डायबेटिक रुग्णांचा रोजचा आहार

युवा विवेक    23-Jul-2022   
Total Views |

 
diabetic diet

नमस्कार मित्रांनो! पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. मागच्या भागात आपण अशा व्यक्तींच्या डाएटबद्दल बोललो ज्यांना डायबेटीस आहे आणि वजन सुद्धा कमी करायचे आहे. अशांनी डाएट करताना कोणती काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत हे आपण पाहिले. आज मात्र आपण जनरल डायबेटीस रुग्णांच्या आहाराबद्दल बोलू. म्हणजेच असे लोक ज्यांचे वजन योग्य प्रमाणात आहे, परंतु डायबेटीस त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी डाएटच्या माध्यमातून पर्याय हवे आहेत.
 

आपण दोन-तीन भागांच्या आधीच्या भागात डायबेटीस म्हणजे नक्की काय? त्याचे प्रकार कोणते? हे अगदी सविस्तरपणे समजून घेतले होते, त्यामुळे या भागात टेक्निकल गोष्टींमध्ये न जाता, फक्त आहारावर लक्ष केंद्रित करू या. आपल्याला माहितीच आहे की, टाईप दोन प्रकारचा डायबेटीस आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे किंवा अनुवंशिकता असेल तर, अशा दोन प्रमुख कारणांनी होतो. मात्र या दोन्हीपैकी कोणत्याही कारणाने झालेला डायबेटीस आहाराने नियंत्रणात आणता येतो हे सत्य आहे. परंतु सत्य जरी असले तरीही ते सहज आणि सोपे मात्र नक्कीच नाही!

 

मी अनेकदा पाहिले आहे की, डायबेटीसचे रुग्ण आहारातून ठराविक पदार्थ वगळतात. गहू खाणे सोडून देतात, गोड फळे खाणे थांबवतात. मात्र तरीही डायबेटीसची गोळी काही कमी करता येत नाही. याचे कारण म्हणजे अन्नपदार्थ जसे महत्त्वाचे आहेत, काय खावे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते कधी खावे हेही महत्त्वाचे आहे. जर योग्य वेळापत्रक पाळले गेले नाही, तर गहू सोडून किंवा गोड पदार्थ सोडून काहीही फायदा नाही. डायबेटीसबद्दल बोलताना आपण हे शिकलो आहोत की, डायबेटीसमध्ये मेटबॉलिझम मंद झाल्याने पचनाचा वेग मंदावतो. शिवाय इन्सुलिन या संप्रेरकाचा प्रभाव कमी झाल्याने रक्तात उपलब्ध होणाऱ्या साखरेचे वेळेत नियमन न झाल्याने त्याचे रक्तातील प्रमाण वाढते. म्हणजेच सर्वात आधी मेटबॉलिझम सुधारणे गरजेचे आहेच! रक्तातील साखरेचे प्रमाण जर सतत बदलत राहत असेल, कमी जास्त होत राहत असेल तर एक ठाम असे वेळापत्रक रोजच्यारोज पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी किमान ९ वाजण्याआधी सकाळचा ब्रेकफास्ट उरकून घ्यायचा. त्यानंतर दोन ते अडीच तासांनी एखादे निमगोड फळ सेवन करायचे. दुपारचे जेवण १ ते २ वाजण्याच्या दरम्यान उरकून घ्यायचे. संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत काहीतरी हलका नाश्ता घ्यायचा. आणि रात्रीचे जेवण किमान ८ वाजेपर्यंत संपवायचे. हे असे वेळापत्रक ज्यात दर दोन ते तीन तासांनी काही न काही खाद्य आहे, हे डायबेटिक रुग्णांना अत्यंत उपयोगी पडते. याचे कारण म्हणजे, मेटबॉलिझम स्लो न होता सतत सुरू राहिल्याने इन्सुलिनचे काम व्यवस्थित सुरू राहते, त्यात अडथळा येत नाही.

 

आता राहिला प्रश्न की काय खावे आणि काय टाळावे?

 

एक गोष्ट समजून घ्या. प्रत्येक पदार्थात साखर असतेच. फक्त प्रत्येक पदार्थाचा रक्तात साखर उपलब्ध करण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. म्हणजेच पचनाचा वेग वेगवेगळा असतो. ज्याला इंग्रजीत glycemic index असे म्हणतात. हा इंडेक्स जितका कमी तितकी त्या पदार्थातून साखर रक्तात उपलब्ध होण्याचा वेगही कमी आणि प्रमाणही!

 

आता पाहूया असे पदार्थ कसे ओळखावेत. अगदी सोपे आहे. जे पदार्थ नैसर्गिकरित्या कमी गोड असतात, ज्यात फायबर जास्त प्रमाणात असून कर्बोदके कमी असतात असे सर्व पदार्थ low glycemic index असणारे आहेत. उदाहरणार्थ, ज्वारी, नाचणी, सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या, सफरचंद, कलिंगड, बेसन, मुगडाळ, चणे इत्यादी. या पदार्थांचा आहारात जास्त समावेश करून, कार्बोदकांचे सेवन कमी केले आणि आहाराचे वेळापत्रक सांभाळले तर डायबेटीस नियंत्रणात येण्यास मदत होते.

 

अशा low glycemic index असणाऱ्या इतर पदार्थांची यादी तुम्ही गुगलवर सर्च करूनही सहज मिळवू शकता.

फक्त आहारामार्फत डायबेटीस कंट्रोल करणे शक्य तर आहे. मात्र आरंभशूर असून भागणार नाही. अविरतपणे अनेक महिने हा प्रयास न थकता सुरू ठेवला तर नक्कीच अपेक्षित परिणाम साधता येतो. मात्र तेवढा संयम कुणात नसतो... खरं ना?

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ