कवण स्तुती करु....

युवा लेख

युवा विवेक    05-Oct-2023   
Total Views |

कवण स्तुती करु....

माणूस समृद्ध होत जातो कित्येक पातळींवर; कित्येक प्रकारे तसा तो अंतरीक पातळीवरही समृद्ध होणं शक्य आहे, शक्य आहे. कारण प्रत्येक माणूस या समृद्धीची ईच्छा करतोच असं नाही. असं असलं तरी कित्येक लोक धडपडत असतात त्यासाठी, जीवाचं रान करुन धावत असतात आपापल्या परिने; स्वीकारलेलया मार्गावर. खुणावत असतं त्यांना ते सुख, हवं असतं आपल्या देवाचं दर्शन किंवा आणखी काही वेगळं. संतांना आलेला अनुभव ते सांगत राहतात आपल्याला; अभंगांमधून. धन्यतेची जाणीव होत राहते आपल्याला फक्त वाचून, अनुभव केवढा मोठा असेल, भव्य असेल.... संत गोरा कुंभार एका अभंगात म्हणतात,

कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥

परमेश्वराच्या, गुरुंच्या कृपेने येतो तो दिव्य अनुभव. जणू आपल्याला पटते आपलीच खूण.... तेव्हा सुखावून जातो तो भक्त. हे मिळवायला मात्र लागते ती 'त्या'चीच कृपा. एका वेगळ्या अभंगात संत गोरा कुंभार म्हणतात, 'देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥' जणू ते सांगतात पांडुरंगाला की मी कुंभार आहे तो तुझाच, जे काही हातून काम घडतं आहे ते तुझ्यामुळेच, जे काही काम हातून होतं आहे ते तुझंच आहे, तुझ्याच चरणांशी ते अर्पण केलेलं आहे, तू पापांचे डोंगर नाहीसे कर.... किती सहज समर्पणाचा भाव व्यक्त होतो ईथे. जणू संत गोरा कुंभार आपलाच अनुभव सांगत आहेत. जणू स्वानुभवाचा प्रकाश दिशांच्याही पल्याड जाऊन पोहोचला आहे, सुखाचं मूळच जणू गवसलं आहे मात्र स्तुती करायची ती कशी आणि कोणाची ? कोणत्या वाचेने करायची ? ज्याची स्तुती करायची तो आणि स्तुती करणारा यांमधे जणू भेद राहिलाच नाही, ज्याचा संकल्प करायचा ती गोष्ट आणि संकल्प करणारा यांत मूळी भेदच राहिला नाही, जणूकाही संकल्पाचे ओघ चित्तात गिळले गेले, जणू तेही एकरूप झाले....

मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥

दृष्टीचें पहाणें परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥ ३ ॥

तो अनुभवच मूळी इतका दिव्य आहे, विशाल आहे की त्याच्या सुखाने मन हेलावून गेलं आहे. शब्दांमधे आपण व्यक्त करु पाहतो अर्थ मात्र जणू अर्थ-शब्दात अभेद सांगणारा, लौकिकाच्या सीमा ओलांडणारा अनुभव आल्यावर सर्वार्थानेच मुकं होतं मन. आपण पाहतो तेव्हा पाहणारे आपण आणि पाहिलेल्या गोष्टी यांमधे भेद आपोआपच येतो. ईथे मात्र अनुभव आहे तो अभेदाचा, दृष्टीचं पाहाणंही राहीलं आहे मागे, जणू नेत्रपातीही निवांत झाल्या आहेत. दृष्टीच्याही पल्याड नेणारा तो अनुभव आहे....

म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें । जीवें ओवाळावें नामयासी ॥ ४ ॥

वाचेने सांगता येण्यासारखं हे सुख नाही, तसं दृष्टीने पाहण्यासारखंही नाही, ते आहे ते अनुभवण्याचं. जणू अशा सुखाचीच एक छ्टा सांगताना संत गोरा कुंभार एके ठिकाणी म्हणतात, 'मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥' आपल्या असण्यालाच रूप नसण्याची भावनाच किती वेगळी आहे.... अशावेळी त्या अवस्थेला नाव तरी काय द्यावं.... म्हणूनच जणू ते सांगत आहेत की हे सुख घ्यावं मौनाने, सुखानुभवाच्या 'त्या'च्या विशाल कक्षेत फक्त रममाण व्हावं....

- अनीश जोशी.