राजा माणूस

युवा विवेक    07-Jun-2022   
Total Views |


 
ashok saraf

परवा, ४ जूनला आपल्या सर्वांचे लाडके अशोकमामा, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची पंच्याहत्तरी झाली. जवळजवळ अर्धशतकहून अधिक काळ, आपल्या अभिनयानं अनेक रसिकांना निखळ आनंद देणाऱ्या, या अवलिया कलावंताला ही शब्दरूपी भेट सादर अर्पण.

 

काही ऋणानुबंध वेगळेच असतात.

 

खूपच लहानपणीची आठवण, म्हणजे शाळेच्या दिवसांतली. त्या वेळी सकाळी रेडिओवर ऐकलेली गाणी दिवसभर वर्गातला कोणी ना कोणी दत्तू म्हणत राहायचा. एक दिवस शेजारच्या बाकावर बसलेला मुलगा, असंच एक गाणं दिवसभर गुणगुणत होता. 'प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीम्मा..' अर्थाशी आपल्याला काही देणंघेणं नव्हतं, पण तो 'म्मा'चा ठेका डोक्यात घट्ट रुतला. त्याही आधी, शाळेत जात नव्हतो तेव्हा, बोबड्या आवाजात 'ददू कता तुज्याइना मी नानी द' असं तारस्वरात ओरडत घरभर फिरणं, हा जाम आवडता उद्योग झाला होता. पुन्हा तेच.. कोण हिरो, कोणी गायलं, असलं काहीही ठावूक नव्हतं. पुढं जाऊन जेव्हा ही गाणी पडद्यावर पाहिली (त्या वेळी दर रविवारी संध्याकाळी टी.व्ही.वर मराठी सिनेमा लागायचा, प्लस पुण्यातलं प्रभात टॉकीज एक्सक्लुझिव्हली, मराठी सिनेमांना वाहिलेलं थिएटर होतं.) तेव्हा त्या गाण्यांमधला हिरो दिसला. आडव्या बांध्याचा, काळा आणि नाकाखाली बारीक मिशीची चामखीळ असलेला हा माणूस हिरो वाटलाच नाही हो. तेव्हाही डोळ्यांना त्या काळी नवीनच येत असलेल्या आमिर खान - सलमान खानची सवय होत होती.

 

पण एक मात्र खरं, हा माणूस जाम हसवायचा.... अगदी 'वख्खा विख्खी वूख्खू'पासून 'पहाटे केलेला अभ्यास लक्षात राहतो, तुम्ही केला होता का कधी अभ्यास?' इथपर्यंत त्याच्या विनोदाची रेंज होती. हळूहळू त्याचं नाव अशोक सराफ आहे आणि त्याला प्रेमानं अशोकमामा म्हणतात, ही नवी माहिती मिळाली. जाड्यारड्या, लॉरेलहार्डी यांच्यासारखीच अशोक-लक्ष्या ही नावं जोडीनंच डोक्यात फिट बसली. या जोडीनं काय केलं असं? अगदी साधं उत्तर आहे. पु.ल. म्हणतात तसं, या माणसांनी आम्हांला हसवलं. नकळत्या वयातून कळतेपणात येताना त्यांच्या विनोदाची गंमत नव्याने कळायला लागली आणि बाजीराव रणगाडे, धनंजय माने, उद्योगभूषण यदुनाथ जवळकर ही माणसं आणखी जवळची वाटायला लागली हो.

 

तुम्ही कलाकार म्हणून एका साच्यात घट्ट झालात की, त्यातून बाहेर पडणं म्हणजे अब्रह्मण्यम् पेक्षाही मोठ्ठं पाप. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हमीदाबाईसारख्या तुमच्या गंभीर नाटकालाही, त्याच काळात दादा कोंडकेंच्या 'पांडू हवालदार'मधल्या तुम्ही केलेल्या रोलचा थोडा फटका बसलाच, पण तेव्हा अशोक सराफ 'द अशोक सराफ' झालेले नसल्याने तुम्ही तुमचा चतुरस्त्र अभिनय वाजवून दाखवलात, पण नंतरच्या काळात तुमच्या या 'इनोदी' इमेजचा परिणाम, तुम्ही साकारलेल्या भस्म, वजीर यांसारख्या सिनेमांतल्या अप्रतिम गंभीर भूमिकांवर झाला. 'हाशिवनाऱ्या इदूषकानं हाशवीतच ऱ्हावं...' या अवास्तव अपेक्षेपायी तुमचे खूप सुंदर रोल्स लोकांनी तेव्हा नाकारले, पण तुम्ही मात्र त्यातूनही कलाकार म्हणून खंबीरपणे उभे राहिलात. मराठी सोबतच कोयला किंवा येस बॉससारख्या सिनेमांमध्ये तुम्हाला पाहून आमची कॉलर अभिमानानं ताठ होत होती. मराठीतला एक अत्यंत ताकदीचा, अजातशत्रू आणि अफाट टॅलेंटेड अभिनेता देशभर ओळखला जातोय, याचं आम्हाला कोण अप्रूप वाटत होतं आणि आजही वाटतं...

 

तुमच्या सिनेमांमधले अविस्मरणीय क्षण, आजही माझ्यासारख्या अनेकांच्या मनात अत्तरांसारखे दरवळतात. 'वाजवा रे वाजवा'मधला तुमचा प्रशांत दामलेंना गाणं शिकवतानाचा सीन, 'एक डाव धोबीपछाड'मधलं 'श्रावणमाशी हर्ष मानशी', 'वजीर'च्या क्लायमॅक्सला तुमचं, डोक्यावरची गांधी टोपी उतरवून खांदे पाडून निमूटपणे निघून जाणं किंवा 'आयत्या घरात घरोबा'मधला सगळ्यांना आनंद देऊन शेवटी आपल्या वाटेनं निघून जाणारा, ठिगळं जोडलेल्या कपड्यांतले गोपुकाका. याद करूं तो हर बात याद आती हैं! असे तुम्हीच आम्हाला दिलेले आणि कधीच न विसरता येणारे हे सुंदर क्षण...

 

तुमचे लाखो फॅन्स तुम्हाला 'मराठीतला अमिताभ' म्हणतात. नाही... तुम्ही आमचे लाडके अशोकमामाच आहात आणि आमच्या मनातली तुमची जागा अमिताभच काय, उद्या वरून देव जरी उतरून खाली आला तरी तोही घेऊ शकत नाही... कारण काही ऋणानुबंध वेगळेच असतात. अशोकमामा, तुम्हाला पंच्याहत्तरीच्या अनेक शुभेच्छा !

 

अक्षय संत