बाप्पा मोरया रे

युवा विवेक    17-Sep-2021   
Total Views |

बाप्पा मोरया रे


बाप्पा मोरया रे_1 &n 

गणपती..... चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती.... कुठल्याही शुभकार्यात अग्रपूजेचा मानकरी..... श्रीवेदव्यासांच्या आर्ष आदिम महाभारत काव्याचा लेखनिक आणि आबालवृद्धांचा गणपती बाप्पा...दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस या आद्यदेवतेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो..... मोदकांचा नैवेद्य, आरत्यांचा जल्लोष आणि देखाव्यांचा झगमगाट यांत दहा दिवस कसे निघून जातात, कळतही नाही. खरं तर या दहा दिवसांच्या उत्सवाचा आरंभ जवळजवळ महिनाभर आधीच होतो. श्रीगजाननाच्या सुबक मूर्त्यांनी दुकानं सजायला लागतात. आघाडा, दुर्वा आणिकमलपत्रांची फुलं जागोजागी फुललेली दिसायला लागतात आणि रस्त्यावरून जाता-येताना ढोलताशांचे तडाखे कानांत घुमायला लागतात, तेव्हा नकळतच आतून आवाज येतो, 'गणपती आले वाटतं....' आजकाल तर फेसबुक किंवा व्हॉट्सऍपवर 'मी येतोय'चे फॉरवर्ड्सही फिरू लागलेत. हे सगळं पाहिलं की लहानपणीचे दिवस आठवतात. नारळी पौर्णिमेपासूनच सुरू झालेली गणपतीच्या डेकोरेशनची तयारी, जिलेटीन पेपर्स आणि थर्माकोल्सचं घरात होणारं शुभागमन, रात्ररात्र जागून तयार केलेली आरास, आसपासच्या घरांमधून गौरींच्या नैवेद्यासाठी तयार होणाऱ्या करंज्या आणि चकल्यांचे वास अन संध्याकाळच्यावेळी पावतीपुस्तक घेऊन मंडळाच्या वर्गणीसाठी दारात येणारी मुलं... त्यातही एखाद्या खडूस आजोबांकडून यंदा ५०१ रुपये घेण्याची लागलेली पैज आणि प्रत्यक्षात त्यांनी ५१ रुपये हातावर टिकवल्यावर चरफडत केलेली पावती...गल्लीच्या मध्यावर उभा राहणारा मांडव, त्यावर टाकलेला पडदा आणि जणू काही एखादी गुप्त मसलत चालावी, तशा पद्धतीनं त्या पडद्याआड चाललेली गजाननाच्या आगमनाची आरास.... असं करत बघता बघता हरतालिकेचा दिवस येतो आणि संध्याकाळी गल्लोगल्लीत हातातल्या ताम्हनात रुमालाने झाकलेली बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारी कुटुंबं दिसायला लागतात. मध्येच एका कुटुंबातून कोणीतरी 'गणपती बाप्पा' म्हटलं की दुसरीकडून 'मोरया' असा प्रतिसाद मिळतो. ओळख नसली म्हणून काय झालं, बाप्पा हीच ओळख अशा वेळी पुरते.... बाप्पा घरी येऊन मखरात बसले तरी दुसऱ्या दिवशीची तयारी काय संपत नाही.... दुर्वांच्या जुड्या बांधून ठेवणं, फुलं नीट लावून ठेवणं, पूजेचं सामान बघणं, घरच्या बायकांची दुसऱ्या दिवशीच्या नैवेद्याची लगबग, बाप्पासाठी बनवलेले दागिने बाहेर काढून ठेवणं, एक ना दोन.... त्यात सकाळी लवकर उठायचं म्हणून कितीही लवकर झोपायचं ठरवलं तरी कामं संपत नाहीत आणि कितीही उशिरा झोपलं तरी सकाळी लवकर उठलंच जातं, अहो, बाप्पा घरी आलेत, लोळत पडून कसं चालेल....

आवरून, लगबगीनं सोवळं नेसून पूजेसाठी तयार होईपर्यंत गुरुजी येतातच.... आणि मग धूपदीपाच्या पवित्र वातावरणात आणि वेदमंत्रांच्या घोषात बाप्पाची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली जाते.... गणेशोत्सवातली माझा सगळ्यात आवडती संकल्पना म्हणजे प्राणप्रतिष्ठा.... लहानपणी शाळेत आपण विज्ञानात सजीव-निर्जीव गोष्टींबद्दल शिकतो, पण श्रद्धा आणि अध्यात्म विज्ञानाच्या एक पाऊल पुढं जातं ते या संस्कारात.... मातीच्या निर्जीव मूर्तीत आपल्या शरीरातली चेतना भरून तिला काही काळासाठी सजीवरूप देणं म्हणजेच तिला आपल्या घरातच नाही तर वास्तू आणि अस्तुनस्तुच्या चैतन्यात सामावून घेणं म्हणजे प्राणप्रतिष्ठा.... एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की विसर्जनापर्यंत बाप्पाच्या मूर्तीला जागेवरून हलवायचं नसतं, कारण आपलं चैतन्य तिच्यात आणि तिचं चैतन्य आपल्यात वास करत असतं. चैतन्याची ही अलौकिक देवाणघेवाण समजायला नुसते विज्ञानाचे डोळे असून भागत नाही, तिथं भावाची नजरच हवी....

म्हणूनच की काय, विसर्जनाच्या दिवशी 'पुढच्या वर्षी लवकर या' असं कितीही जोरात म्हटलं तरी डोळे पाणावतातच.... कदाचित, ते पाणी लपवतानाच आवाज आणखी मोठा होतो.... इतके दिवस आपल्याकडे आनंदानं राहिलेल्या, आपल्या ऐपतीनुसार, समजउमजेनुसार आपण केलेला पाहुणचार गोड मानून घेतलेल्या बाप्पाला असा रडका निरोप कसा द्यायचा ना.... बाप्पाची मूर्ती पाण्यावर तोलून धरताना दाटलेला आवंढा नकळत सुटतो आणि प्रवाह पुन्हा प्रवाही होतो....

दिवस सरतात.... महिन्यांची पानं उलटतात आणि पुन्हा एकदा बाप्पांच्या मूर्ती दिसू लागतात, ढोलताशांचे गजर निनादतात, थर्माकोल अन जिलेटीन पेपर्स चमकू लागतात आणि आतून नकळत आवाज ऐकू येतो, 'गणपती आले वाटतं...' गणपती बाप्पा मोरया....

अक्षय