीत गाताना सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे श्रोते, याच भावनेनं हे गवशे स्टेजवर येऊन बसतात. आल्याआल्या समोर जमलेल्या गर्दीला एक नेमस्त नमस्कार ठोकला की आपला कार्यभाग संपला, अशा भावातच मैफल रंगवण्याकडे कल असणाऱ्या या संगीतश्रेष्ठींच्या जलशांकडे लोकांनी पाठ फिरवली की गर्दी नसली तरी चालेल, पण दर्दी हवेतहे म्हणायला ते मोकळे होतात.

अशा गायकांच्या गर्दीतून एखादी किशोरीताई, एखादे कुमार गंधर्व किंवा एखाद्याच हिराबाई वेगळ्या ठरतात ते त्यांच्या सिद्धीमुळे..... किशोरीताईनं कधीच कुठल्याच मैफिलीत उगीच दहा वेळा गुरु गुरुकिंवा देव देवकेल्याचं आठवत नाही, पण गायला बसली की प्रत्येक सुराचा दाणा पारखून घ्यावा..... मग तो अवघा रंग एक झालासारखा अजरामर अभंग असेल किंवा सहेला रेसारखं भूप रागातलं तिची हातखंडा बंदिश .... अवघा रंगमध्ये रंगी रंगलावरची तिची एकेक फिरक आजही भल्याभल्यांना अचंबित करते. युट्युबवर तिचा हंसध्वनी रागातला एक अप्रतिम तराणा उपलब्ध आहे. शास्त्रीय संगीतप्रेमींनी आवर्जून ऐकावा आणि तिच्या एकेका स्वरावर अन आलापीवर जीव ओवाळून टाकावा..... तिचा यमन ऐकून तर आमच्या एका मित्रानं अक्षरश: टेपरेकॉर्डरलाच साष्टांग नमस्कार घातला होता.....!

ती गायचीच अशी..... तल्लीन, एकाग्र, निमग्न असल्यासारखी..... तिला गाताना पाहून तिला गानसरस्वतीका म्हणतात, हे लगेचच लक्षात यायचं. सुरांचा आनंद घेऊन गाता आलं नाही तर गाणाराही असुर वाटू लागतो. खरं तर, गळा गातच नसतो, गात असतो तो आत्मा, हे ज्याला कळलं, तो खरा कलाकार, बाकीचे अंगी नाना कला असूनही न-कलाकारच..... या अनुषंगानं बघितलं तर किशोरीताईचं कलाकार म्हणून असलेलं मोठेपण कोणीच नाकारू शकत नाही; पण तरीही..... जग भले तिला गानसरस्वतीम्हणू दे, ती आहेच, पण आमच्यासाठी मात्र ती किशोरीताईच..... आमची जिवाभावाची गानसहेली.... गानसरस्वती किशोरी आमोणकर...!!

- अक्षय संत