काही महत्त्वाच्या रक्तचाचण्या

युवा विवेक    28-May-2022   
Total Views |

 
blood test

पुन्हा एकदा सर्वांना दिप्तीचा नमस्कार. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिले की जर पचनसंस्था नादुरुस्त असेल आणि त्यामुळे प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर असे कोणते नैसर्गिक आणि घरगुती उपाय आहेत जे आपण घरच्याघरी करून आपली पचनसंस्था सुधारू शकतो.
 

मात्र कधीकधी असे होते की सर्व काही करूनही कसलाच फायदा होत नाही. डाएट करून, व्यायाम करून, detox ड्रिंक्स घेऊनही वजन जैसे थेच राहते. मग साहजिकच अशा वेळी प्रश्न पडतो, की प्रॉब्लेम नक्की काय आहे? सगळं करूनही मेटबॉलिझम का सुधारत नाही? अशा परिस्थितीत एका गोष्टीची जाणीव पूर्णपणे असणे अत्यंत गरजेचे आहे. ती गोष्ट म्हणजे, आरोग्याच्या सर्वच समस्यांची उत्तरे आणि उपाय घरगुती उपचारांमध्ये असतीलच असे नसते! अनेकदा मेडिकल हेल्प घ्यावी लागू शकते. शरीरात असणारे खरे प्रॉब्लेम एखाद्या डॉक्टरला जितक्या चांगल्या प्रकारे समजू शकतात, तितक्या त्या इतर कुणालाही समजू शकत नाहीत. मात्र डॉक्टरसुद्धा अंतर्ज्ञानी नसतात. ते डोळे झाकून कधीही निदान करत नाहीत. कोणत्याही रोगाच्या किंवा समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि परफेक्ट निदान करण्यासाठी ते रुग्णाला काही तपासण्या करायला सांगतात. त्यात काही रक्ताच्या चाचण्या असतात, गरज लागलीच तर एक्सरे आणि स्कॅन सुद्धा सुचवले जाते. या सर्व तापसण्यांद्वारे रोगाचे नीट निदान करून योग्य उपचार देणे शक्य होते. म्हणूनच या सर्व तपासण्या फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही रुग्ण नसलात, तुम्हाला कोणताही त्रास होत नसला तरीही वयाची चाळीशी पार केलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने वर्षभरातून किमान एकदा तरी सर्व रक्त तपासण्या आणि काही महत्त्वाच्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.

 

आता आपण पाहू की या ब्लड टेस्टचा वजन कमी न होण्याशी काय संबंध आहे. जेव्हा सर्व प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही, तेव्हा बिघाड शरीरातील काही महत्त्वाच्या घटकांमध्ये असू शकतो, जो समजणं फार गरजेचे आहे. असे कोणते घटक असतात ज्यात बिघाड झाल्याने वजन नियंत्रणाबाहेर वाढू शकते? कमी करण्यास अपयश मिळू शकते? डाएट आणि व्यायामाचाही परिणाम शून्य दिसू शकतो?

 

१. थायरॉईड

 

हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शरीरातील गळ्याच्या भागात थायरॉईड नावाची एक लहानशी ग्रंथी असते. तिच्यातून थायरोक्झिन नावाचे हार्मोन तयार होत असते. या ग्रंथाच्या कामात बिघाड होऊन जर हार्मोनचे प्रमाण कमी झाले तर त्या अवस्थेला हायपो थायरॉईडीझम असे म्हणतात. म्हणजेच शरीरात थायरोक्झिनचे प्रमाण पुरेसे नसणे. या अवस्थेत वजन अनियंत्रितपणे वाढत जाते. खाणे कमी केले, व्यायाम केला तरीही ते वाढलेले वजन कमी होत नाही. हा प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. विशेषतः गरोदरपणात ही समस्या निर्माण होते आणि डिलिव्हरी नंतरही अनेकदा आटोक्यात येतच नाही! कायम राहते. त्यामुळे अनेक स्त्रियांचे गरोदरपणात वाढलेले वजन मूल होऊन दोन वर्षे झाली तरी कमी न होता उलट वाढतच जाते. परंतु ही समस्या फक्त स्त्रियांमध्येच असते असे नाही. प्रमाण कमी असले तरीही पुरुषांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसतो. म्हणूनच जर तुम्हाला असे वाटले की मर्यादित अन्न सेवन करूनही, व्यायाम करूनही वजन वाढतच चालले आहे तर एकदा थायरॉईडची टेस्ट करवून घेणे उत्तम.

 

२. फॉलिकल स्टीम्युलेटिंग हार्मोन (F S H)

 

दुसऱ्या नंबरवर स्त्रियांमधले हे हार्मोन येते. ज्या स्त्रियांना पीसीओडी असतो त्या स्त्रियांमध्ये या हार्मोनचे प्रमाण बिघडलेले असते. काही प्रमाणापेक्षा खूप अधिक तर कधी खूप कमी अशा दोन्ही अवस्था असू शकतात. ज्यांना पहिल्यांदा पिरियड आल्यानंतर एक दोन वर्षांतच पाळीच्या समस्या सुरू होतात आणि वजन वाढत जाते, त्यांच्या शरीरात हे हार्मोन वाढलेले असते आणि ज्या स्त्रियांचे मेनोपॉजच्या वयाकडे वाटचाल करताना पिरियड चुकू लागतात, दोन पिरियडमध्ये अंतर वाढू लागते, अशा स्त्रियांच्या शरीरात हे हार्मोन कमी झालेले असते. परंतु दोन्हींचा परिणाम मात्र वजनावर एकच होतो, तो म्हणजे वजन वाढत जाते. म्हणूनच तुम्ही स्त्री असाल आणि तुम्हाला पाळीच्या समस्यांसोबत वजनवाढीची समस्या सुद्धा असेल किंवा तुमचे वय चाळीशीच्या पुढे असेल आणि वजन वाढत जात असेल तर एकदा या हार्मोनची टेस्ट करून घ्यावी.

 

३. Estradiol

 

हे हार्मोन शरीरात बिघडले की वजन कमी करण्याच्या सर्वच प्रयत्नांना अपयश येते! अधिक प्रमाणातील मानसिक तणाव, अतिरिक्त शारीरिक कष्ट, एखाद्या घटनेचा मनावर खोलवर झालेला आघात, नैराश्य, डिप्रेशन अशा अवस्थांमध्ये सुद्धा या हार्मोनचे प्रमाण बिघडू शकते. जर तुम्ही वजनवाढीसोबत अशा अवस्थेला तोंड देत असाल तर कृपया ही रक्त चाचणी करवून घ्यावी.

 

४. Serum creatinine

 

किडनीच्या कामाचा आढावा घेणारी ही फार महत्त्वाची टेस्ट आहे. किडन्या जर योग्यप्रकारे कार्यरत नसतील तर शरीरात टॉक्सिन साठत जातात. त्या साठलेल्या टॉक्सिन्सचा परिणाम शरीराच्या पचनशक्तीवर होतो आणि मेटबॉलिझम खराब होते. शिवाय रेंजच्या बाहेर खूपच जास्त प्रमाणात वाढलेले serum creatinine किडनी खराब असल्याचे सुचवते. अर्थात, त्या निदानाप्रत येण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगतात. मात्र ही टेस्ट प्राथमिक समजली जाते. अशा अवस्थेत शरीरात water retention वाढू लागते. अंगावर सूज दिसते. अतिरिक्त पाण्याच्या संचयामुळे वजन फार वेगाने वाढत जाते. जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या दिसून येत असतील तर ही टेस्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.

 
 

या सर्व चाचण्यांव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल, डायबेटीस, या चाचण्या करून घेतल्यास उत्तम! कारण शरीरात नक्की कशाची कमतरता आहे आणि काय अतिरिक्त प्रमाणात आहे हे समजले की डाएट मॅनेज करणे सोपे जाते. शिवाय गरज असल्यास मेडिकल हेल्प, ट्रीटमेंट, मेडिसिन हे सुद्धा उपाय डाएटसोबत करता येतात. त्यामुळे डाएटचा परिणाम सुद्धा सुंदर दिसून येतो.

 

हे झाले रक्त चाचण्यांबद्दल. पुढच्या भागात आपण काही सोप्या व्यायामांबद्दल बोलू, जे तुम्ही घरच्याघरी करू शकता. ज्यासाठी तुम्हाला कोणतेही जिम लावण्याची किंवा साधने विकत घेण्याची गरज नाही. जे व्यायाम स्वतःच शिकून तुम्ही रोज अर्धा तास जरी केले आणि सोबत आहारावर नियंत्रण ठेवले तर दर महिन्याला तुम्ही दोन ते तीन किलो वजन सहज कमी करू शकता.

 

तर भेटूच पुढच्या भागात.

Till then, Stay Healthy, Be Happy

दीप्ती काब्दे

आहार तज्ज्ञ