अंतरीच्या गर्भी....

युवा लेख

युवा विवेक    19-Oct-2023   
Total Views |

अंतरीच्या गर्भी...

बाह्य रूपाचा आरसा असतो आपल्या प्रत्येकाकडे, पाहतोही आपण त्याच्यात; पण जीवनाचा, आपल्या जगण्याचा आरसा आपल्याला मिळतो तो कवितेत. कधी आपल्या तर कधी दुसऱ्यांच्या. अशा कविता आल्या असतात खूप आतून, ज्यांचा पत्ता सहज आठवत नाही; पण तो येतो शब्दांतून उफाळून आणि भारावून जातो आपण. आपणच कधीकाळी पेरलेल्या, आपल्याकडून कळत-नकळतपणे पेरल्या गेलेल्या भाव-भावना वाहत येतात शब्दांतून, नातं सांगू पाहतात आपल्याशी आणि तेव्हा चकित होऊन जातो आपण. अशा कविता शब्दांच्या रूपात येतात त्या खूप खोलवरुन, भावनांचा सुगंध घेऊन. अशा कविता लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री म्हणजे डॉ. संगीता बर्वे. बालसाहित्यासाठी विशेष प्रसिद्ध असल्या तरी त्यांच्या सखोल विचार करायला लावणाऱ्या कविता सुखाचा विलक्षण अनुभव देऊन जातात. बालसाहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अंतरीच्या गर्भी काळोखाचा डोह

त्याचा मज मोह कासया गा

खुणावते कोण आत खोल खोल

आयुष्याचे मोल मागते गा

आपल्या 'अंतरात' नेमकं काय आहे? याची मानवाला ओढ ही कायम असतेच. 'अंतरीच्या गर्भात' खोल अंतरात काय आहे किंवा असेल? असा विचार केला, अंतरीच्या गर्भाचा दृश्यरूपात विचार करायचा म्हंटला तर बहुतांश वेळा, बहुतांश लोकांसाठी अंतरीच्या गर्भाचं रूप हे अंधारचं असतं, काळोखात माखून गेलेल्या अदृश्य दिशांचं असतं; पण तरीही त्याचा मोह असतो. पहायला गेलं तर काळोख म्हणजे 'कृष्ण' आणि आकर्षण म्हणजेसुद्धा 'कृष्ण'च. त्यामुळे काळोखाचं आकर्षण असणं हे स्वाभाविकच आहे. जे आपल्याला माहीत नाही; पण जाणवत राहातं. अशा गोष्टींचं कुतुहल वाटणं साहजिक आहे. त्यात आपल्याच जवळची गोष्ट असून ती आपल्याला पुरेशी कळत, समजत नाही याची सकारात्मक खंतही असते अशा जिज्ञासू माणसांना; पण तेव्हा ह्या, जे माहीत नाही, ज्याचं अस्तित्वही उमगलेलं नाही, अशा अंतरात न माणूस डोकावू शकतो न त्याला रेखाटू शकतो. मोहाची, कुतुहलतेची भावना अशावेळी आपल्यापाशी जोपासण्यावाचून पर्याय असतो का माणसाला? या कुतुहलाच्या अंकुरावस्थेत नसावा कदाचित. तरी का मोह, ही ओढ नक्की कुठून येते आहे? तिचा उगम तो कुठला? असे प्रश्न पडत जातात. 'त्या'ची जणू मूर्तीच शोधत माणूस खणत जातो अंतरीचा गर्भ.

तो खणत जातो अखंड. तेव्हा येत नाही त्याला कंटाळा आणि वाटत नाही थांबावसं. कारण गुरुत्वाकर्षणासारखं खचून घेत असतं काहीतरी आतून, ते खेचणं हवंहवंसंच वाटत राहातं. प्रसंगी अधोगतिची भीती मावळत जाते, त्याच अंधारात. ते खेचणं असतं फार सुंदर, काही मिळालंय, सापडलंय असं वाटताच दिसू लागतात दूरवर गेलेल्या अनाम वाटा आणि पांथस्थ चालू लागतो त्याच्या अंतरीच्या वाटा. त्या वाटा इतक्या दूरवर पसरलेल्या दिसतात आणि एका आयुष्याची मोठी दोरही पुरणार नसते चालायला, याची अस्पष्ट जाणीव व्हायला लागते फिक्या झालेल्या अंधारात; पण तेजाळला असतो तेव्हा मागचा रस्ता. तरी परतीची इच्छा मालावून जाते, आयुष्याची, जन्मांच्या माळांची पुरचुंडी अर्पण केली जाते त्या वाटेवर, अगदी नकळत....

नाही कसे म्हणू वाटते अप्रुप

कैवल्यस्वरूप पाहावया

निबिड वनात धावले धावले

किती रक्ताळले काय सांगू

'नाही कसे म्हणू....' हे शब्द किती जिव्हाळ्याचे वाटतात. कितीदातरी आपल्याला एखादी वस्तू, पदार्थ व्यवहारात गरज नसतानाही पाहिजे असला, तर आपण सहज हे शब्द उच्चारतो. इथे भावना तिच आहे; पण उद्दीष्ट वेगळं. त्यामुळे खरं तर त्या भावनेचीच उंची वाढते. कैवल्यस्वरूप असलेल्या 'त्या'ची लागले ओढ, त्यातली तीव्रता आणि मुख्य म्हणजे अपूर्णत्वाची सतत टोचणारी भावना कारण ठरते ती त्या अप्रुपाची; पण हे असतं का वाटतं तितकं सोप्पं? नक्कीच नाही. अंधारात दिवा लावावा लागतो तो स्वत:च्याच हातावर, पोळल्याशिवाय पडणार असतो का प्रकाश? त्या प्रकाशासाठी अंधारात चालायचं म्हणजे काट्यांचं टोचणं हे आलंच, धावणं म्हणजे पडणं, स्विकारणं आलंच. आतल्या तमाला बाहेर टाकायला प्रकाशाच्या नश्वर तीव्रतेचे चटके सहन करणं आलंच. कितीही तर्तुद केली, तरी शेवटी ज्याला पैलतीरी पोहोचायचंय त्याला पाण्याची भीती बाळगून चालतं का कधी? तरीही रक्ताळलेल्या पायांतून वेदनेपेक्षा जास्त वाहते ती कृपेची ग्वाही, तेव्हा बळ मिळतं ती झेलायला, सोसायला. अशावेळी कदाचित वाचाही देत नाही पुरेशी साथ. रमून जाते तीही, कैवल्याच्या खुणांमध्ये.

ओढले खेचले काटेरी शब्दांनी

घायाळ करोनी सोडले गा

जीवाचा आकांत साहुनी बुडाले

विर्घळोनी गेले कवितेत

अशावेळी कधी अस्वस्थ होतो पांथस्थ आणि व्यक्त होऊ पाहतो. व्यक्ताच्या पलिकडच्या भावनांना, अनुभवांना मिळत नाहीत पुरेसे आणि योग्य शब्द. तेव्हा तेही वाटू लागतात काटेरी, घायाळ होऊन जातो पंथस्थ. कधी अस्वास्थाचा दाह तर कधी सुख, ओतू पाहतो तो नश्वर शब्दांत. आकांत होते तो जीवाच्या मूळापासून. कधी सुखाचा, कधी अनिश्चित अंधाराचा. तेव्हा तो पांथस्थच बुडून जातो त्यामध्ये. तो विरघळून जातो शाश्वताशी नातं सांगणाऱ्या त्याच्याच कवितेत. उरतो तो तिच्याच रूपाने, शाश्वताच्या अनुभवांवर नश्वर शब्दांचं पांघरुण घालून. तेव्हा सार्थक होतं त्याचं, कवितेचंही. कधी आधार शोधणारा तो आता इतरांचा आधार होऊ लागतो....

- अनीश जोशी.