menopause... एक मानसिक दुविधा..

युवा विवेक    13-Aug-2022   
Total Views |


menopause

 
वयाच्या १४ ते १६ वर्षे या काळात स्त्रीची मासिक पाळी पहिल्यांदा सुरु होते. शाळकरी मुलगी घाबरून जाते, तिची आई तिला स्वच्छता शिकवते. सॅनिटरी pad कसा वापरावा, किती वेळाने बदलावा हे सगळे ती हळूहळू शिकून घेते. जसजशी मोठी होत जाते, तसतशी सरावते. दर महिन्याला न चुकता, न बोलावता येणाऱ्या या पाहुणीची तिला सवय होऊन जाते. एखादा दिवस मागेपुढे झाला तर थोडी विचलित होते. वय वाढत जाते, लग्नसराई, कुणाचे वाढदिवस, एखादी पिकनिक अशा वेळी हमखास उपस्थित होणाऱ्या मासिक पाळीच्या नावाने ती बोटे मोडते. काय ही दर महिन्याला कटकट आहे! जरा मनासारखं मोकळं जगता येत नाही, एकदाची ही कटकट कायमची जाईल तर बरं होईलअसं कित्येक वेळा तिच्या मनात येऊन जातं. पण तरीही ती दर महिन्याला मासिक पाळीची वात पाहते 

वयाची चाळीशी उलटली की, हळूहळू तिची पाळी लांबत जाते. कधी दोन महिने पाळी येत नाही, कधी चार तर कधी सहा महिने! तिला चाहूल लागते की, आता कदाचित ही दर महिन्याची पाहुणी कायमची निघून जाण्याची वेळ आली आहे. कटकट कायमची जाईल तर बरीअसं अनेकदा बोलणारी ती आता मात्र तिच्या जाण्याच्या चाहुलीने अस्वस्थ होते! इतक्यात?” असा प्रश्न तिच्या मनात उपस्थित होतोच! ती आणखी काही काळ राहावी यासाठी काय करता येईल, असे विचार तिच्या मनात सतत येऊ लागतात. कारण मासिक पाळीला कायमचे टाटा बाय बाय करणे हे वाटते तितके सोपे काम नसते

एखाद्या स्त्रीचा menopause कोणत्या वयात येणार हे तिच्या पाळी सुरू झाल्यावर ठरलेले असते. कारण प्रत्येक स्त्रिच्या अंडाशयात स्त्रीबीज ठराविक संख्येत तिच्या जन्मापासून तयार असतात. पाळी येताना फक्त त्यातील एक प्रगल्भ होऊन गर्भाशयात उतरत असते. या स्त्री बिजांची संख्या कमी जास्त करणे कुणाच्या हातात नसते. त्यामुळेच स्त्रीचा menopause लांबवणे कुणालाही शक्य नसते. Menopause जेव्हा यायचा निश्चित आहे, तेव्हा तो येणारच असतो.

परंतु तो येताना सहज येत नाही. जितक्या सहज पाळी पहिल्या वेळी अचानक आलेली असते, तितक्याच सहज ती जाताना जात नाही. मासिक पाळी जाताना स्त्रीला शारीरिक आणि मानसिक पातळीवर तोडून मगच जाते. बिघडलेली मनस्थिती, वाढलेले वजन, पचनाचे विकार अशा अनेक पातळ्यांवर menopause स्त्रीला थकवतो.

इथून पुढे काही भागात आपण स्त्रिच्या menopause बद्दल सखोल माहिती घेणार आहोत. Menopause म्हणजे नक्की काय? तो का येतो आणि येणं का गरजेचं आहे? काही स्त्रियांना लवकर येणारा menopause का येतो? Forced menopause म्हणजे काय? या कठीण काळात स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी? आहार कसा असावा? व्यायाम कोणते करावेत? एखादी प्रचंड त्रासातून जात असेल तर तिच्या कुटुंबाने तिला मानसिक आधार का आणि कसा द्यावा? पुरुषांना या बद्दल किती आणि कोणती माहिती असणे आवश्यक आहे?

अशा विविध गोष्टींची चर्चा आपण पुढल्या काही भागांत करू.

आज फक्त एकच सांगते, menopause ही कितीही कठीण अवस्था वाटत असली तरीही, ती पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि प्रत्येक स्त्रीला या फेज मधून जावेच लागते. कुणाला कमी त्रास होतो, तर कुणाला जास्त. कुणाला अतिरिक्त रक्तस्त्राव होतो तर कुणाला अगदीच कमी स्त्राव झाल्याने वजन वाढते. कुणी रोज चिडचिड करते, तर कुणी रोज रडतेहे सर्व पूर्णपणे नॉर्मल आहे!

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ