पावसा...

युवा विवेक    29-Jul-2022   
Total Views |

rain 
 
सनातन पावसा विचारू का तुला..
मनाला पडणारे बाळबोध प्रश्न ?
कधीपासून कोसळतो आहेस?
कधीपासून मुरतो, पाझरतो झिरपतो, तिच्या रंध्रा, रोमा, देहात खोलवर हक्क सांगतो आहेस?
तिच्या घमघमत्या वेणीत मल्हार माळून झुलवतो आहेस?
कधीपासून ताटकळवलंस
कसल्याशा ओढीचं वरदान देऊन
आष्टोप्रहर पसरलेल्या तिच्या निर्विकार ओंजळींसह ...?
तुझ्या इतकीच सनातन तीही.. ना!
रोरावत येतोस काळजातल्या जखमा भरतोस दयाघन होऊन
का तुझी ये-जा चालू असते,
तिला निश्चल ठेवून?
थेंबागणिक नवनीत होऊन...
मिरवतोस दातृत्वाची शाल पांघरून
हिरवाईची झूल देऊन तिच्या श्वासांना जुन ठेवून ..
का परततोस ?
पुनर्भेटीच्या आश्वासनासह
सन्मानाचे एकटेपण देऊन!!
तिच्या डोळ्यातलं सावळं तळं दिसत नाही का तुला ?
डोकावून बघ त्यात कधी जमलं तर ...
आरस्पानी प्रतिबिंब दिसेल तुझंच तुला!
पाहा झोकून देऊन
परतण्याचा मोहही विसरशील कदाचित!!
- अमिता पेठे पैठणकर