गरोदर महिलांसाठी आहाराच्या टिप्स

युवा लेख

युवा विवेक    10-Oct-2023   
Total Views |

 गरोदर महिलांसाठी आहाराच्या टिप्स

नमस्कार मित्रांनो! कसे आहात? मजेत असाल. कारण इतक्या महिन्यांपासून आपण आपल्या आहाराची काळजी घेतो आहोत, नवनवीन गोष्टी शिकतो आहोत. आज मी एका खास वर्गासाठी आहाराच्या काही टिप्स घेऊन आले आहे. तो खास वर्ग म्हणजे गरोदर असलेल्या स्त्रिया.

आज आपण मुद्देसूद पद्धतीने पुढे जाऊ. त्यामुळे समजायला आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपे होईल.

चला तर मग, गरोदर स्त्रियांनी आहाराच्या बाबतीत काय काळजी घ्यावी हे पाहू.

१. पहिले तीन महिने :

असे म्हटले जाते, की गरोदरपणातील पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात. याचे कारण असे, की या पहिल्या तीन महिन्यांमध्ये बाळाचे हृदय, त्याचा मेंदू, मणका यांची जडणघडण होत असते. हा काळ अनेक स्त्रियांना फार त्रासदायक जातो. उलट्या, मळमळ, अन्नावरची वासना उडून जाणे असे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. याचमुळे अनेक स्त्रियांना अशीही भीती वाटते, की जर सतत उलट्या होत राहिल्याने पोटात काहीच टिकत नसेल तर बाळाची वाढ नीट होणार नाही.

मी तुम्हाला एक चांगली बातमी देते, की हा पूर्णपणे गैरसमज आहे. बाळाची पहिल्या तीन महिन्यांतील वाढ स्त्रीच्या खाण्यापिण्यावर अवलंबून नसते. या काळात अन्न कितीही कमी सेवन करता आले तरीही बाळ व्यवस्थित वाढत असते. त्यामुळे स्त्रीची इच्छा नसताना तिला बळजबरीने खायला लावू नये. जे खाण्याची तिची इच्छा होईल ते खाऊ द्यावे; पण अर्थातच काही नियम पाळावेत. शक्यतो हॉटेलचे अन्न सेवन करु नये. पाणी व्यवस्थित उकळलेले किंवा purifier मधून शुद्ध केलेले प्यावे. शिजवलेले अन्न खाण्याची इच्छा नसेल फळे खाऊ शकता.

या तीन महिन्यांत गर्भपात होण्याच्या शक्यता सुद्धा जास्त असतात. काही स्त्रियांना वाटते, की सतत उलट्या झाल्या तर पोटातील बाळाला त्रास होऊन गर्भपात होऊ शकतो. हा सुद्धा फार मोठा गैरसमज आहे. उलट्या होण्याने बाळाला कोणताही त्रास होत नाही. उलट्या होणे हे कधीही गर्भपाताचे कारण नसते. बाळामध्ये काही दोष असण्याच्या शक्यता असतील तर शरीर स्वतः त्याचा त्याग करते. म्हणूनच पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भपात जास्त होतात. मात्र यात स्त्रीचा कोणताही दोष नसतो.

२. चौथा ते सहावा महिना :

या काळात स्त्रीला आपोआप भरपूर भूक लागू लागते. अशा वेळी तिला तिच्या भुकेप्रमाणे खाऊ द्यावे. काहीही इतर व्याधी नसतील तर खाण्यापिण्यावर बंधने घालू नयेत. फक्त unhealthy पदार्थ खाऊ देऊ नये. काही स्त्रियांना गरोदरपणात डायबेटिस डिटेक्ट होतो. याला gestational diabetes म्हणतात. जर असे घडले तर गोड पदार्थ, भात, बटाटा या गोष्टी आहारातून वगळाव्या. या काळात डायबेटिस झाला तर बाळाचे डोके आणि एकूणच आकार फार मोठा होऊन डिलिव्हरीला अडचण येऊ शकते. शिवाय बाळाला जन्मतः डायबेटिस असू शकतो. यासाठी साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

३. सातवा ते नववा महिना:

हा काळ शारीरिक कष्टाचा असतो. Acidity, gases, heartburn, fatigue, physical discomfort, constipation या गोष्टी या काळात वाढू शकतात. यामुळे भरपूर पाणी पिण्याची काळजी घ्यावी. मसालेदार, चमचमीत, कोणतेही असे पदार्थ ज्यांनी acidity होऊ शकेल, असे पदार्थ खाणे टाळावे. Small meals frequently ही पद्धत वापरावी. एकाच वेळी भरपूर जेवू नये. पोट पूर्ण भरेपर्यंत खाऊ नये. जेवणानंतर किमान एक तास सरळ बसावे. लगेच झोपू नये. काही महिलांना या काळात मुत्रात uric acid वाढण्याचा त्रास सुरू होतो. तसे झाल्यास आहारात फार जास्त प्रमाणात प्रोटीन येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नॉनव्हेज, अंडी, पनीर यांचे प्रमाण कमीतकमी ठेवावे.

अशाप्रकारे योग्य काळजी घेतल्यास स्त्रीला गरोदरपण सुखकर वाटण्यास मदत होऊ शकते.

कसा वाटला आजचा विषय? पुन्हा भेटू या पुढच्या भागात एका नव्या विषयासह.

Till then stay healthy be happy

- दीप्ती काबाडे