यशवंत हो गुणवंत हो

युवा विवेक    21-Jun-2022   
Total Views |

यशवंत हो गुणवंत हो


yashwant ho gunwant ho 

नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे कुठल्या भागात किती मुलं-मुली, किती मार्कांनी उत्तीर्ण झाले, याचे रिपोर्ट्स जाहीर झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना कोचिंग देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातींचे फलक झळकले आणि ज्युनिअर कॉलेजेस समोर विद्यार्थी आणि आईवडिलांच्या प्रवेशासाठी रांगा लागलेल्या दिसू लागल्या. या सगळ्या धामधुमीत कळत नकळत मार्कांची तुलनाही व्हायला लागली, जी नेहमीच होताना दिसते. कोण किती टक्क्यांनी पास झालं, यावरून बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि भविष्यातील करिअर या तिन्हींचा अंदाज येणं खरंच शक्य आहे का हो??

 

दहावी आणि बारावी हे आयुष्यात्तील अतिशय महत्वाचे टप्पे. या दोन्ही परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांमधून पुढच्या आयुष्यभराची दिशा ठरते. परंतु, या टप्प्यांना मिळालेलं स्पर्धेचं जीवघेणं कोंदण किती काटेरी आहे, याची प्रचिती दरवर्षीच्या रिझल्टनंतर, लगोलग सुरु होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्यांच्या बातम्यांनी येऊ लागते. आजही अनेक कुटुंबांमध्ये कमी मार्क्स किंवा नापास म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश मानलं जातं. थोडा जास्त अभ्यास करायला काय झालं होतं?’, ’या असल्या मार्कांना कोण विचारणार आहे बाहेर?’ किंवा वर्गात नीट लक्ष दिलं नसशील, त्याचेच परिणाम आहेत हे.असल्या वाक्यांचे घरचे आहेर एखाद्या मुलाचा आत्मविश्वास किती रसातळाला नेत असतात, याची जाणिव होण्यासाठी मुलांचे जीवच जायला हवेत का?, असा प्रश्न पडतो त्या बातम्या ऐकून. मी मुळीच असं म्हणत नाही की, यात सगळी चूक पालकांचीच आहे, पण कुठंतरी आपली मार्क्सवादी किंवा बऱ्याच प्रमाणात पुस्तकी शिक्षणव्यवस्थाही या घटनंना जबाबदार आहेच. भरपूर अभ्यास करूनही केवळ पाठांतरात किंवा घोकंपट्टीत मागे पडलेला एखादा मुलगा किंवा आजूबाजूच्या स्पर्धेत तग धरण्याचं प्रचंड टेन्शन डोक्यावर घेऊन, पेपर्स लिहिणारी एखादी मुलगी, ऐन युद्धात शस्त्र खाली ठेवणाऱ्या अर्जुना इतकीच हतबल होऊ शकते ना? आणि नापास होणं किंवा मार्क्स कमी मिळणं म्हणजे, आयुष्य उध्वस्त होणं असं नाही ना. शालेय परीक्षांमध्ये चमक दाखवू न शकलेली, परंतु शाळेबाहेरच्या जगात आपापल्या क्षेत्रात उत्तुंग शिखरावर असलेली सचिन तेंडुलकर, लता मंगेशकरांपासून अल्बर्ट आईनस्टाईन पर्यंतची असंख्य उदाहरणं आपल्या आसपास आहेत. मग केवळ अभ्यासाला असलेल्या पाठ्यपुस्तकांमधली उत्तरं पाठ करून जशीच्या तशी पेपरमध्ये उतरवून काढणं, हेच हुशारीचं एकमेव लक्षण मानायचं का? एखाद्या मुलाला पाऊस कसा पडतो, याचं क्रमिक पुस्तकात दिलेलं वर्णन पाठ नसेल, पण त्याला पावसाचं सुंदर चित्र रेखाटता येतं किंवा पावसावर छानशी कविता सुचते, तर तो मुलगा ढ आहे, असं का मानायचं? मुळात परीक्षा, मार्क्स, ग्रेडस आणि पास-नापास, एवढंच आयुष्य नाही, त्यापलीकडेही खूप काही आहे, ही जाणीव जितक्या लवकर या मुलामुलींच्या कोवळ्या मनांमध्ये रूजेल, तितके आईनस्टाईन, स्टीव्ह जॉब्ज, सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर या जगाला आपण देऊ शकू. शेवटी काय हो, नुसती उंची मोजायला फूटपट्टी पुरते, मोठेपण बघायचं असेल तर आधी नजर उंच व्हायला हवी, हो ना?

अक्षय संत