शुद्धता आणि पावित्र्य या दोन शब्दांच्या मधे आणि हा शब्द लिहावा, की विरुद्ध हा शब्द लिहावा हे माझं अजूनही निश्चित झालेलं नाही. सध्या आपल्या अवतीभवती असणा-या शुद्ध सोशल मिडीयावरच्या पवित्र संदेशांनी, भोवताली असणाऱ्या व्यक्तींच्या मतामतांतरामुळे नेमकेपणाने विचारच करता येत नाही. पवित्र या शब्दाची व्युत्पत्ती एकवेळ सापडेल, पण त्याचा अर्थ शब्दाकोशात पाहून ठरवता येईल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. सकाळी आपण उठतो तेव्हा तोंड धुतो, नैसर्गिक विधी मग त्यानंतर स्नानसंध्या करतो. म्हणजे थोडक्यात शरीर जितकं स्वच्छ करता येईल तितकं आपण करतो. म्हणूनच शुद्धता या शब्दाचा संबंध मानवी शरीराशी अधिक आहे. पावित्र्य शब्दाचं स्थान मनात आहे. मानवी मनाशी संबंध असणा-या या पावित्र्य शब्दाची व्याख्या 'जे पवित्र नाही ते अपवित्र आणि जे अपवित्र नाही ते पवित्र' अशी सोप्या भाषेत करता येत नाही. मनाचा समजूतदारपणा, सर्वांना सामावून घेण्याचे, आपलंसं करण्याचे संस्कार या गोष्टींशी पावित्र्य या शब्दाचा संबंध आहे.
शुद्धता किंवा पावित्र्य या शब्दाशी संबंध जोडणारा आणखी एक शब्द म्हणजे शास्त्र ! हल्ली 'शास्त्र असतं ते' असं म्हणण्याची एक पद्धत आली आहे. त्यातलाच हा शास्त्र शब्द .. हे शास्त्र म्हणजे केवळ विज्ञान नव्हे. परंपरांचा सन्मान राखत विज्ञानाशी जुळवून घेण्याची ती एक प्रकारची कलाच म्हणता येईल. आंघोळ प्रत्येक व्यक्तीच करते. आंघोळीचा संबंध शुद्धतेशी आहे. पण तो पावित्र्याशी असेलच असं निश्चितपणे सांगता येत नाही. आंघोळ करताना आपल्या मनात वाईट विचार असतील किंवा कुणाला त्रास देण्याचे विचार आले तर त्याला शास्त्रशुद्ध आंघोळ म्हणताच येणार नाही. शरीराची स्वच्छता करता करता मनात चांगल्या विचारांची रुजवणूक करावी. वाईट विचारांना त्यासाठी आधी मनातून हद्दपार करावं लागेल. असं सर्व केलं तरच ती आंघोळ शास्त्रशुद्ध झाली म्हणता येईल. शुद्धता ही आपल्या डोळ्यांना दिसते, दृश्य असते. पावित्र्य मोजण्याचं काही असं एक परिमाण नाही. पावित्र्य एक तर असतं किंवा ते नसतं. पण हल्ली धड शुद्धता नसते किंवा धड पावित्र्यही नसतं. आपल्या मनाला वाटेल ती शुद्धता किंवा मनाला वाटेल ते पावित्र्य असं ठरवून आपल्याला पुढे जाता येणार नाही. शुद्धता आणि पावित्र्य या शब्दांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो... उदाहरणार्थ मानणे किंवा न मानणे, स्वीकारणे किंवा नाकारणे.
पावित्र्य राखताना आपल्या भोवतालची माणसं, प्रत्येक व्यक्तीला पाळता येतील असे सर्वसाधारण नियम याचा विचार करावा लागतो. याबरोबरच जुन्याशी नवं जोडताना म्हणजेच शास्त्राशी विज्ञान जोडताना ते नेमकेपणाने जोडावं लागतं. पावित्र्य राखताना आपल्याला भोवतालच्या जगाचं भान हवं. ते कुणावर लादलं जाता कामा नये. ते धार्मिक असलं तरी भावनिकतेचा आदर करणाराही असावं. असा सगळा विचार केल्यानंतर शारीरिक शुद्धता करावी. हल्ली सोशल मिडीयावर बरेच संदेश पाठवले जातात, प्रकाशित केले जातात. संध्याकाळी अमुक एक गोष्ट करु नये, अमुक दिवशी दान दिल्याने संपत्ती वाढते यासारखे ते संदेश असतात. ते सरसकट खोटेच असतील असं नाही. पण ते काहीवेळा रुक्ष वाटतात. त्यात भावनेचा ओलावा फारसा नसतो. स्वतःची जाहिरात करणे, प्रसिद्धी करणे थोडक्यात 'फॉलो करायला लावून फॉलोअर्स वाढवणे' हा देखील त्यामागचा उद्देश असू शकतो. आपण भावनिक होऊन त्या संदेशाप्रमाणे कृती करतो. आपलं काम होतं मग त्या कृतीवर आपली श्रद्धा बसते. याउलट काहीवेळा आपलं काम अनेक उपाय करुनही होत नाही. एका मर्यादेनंतर आपला विश्वास संपतो. म्हणूनच अशा सोशल मिडीयावरच्या संदेशाप्रमाणे कृती करण्यात फारसा अर्थ नसतो. आज आपल्या भारतात सर्वांनाच समाजाला नुकसान पोचणार नाही असं काहीही शिकण्याचा हक्क आहे. त्यामुळे विशिष्ट जाती-धर्माला, ज्योतिषशास्त्राला, थोरा-मोठ्यांची मते आणि परंपरांना नावे ठेवण्यापेक्षा याबाबत आपल्याला काही शिकता येईल का हे पाहिलं पाहिजे. विविध ग्रंथ, पारंपारिक साहित्य, वैज्ञानिक लेख यांचा अभ्यास केला पाहिजे. शास्त्राला नावे ठेवणे, खरंच जे लेख अभ्यासपूर्ण किंवा अभ्यासपूर्ण असे जनजागृती करणाऱ्या व्हिडिओंवर नकारात्मक, जातीयवादी प्रतिक्रिया देणं हे सोपं आहे. पण त्या लेखामागचा, व्हिडिओमागचा उद्देश समजून घेऊन मग आपलं मत सभ्य भाषेत मांडायला केवळ मनाचा मोठेपणा असावा लागतो.
शुद्धता, पावित्र्य यावरुन आस्तिक आणि नास्तिक असे दोन गट अभ्यासात्मक चर्चा करण्यापेक्षा निरर्थक वाद घालण्यातच जास्त रमताना दिसतात.. अशावेळी वाटतं, सध्या सोयीनुसार आस्तिक आणि सोयीनुसार नास्तिक होऊन आपला प्रपंच चालवणारे अनेक 'विचारवंत' या समाजात आहेत.. अशा अर्ध्या आस्तिक आणि अर्ध्या नास्तिक विचारवंतांमुळे समाजाला आपली प्रगती साधता येत नाही.. तेव्हा शुद्धता आणि पावित्र्य यांचा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करणं हेच वैयक्तिक आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने गरजेचं आहे..
- गौरव भिडे