अल्माची गोष्ट

युवा विवेक    19-Aug-2022   
Total Views |

alma
मी, मी अल्मा. धर्मानं ज्यू, त्यात दुसऱ्या महायुध्दाच्या काळ्या सावलीत स्वतःचं सर्वस्व गमावून बसलेली, ऐन विशितली मुलगी. माझ्यासारख्या लोकांच्या असंख्य कथाकहाण्या तुम्ही आजवर उसासे टाकत, अश्रू ढाळत ऐकल्या असतील. ऐकता ऐकता विसरूनही गेला असाल. साहजिक आहे. ही कहाणीसुध्दा तुम्ही विसरून जाल, पण तरीही मला ती सांगायलाच हवी. दुःख बोलून हलकं होतं, म्हणतात. पण काही दुःखांना शब्दांचा भार पेलत नाही. इतकं सगळं भोगल्यानंतर आता मलाच प्रश्न पडलाय, माझ्या दुःखाची जातकुळी यातली नेमकी कुठली? कदाचित, तुम्ही सांगू शकाल. तर, मी एलेना आणि ही माझी छोटीशी गोष्ट...
आभाळातून आग फेकत फिरणाऱ्या विमानांना खाली काय जळतंय, याची काहीच पर्वा नव्हती. कारण त्यांना सगळंच जाळण्याच्या स्पष्ट सूचना मिळालेल्या होत्या. वॉर्सामधल्या अनेक घरांपैकी एक माझं घर. भिंतींवर मी आणि बाबांनी रंगवलेली चित्रं होती, खूप सारी पुस्तकं होती आणि बाबांनी माझ्या वाढदिवसाला दिलेल्या बाहुल्यासुद्धा होत्या. बॉम्ब्जच्या त्या वर्षावात आम्ही घरातून सैरावैरा पळत सुटलो. इतक्यात एक बॉम्ब येऊन माझ्या घरावर पडला आणि एका क्षणात सगळ्याची राख झाली. चित्रं, पुस्तकं, बाहुल्या सगळंच संपलं. रस्त्यांवर लोकं वाट फुटेल तिथं धावत होते. न वाचण्याची खात्री असलेल्या जीवाला जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते आणि मी मात्र, त्या धावपळीत माझ्या बाबांना शोधत होते. इतक्यात कोणीतरी मला धक्का मारून हलवलं आणि मीही पळत सुटले. पळता पळता मागे वळून पाहिलं, तर मघाशी माझ्या शेजारी असणारी इमारत आता आगीच्या ठिणग्यांत अदृष्य झाली होती. मी किती वेळ पळत होते. मलाही ठाऊक नाही, हां.. इतकंच कळलं की, पळता पळता मी चक्कर येऊन खाली पडले आणि शुद्धीवर आले तेव्हा इथं होते. कुठं आलीय मी? कोणी आणलं मला इथं? कोणाचं घर आहे हे? डोक्यात असंख्य प्रश्नांची वारुळं उभी राहत असतानाच, बाहेरून एक अत्यंत कोमल आवाज ऐकू आला. “गुटन टाग, इश हाईस स्टेला. वि हाईसन झि?’’ आली का पंचाईत. ती बाई जर्मनमध्ये बोलत होती आणि मला काहीही कळत नव्हतं बरं. आवाज दाराच्या मागून येत होता. त्यामुळे चेहराही दिसत नव्हता. मी कसंबसं मला जर्मन येत नाही, हे तिला सांगितलं. तर तिचा पुढचा प्रश्न आलाच, ‘तू आर्यन नाहीयेस का?’ मला कळेना, काय उत्तर द्यावं. पण एकदम डोक्यात आलं, जर हिनं आपला जीव वाचवला असेल, तर हिच्याशी खोटं बोलणं योग्य नाही. म्हणून मी 'नाही, मी ज्यू आहे' असं सांगून टाकलं. बाहेरून काहीच उत्तर येईना. एक.. दोन.. तीन.. पूर्ण साडेतीन मिनिटांच्या शांततेनंतर 'ऑलराईट, मी आर्यन, आय सपोर्ट हिटलर.'' एवढंच उत्तर आलं. ती साडेतीन मिनिटं मी जगणं आणि मरणं यांच्या मध्यावर उभी होते. मला काहीच समजत नव्हतं. तिच्या उत्तरानं मला अजूनच गोंधळात टाकलं होतं. आपल्या घराची राख करणाऱ्या माणसाची आपण पाठराखण करतो, हे ती अत्यंत शांतपणे बोलली. अनोळखी घर, अनोळखी बाई आणि अनोळखी रात्र. ती माझी या खोलीतली पहिली रात्र. अनोळखी रात्र.
दुसऱ्या दिवशी सकाळी दाराखालच्या फटीतून एका प्लेटमध्ये ब्रेड आला. हा माझ्यासाठी होता? हो. कारण दुसरं कोणीच नव्हतं घरात. कोणी दिला? कालच्या बाईनं? काही मिसळलं असेल का त्यात? ती म्हणत होती, आय सपोर्ट हिटलर. तिनं यात काही घातलं असेल तर? नाही. पण मारायचं असतं तर वाचवलं कशाला? अनेक प्रश्न काही सेकंदांत डोक्यात घुमले आणि पुढच्याच सेकंदाला त्यातला एखादा प्रश्न तिला विचारावा, या उर्मीनं मी भिंत ठोठावली.
मी : एक्स्क्यूज मी.
शांतता.... मी धीर करून पुन्हा....
मी : एक्स्क्यूज मी, कोण आहे?
पुन्हा उत्तर नाही. आता मात्र मला गप्प बसवेना. मी पुन्हा भिंत वाजवली, पण यावेळी मी काही बोलणार, इतक्यात पलिकडूनच उत्तर आलं,
स्टेला : तुझ्याचसाठी आहे.
मी : का?
स्टेला : का म्हणजे? तुला भूक लागली असेल म्हणून
मी : पण तुम्ही तर हिटलरला मानता ना?
स्टेला : अर्थात.... त्याचा इथं काय संबंध?
मी : त्याच्यामुळेच मी इथं आहे.
स्टेला : खा शांतपणे.
ही निघून चालली की काय? अशी कशी जाईल?
मी : हॅलो, एक्सक्युज मी, आहात का तुम्ही?
स्टेला : ऐकत आहे. बोल.
मी : मी म्हटलं, मी आज इथं आहे ती हिटलरमुळेच.
स्टेला : त्याच्यामुळे नाही, माझ्यामुळे. नाहीतर हिटलरचं नाव घ्यायचीही लायकी नाहीये तुम्हा लोकांची.
मी : का? आम्ही माणसं नाही आहोत का? की तो कोणी मोठा लागून गेलाय?
स्टेला : तो मोठाच आहे आणि तो मोठा आहे म्हणून तुमच्यासारख्या छोट्या, स्वार्थी विचार करणाऱ्या किड्यांना तो साफ करतोय.
मी : काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का? तुमच्या देशाची राख करत सुटलाय तो आणि तुम्हाला त्याचंच कौतुक. वा.
स्टेला : आहेच त्याचं कौतुक. मी जरी वॉर्सामध्ये राहत असले तरी मी जन्मानं आर्यन आहे. शुद्ध, प्युअर आर्यन.. हिटलर आज जे काही करतोय ते आमच्या रक्षणासाठी करतोय..
मी : अच्छा? पण तुम्ही तर शुद्ध, प्युअर आहात ना, मग तुम्हाला कोणापासून रक्षण हवंय?
स्टेला : तुमच्यासारख्या देशद्रोही किड्यांपासून, जे आमच्या आर्यन वंशाला आणि देशाला अशुद्ध करायला टपलेत. पहिल्या युद्धात जर्मनी हरली, तेव्हा तुमच्यातला कोणी पेटून उठला नाही देशासाठी, हिटलरच पुढं आला.
मी : आणि पुढं येऊन केलं काय? सरळ करार मोडून न सांगता आक्रमण? जी माणसं आपली शत्रू आहेत, मित्र आहेत, ओळखीची, अनोळखी, काही माहित नाही, त्यांची घरंदारं जाळत सुटला हा तुमचा देशभक्त.
स्टेला : काय चुकलं मग त्याचं? ही तर सुरुवात आहे. एक दिवस तुम्ही सगळे ज्यूज बघा कसे किडामुंगीसारखे मराल. आता गप्प बसून तो पाव खा.
मी : नाही खाणार मी तुमच्याकडचा पाव.
स्टेला : खा चुपचाप. जोपर्यत इथं आहेस, तोपर्यंत रोज तुला खायला देणार मी.
मी : का पण?
स्टेला : कारण आम्ही शरण आलेल्याला उपाशी ठेवत नाही. संस्कार आहेत आर्यन्सचे तसे. खा शांतपणे. मी जाते.
अहो.... अहो....
गेली निघून बहुतेक. मी तो पाव उचलून हळूहळू चावत खात बसले. ज्यूसाठी आर्यन्सनं दिलेला पाव.
अशी बरीच वर्षं मध्ये गेली असावीत. अर्थात, इथं दिवस-वर्ष-महिन्यांचा हिशोब घेऊन करणार काय, हा प्रश्न होताच. तर बराच काळ मी या घरात होते. जवळजवळ रोज स्टेला मला पाव आणून द्यायची. क्वचित कधीतरी एखादं फळ किंवा दूधही मिळायचं. अधूनमधून आमच्या गप्पा व्हायच्या, त्यातही बरेचदा ती बाहेरची हालहवाल सांगायची. एकूणातच, मी जिवंत होते म्हणजेच माझं बरं चाललं होतं. एक दिवस ती रोजच्यासारखी पाव घेऊन आली. प्लेट आत सरकवून काही क्षण घुटमळत राहिली. एव्हाना मला तिचं घुटमळणं कळायला लागलं होतं.
मी : काही सांगायचं होतं का?
ती गप्पच होती....
मी : काय झालं? सगळं ठीक आहे ना?
स्टेला : (चाचरत) हं.. हं..
मी : तुझा आवाज ठीक वाटत नाहीये. काय झालं?
स्टेला : तू, तू जा इथून. आज जमलं तर आत्ताच.
क्षणभर मला ती काय बोलत आहे, तेच कळलं नाही.
मी : जाते मी. पण कारण कळू शकेल का?
स्टेला : जर्मन्स इथं कधीही येऊ शकतात. त्यांनी तुला पकडलं तर अवघड होईल.
मी : तू जर्मन्सना घाबरत आहेस? पण तू तर हिटलर.
स्टेला : हिटलरचं सोड आणि मी कोणालाच घाबरत नाहीये. पण तुझा जीव तुला जड झालाय का?
मी : तशीही इथं जिवंत आहे, एवढंच ना. त्यापेक्षा मरून वेगळं काय होणार आहे?
स्टेला क्षणभर शांत झाली.
स्टेला : हे ऐकण्यासाठी तुला उचलून आणलं नव्हतं त्या रात्री. तिचं ते वाक्य ऐकलं आणि माझी मलाच लाज वाटली. स्वतः हिटलरची समर्थक असूनही तिनं माझ्यासारख्या अनोळखी मुलीला इतके दिवस अक्षरशः जिवंत ठेवलं होतं. पण तिचंही बरोबरच होतं ना. एरवी या युद्धाच्या धुमश्चक्रीत सगळ्यांबरोबर माणुसकी नावाची गोष्टही बेचीराखच झाली होती. कोण कोणाचं उरलं होतं? पण तरीही मला बाहेर जायची भीती वाटत होती. मला ठाऊक नाही, मी एकदम काय बडबडायला लागले.
लंडन.. पॅरिस.. बर्लिन.. वॉर्सा
म्युनिक.. लेनिनग्राड.. रोम.. नॉर्मंडी..
हिटलर.. स्टॅलिन.. मुसोलिनी.. चर्चिल..
Cities.. Ruins.. Victories.. Kings..
Kings.. Kings are the slaves of History.. you said it rightly, Mr. Tolstoy, Kings are the slaves of History.
हिटलर.. स्टॅलिन.. मुसोलिनी.. चर्चिल..
You are the slaves of History अरे, पण आम्ही काय केलंय??
आम्हाला का? का?
मला रडू येत होतं. ती भिंतीपलीकडे शांत उभी होती. कदाचित तीही रडत असावी. कारण पुन्हा बोलायला लागली तेव्हा, तिचा आवाज जड झाला होता.
स्टेला : जा इथून
मी : कुठे?
स्टेला : कुठेही, पण जा.
मी : जायचंच असतं तर कधीच गेले असते ना.
स्टेला : नाही. तू जाऊ शकली नसतीस आणि आताही तू जाऊ शकत नाहीस. पण तुला जायला हवंय.
मी : मला भिती वाटत आहे.
स्टेला : कसली? मरायची?
मी : हो.
स्टेला : आता जिवंत आहेस तू?
मी : श्वास घेतीय ना. बोलतीय, ऐकतीय, चालतीय, थांबतीय.
स्टेला : म्हणजे जिवंत आहेस, असं म्हणायचं का?
मी : तुला कळत नाहीये का?
स्टेला : तुला कळत नाहीये. मी आज आहे, उद्या नाही. तुझं काय? त्यापेक्षा जा.
शांतता.
मी : नाही जाणार मी. नाही जाऊ शकत.
स्टेला : का पण?
मी : नाही.
स्टेला : नाही जाणार तू?
मी : नाही.
स्टेला : नाही जाऊ शकत?
मी : म्हटलं ना, नाही.
स्टेला : ठीक आहे. मग जे होईल ते दोघी मिळून भोगू.
आतमध्ये एकदम काहीतरी चरचरलं. मी डोळे मिटले, एक मोठा श्वास घेतला आणि दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. समोरच मला बाहेर पडायचं दार दिसत होतं. मी दाराकडे पळत सुटले आणि कित्येक दिवसांनी रस्ता बघितला. पुढं जात राहिले तसं लक्षात आलं, दारातला पाव आणि तिचा चेहरा एकदातरी बघण्याची इच्छा, दोन्ही आपण आतच विसरून आलोय.
 
- अक्षय संत