तेजोवलय..

युवा लेख

युवा विवेक    28-Oct-2023   
Total Views |

तेजोवलय..

ईश्वराची सर्वांत सुंदर निर्मिती म्हणजे निसर्ग आणि माणूस. सारी सजीव सृष्टी ईश्वराने निर्माण केली. आता जगाची लोकसंख्या अब्जावधी आहे. तरीही एका माणसाचा स्वभाव दुस-या माणसासारखा नाही. दृष्टी, दृष्टिकोन यात जुळ्या मुलांतही फरक आढळतो. हे निराळेपण असल्यामुळेच माणूस समाजात वावरू शकतो. आपलं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण करु शकतो. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. पण जन्माला आल्याक्षणापासून आपण या जगाचा , समाजाचा एक भाग होतो. नाव आणि अस्तित्व आपल्याला मिळतं. जन्म-मृत्यू हातात नसला तरी जगणं मात्र आपल्याच हातात आहे. बाल्यावस्थेतून तारुण्याच्या उंबरठ्यावर जाताना एकूण जगण्याचा आराखडा आपण मांडतो. त्याप्रमाणे शिक्षण घेतो. नवनवीन गोष्टी, प्रयोग शिकतो. शिक्षणाच्या आधारावर नोकरी - व्यवसायाची दिशा शोधतो. कुणाला ही दिशा लवकर सापडते तर कुणाला उशिरा... एकंदरीतच अशाप्रकारे आपण आयुष्याचं मार्गक्रमण करत असतो..

करियरच्या आता अनेक संधी उपलब्ध आहेत. काही प्रसंग आयुष्यात असे येतात की, करियर निवडण्याची संधी किंवा तितका वेळच मिळत नाही. पदरात पडेल तो व्यवसाय किंवा नोकरी स्वीकारुन उदरनिर्वाह करावा लागतो. पण त्यातूनही काहीजण मार्ग शोधतात आणि आपल्याला हवी ती संधी मिळवतात. अशा लोकांविषयी, आपल्या आवडीचं करियर, छंदातून अर्थार्जन करणा-यांविषयी मला कायमच आदर वाटत आलेला आहे. अशा व्यक्तींच्या करियरला दिशा मिळाली म्हणण्यापेक्षा लय सापडली म्हणणं अधिक उजवं वाटतं. लय शोधावीच लागते आणि काहीवेळा ती सापडावीही लागते. संगीतात सूर आणि ताल यांचा अचूक मिलाफ झाला की लय सापडते. लय सापडली की कार्यक्रमाची मैफल होते. आपलं आयुष्य संगीतासारखंच आहे. संगीतात सप्तसूरातून विश्व निर्माण करावं लागतं तसं आपल्यालाही आपल्याकडे असणा-या गोष्टींचा आधार घेतच पुढे जावं लागतं. या हातातल्या गोष्टींना म्हणजेच शरीर, मेंदू, ह्रदय, अवयव, मन, पैसा, कुटुंब ह्यांना सप्तसूर म्हणायचं. नोकरी, व्यवसाय, लग्न, मित्र-मैत्रीणी, नाती, निसर्ग, जग, जन्म-मृत्यू, नियती हे सारे ताल.. आपले सप्तसूर यातल्या कुठल्या तालाशी आणि कसे जुळतील हे गाणं म्हणल्याशिवाय समजणार कसं.. म्हणजेच आयुष्याला आकार द्यायला शिकायचं. त्यामुळे ताल आपल्याजवळ येतील असा आग्रह न धरता सप्तसूरातून तालाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.. लय आपोआप सापडेल..

आयुष्याला अर्थ प्राप्त होणं म्हणजे लय गवसणं. लय जसजशी बहरेल तसं आयुष्य खुलेल, बहरेल.. लय सापडली की आयुष्याभोवती वलय तयार होतं.. ज्याला अपेक्षित लय सापडेल त्याचं आयुष्य तेजाळतं आणि या लयीचं आयुष्यात सुंदर तेजोवलय दिसू लागतं. मात्र या तेजोवलयाचा अट्टाहास करायचा नाही. तेजोवलय नाही म्हणजे नाराज होण्याचं कारण नाही. वलयच नाही असं होणार नाही. वलय असतंच. त्या वलयाचं अस्तित्व ओळखण्याची शक्ती आणि दृष्टी आधी मिळवावी लागते. ती मिळवण्यासाठी अस सोडायचा. असंही म्हणतात की, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता अट्टाहास सुंदरसं वलय शोधण्यासाठी आधी अट्टाहास सोडायचा.. अट्टाहास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अट्टाहास म्हणजे तुलना.. माझ्या मित्राकडे इतका पैसा आणि माझ्याकडे कमी पैसा, ही तुलना सोडायची. मगाशी म्हटल्याप्रमाणे काही जणांना लय शोधावीच लागते आणि काहीवेळा ती गवसते.. तशी त्याला ती गवसली; आपल्याला शोधायची आहे. प्रसिद्ध साहित्यिक आणि कथाकथनकार व. पु. काळे म्हणतात , इट्स जस्ट हॅपन्स असं म्हणून पुढच्या क्षणी जी व्यक्ती कामाला लागते ती सुखी होते. आपणही ‘इट्स जस्ट हॅपन्स’ असं म्हणून कामाला लागावं म्हणजे सुखी राहू. पैसा या गोष्टीसाठी तुलना करून मित्राशी जमलेली लय म्हणजे मैत्री सोडायची नाहीच. उलट, मित्र आपलाच आहे, मैत्री सुंदर आहे असं म्हणून त्याला लय गवसल्याबद्दल आपण आनंद साजरा करायचा.. लय तुमच्याकडे पण नक्की धावत येईल आणि तुमच्याही आयुष्याभोवती वलय .. तेजोवलय दिसेल..

तेजोवलय पाहण्याची दृष्टी मिळवणं अगदी सोपं आहे. ग्रहण पाहताना आपण जुना एक्स रे किंवा काळा चष्मा वापरतो. त्या वस्तू पारदर्शी असतात. पण डोळ्याला त्रास होत नाही. तसंच दृष्टिकोन स्वच्छ आणि पारदर्शी ठेवायचा. बाहेरचं काही मनाला लावून घ्यायचं नाही. संवादाची कला शिकायची , रोज छान नवनवीन कल्पना मनात आणायच्या.. माणसांशी मनापासून बोलायचं. निसर्गाशी, सा-या सजीव सृष्टीशी एकरुप व्हायचा प्रयत्न करायचा.. हे सारं सारं करत असताना तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःच्याच आयुष्याभोवतालचं तेजोवलय दिसेल.. माणूस सुंदर वाटायला लागेल, आयुष्य, जगणं सारं काही हवंहवंसं वाटेल.. हे हवंहवंसं वाटणं हीच तेजोवलय दिसल्याची आणि जाणवल्याची खूण..

- गौरव भिडे