देवाला…

युवा विवेक    27-Jul-2022   
Total Views |

god
तुला पत्र लिहायला घेतलंय खरं, पण एक गोष्ट आधीच सांगते...मी काही नास्तिक नक्कीच नाही, पण अगदी देवभक्त किंवा देवभोळीही नाही. एक काहीतरी शक्ती म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवते मी. मात्र ते उपासतापास, व्रतवैकल्य वगैरे नित्यनेमाने करणं तर अजिबात जमत नाही मला. जमत नाही म्हणण्यापेक्षा फारशी आवड नाही म्हणून करत नाही असं म्हणेन. एवढंच काय...पण एखाद्या मंदिरात गेले आणि जर मंदिराचं बांधकाम दगडी, देखणं, जुनं असेल तर कधी कधी तुझ्यासमोर हात जोडणं ही विसरुन जाते रे मी. अर्थात तू जिथं असशील तिथून हे बघत असशीलच.
 
 
मला सांग ना...हे असं वागणं चुकीचं आहे का? घरात देव्हाऱ्यातल्या देवांची छान पूजा करणं किंवा संध्याकाळी दिवेलागणीला शुभंकरोती म्हणणं याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. या गोष्टी करायला हव्यातच. पण इतर गोष्टींचं किती स्तोम माजलंय सध्या. तुला दिसत असेलच ते. ते सगळं पाहून मला तर सारखं वाटतं की, त्या दिवशी तू गाभाऱ्यात राहत तरी असशील का? किती ती गर्दी, मोठमोठ्या आवाजात लावलेली गाणी, ते महाप्रसाद, त्यात वाया जाणारं अन्न….बापरे! बघवत नाही रे असलं सगळं. मी म्हणते पूर्वीच्या काळी ठीक होतं. सगळं थोडक्यात आणि खऱ्या भक्तिभावाने होत असेल तेव्हा. पण सध्या? काही अपवाद वगळले तर दिखावाच झालाय सगळा. पैशाची, अन्नाची कोणाला किंमत राहिली नाही की काय; असं वाटायला लागतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की चिडचिड व्हायला लागते. असो...तुला म्हणून सांगतेय हे फक्त. बाकी कोणाला काही सांगायला कधी जात नाही मी. मला जे पटतं ते मी जसं करते तसं त्यांना करायचं ते करतात अशी मनाची समजूत घालून दुर्लक्ष करते. "इग्नोराय नम:" असा मंत्र आहेच प्रचलित सध्या आणि मनातल्या मनात जरी पूजा केली तरी तू नक्कीच रागावणार नाहीस हे ही मला माहितेय.
 
 
पूर्वी मी जिथं रहायचे ना तिथून माझ्या कॉलेजला जायच्या रस्त्यावर एकेठिकाणी उंबराच्या झाडाखाली एक छोटंसं मंदिर होतं. समोर पत्र्याची शेड आणि कडेने बसायला कठडे बांधलेले आणि गाभाऱ्यात तुझी एकदम प्रसन्न मूर्ती. वर पत्रा असला ना तरी कधी तापायचं नाही तिथं, कारण वरच्या उंबराच्या झाडाच्या शाखांची सावली असायची त्यावर. किती शांत, प्रसन्न वाटायचं त्या मंदिरात! समोर रस्त्यावर कितीही रहदारी असली तरी मंदिरात त्याचा काही त्रास व्हायचा नाही. माझ्या कितीतरी संध्याकाळी तिथं शांतपणे तुझ्याकडे बघत बसून घालवल्या आहेत मी आणि माहित आहे; शेजारीच एक बाग होती. तिथं तर संध्याकाळी तुझीच कितीतरी निरागस रुपं मुक्तपणे खेळत, बागडत असायची. तुझ्याकडे आणि त्यांच्याकडे पाहत अक्षरशः समाधी लागायची. तेव्हाच्या त्या क्षणांनी मला खूप काही दिलंय. जिथं गेलं की आतून शांत, प्रसन्न वाटेल ते मंदिर. मग तिथं गाभारा, मूर्तीच हवी असा काही माझा आग्रह नसतो. एखाद्या जंगलात गेले किंवा पाण्याच्या काठी गेले तरी तिथं मला तुझ्यापाशी असल्यासारखंच वाटतं.
 
 
माणसात देव पहावा म्हणतात खरं, पण मला तरी ते पूर्णपणे जमलं नाहीये. तसं जमायला आपणही संतप्रवृत्तीचे असायला लागतो. तशी मी नाहीये हे मान्यच करते मी. मात्र निसर्गात गेले की, मला जिथं तिथं देव दिसायला लागतो. ते मोठमोठे वृक्ष, त्यांचा आधार घेऊन वर वर चढणाऱ्या नाजूक वेली, वेगवेगळे पक्षी, फुलं, विविधरंगी फुलपाखरं… अरे, एकाचवेळी किती रुपात वावरत असतोस तू तिथं! प्रत्यक्ष भेटतोयस असंच वाटतं ते सगळं पाहून. तुझी ती रुपं फार आवडतात मला. ना कोणाच्या अध्यातमध्यात, ना कोणाविषयी हेवेदावे. पोटापुरतं मिळवायचं आणि मग शांत रहायचं. कसला हव्यास नाही की, कोणावर कुरघोडी नाही. सगळेच जीव सुखी! माणूसही जर असाच असता तर? जाऊ दे… ह्या जर तर ला काही अर्थ नाही.
आज हे पत्र लिहिलं ते अगदी सहजच. पत्रातून तुझ्याशी बोलावं असं सहजच मनात आलं. माझी तुझ्याकडून काही अपेक्षा नाही की कोणतं मागणंही नाही. ते मागणं, नवस वगैरे गोष्टी तर पटत नाहीत. आमच्या चंगोंची चारोळी हमखास आठवते अशावेळी…
"देवळात जाऊन माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात,
चार-आठ आणे टाकून
काही ना काही मागतात."
जे माझ्याकडे आहे, माझं आहे ते मला पुरेसं आहे. श्वास चालू ठेवायला जेवढं काही लागतं ते मिळतंय. त्यामुळं कसली तक्रार नाही की मागणी नाही. प्रत्येक क्षणाला आनंदी राहणं अजून जमत नाहीये, पण प्रयत्न करत राहीन. माणूस म्हणून जगत आहे आणि माझ्यामुळे इतर कुठल्याही जीवांना त्रास होऊ नये यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करते आहे. बास... बाकी काही नाही.
तूच निर्माण केलेला एक जीव...
जस्मिन जोगळेकर