दिवाळी अंक...

युवा लेख

युवा विवेक    18-Nov-2023   
Total Views |

दिवाळी अंक...

दिवाळी म्हटलं म्हणजे साफसफाई , सजावट, पणती, आकाशकंदील, फराळ, पाहुणे, भेटवस्तू अशा अनेक गोष्टी आठवतात. वसुबारस, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज अशा एकेका सणाला छान उत्साह असतो घरात.. वेगवेगळ्या कविता आणि गीते यांच्या माध्यमातून शुभेच्छांची देवघेव केली जाते. या सा-या परंपरांबरोबरच दिवाळी अंक ही देखील एक परंपरा आहे. दिवाळी अंक दिवाळीची रंगत वाढवतात. अनेक वर्षांपासून कितीतरी वाचक दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहत असतात. पूर्वी दिवाळी अंकांची संख्या जास्त असली तरी लोकप्रिय अंक बोटावर मोजण्याइतकेच होते. काही अंकांचं तर ॲडव्हान्स बुकींग करावं लागत असे. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही दिवाळी अंकांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. ई-अंकांची त्यात वाढ झाली आहे. यातूनच दिवाळी अंकांचं महत्व आपल्याला जाणवतं.


दिवाळी अंक हा मासिकापेक्षा थोडा वेगळा असतो. मासिकाचे विषय , लेख किंवा साहित्यांची , जाहिरातींची संख्या हे सगळं आधीच ठरलेलं असतं. थोडक्यात मासिके साचेबद्ध स्वरुपाची असतात. पण दिवाळी अंकांचं तसं नसतं. लेख , कविता , साहित्य , रेसिपी , वार्षिक राशीभविष्य , जाहिराती , छपाईचे प्रमाण असे अनेक घटक मिळून दिवाळी अंक तयार होत असतो. हे सगळे घटक त्यात समाविष्ट असल्याने त्याची लोकप्रियता अजूनही तितकीच असावी. नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दिवाळी अंकासारखं उत्तम साधन नाही. विषय नेमका असा ठरलेला नसल्यामुळे लेखकाने उत्स्फूर्तपणे लिहिलेले साहित्य सादर करण्यास त्याला वाव असतो. काही अंकात मानधन देखील दिले जाते. अनेक अंक महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतात. त्यामुळे नवोदित लेखकांना थोडी प्रसिद्धी मिळण्याची संधी असते. जाहिरातींचेही तसेच असते. नवोदित लेखकांसारखीच नवनव्या जाहिरातींनाही दिवाळी अंकात संधी मिळते. नवीन व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची माहिती दिवाळी अंकातून लोकांपर्यंत पोचवता येते. वाचनालयात तर अनेक दिवाळी अंक असतात. वाचनाची गोडी लागण्यासाठी तर दिवाळी अंक उत्तमच ! वेगवेगळ्या क्षेत्रातील लेख असल्यामुळे ब-याचशा लेखात सहज व सोपी भाषा वापरली जाते. कठीण किंवा क्लिष्ट शब्दांचा वापर थोडा त्यात कमी असतो. हे साहित्य उत्स्फूर्तपणे लिहिलेले असल्यामुळे त्याचे वाचनमूल्य वाचकांच्या दृष्टीने नकळतच वाढते.


या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी अंकामुळे वाचक आणि लेखक यांचं नातं आणखी दृढ होतं. एकमेकांच्या विषयी आदर वाढतो , स्नेह वाढतो. अनेक वाचक लेखकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून साहित्याचे कौतुक करतात. एखादे साहित्य आक्षेपार्ह वाटले किंवा नवीन त्यात काही सुचावावेसे वाटले तर तसेही कळवतात. यामुळे वाचक हा आपले साहित्य बारकाईने वाचतो आहे हे लेखकाला समजते. आपल्या लेखात आपण काय बदल केले पाहिजेत , वाचकांच्या नेमक्या सूचना याचा अभ्यास करुन पुढच्या साहित्यात त्याला तशा सुधारणा करता येतात. कुठल्याही चांगल्या क्रियेला प्रतिक्रिया आली तर त्या क्रियेचं महत्व वाढतं , ती ख-या अर्थाने पूर्णत्वाला जाते. लेखक आपल्या साहित्यातून वाचकाला साद घालतो. वाचक त्याला आपल्या वाचनातून मोकळेपणाने प्रतिसाद देतो. या लेखन-वाचनाच्या साद आणि प्रतिसादातून साहित्याचं महत्व वाढत जातं. साहित्याची जपणूक म्हणजे नकळतच भाषेची जोपासना असते. दिवाळी अंकात असणा-या रेसिपींना तर आगळे महत्त्व आहे. गृहिणींना ती एक पर्वणीच असते. खाण्याची आवड असणा-या आणि खाऊ घालण्याची आवड असणा-या प्रत्येकालाच रेसिपीचं महत्व वाटत असतं. नवनवीन रेसिपी ट्राय करुन बघण्यात भारी आनंद असतो. दिवाळी अंकातील रेसिपी बघून तो पदार्थ केला जातो. त्याची चव अगदी छान झाली की आनंद होतो. आपण लगेच फोन हातात घेऊन रेसिपीच्या खाली दिलेल्या नाव-नंबरशी संपर्क साधतो. ज्यांची ती रेसिपी आहे त्यांना देखील एक समाधान वाटतं. त्यामुळे दिवाळी अंकाचं विश्व हे दिवाळीपुरतं मर्यादित नसून ते वर्षभर सुरुच असतं. फक्त त्याची सुरुवात मात्र दिवाळीत झाल्यामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होतं.


आता ई दिवाळी अंकांची परंपरा वाढत आहे. त्याचबरोबर नवनवीन छापील अंकही तितकेच प्रकाशित होत आहेत. त्यामुळे साहित्यातील ते एक महत्त्वाचे माध्यम आहे. शब्दांच्या पलीकडला केवळ साहित्यातून होणारा वाचक आणि लेखकांचा , रेसिपी आणि खव्वयांचा , खरेदीदार आणि व्यावसायिकांचा हा सुंदर असा संवाद आहे. दिवाळीत आपण जशी नवनवीन वस्त्रे परिधान करतो , वेगवेगळ्या पदार्थांचा एकत्र करुन छान फराळ करतो , फटाके उडवतो , आनंदाने सण साजरा करतो तसंच दिवाळी अंकाचाही त्यात समावेश व्हावा. जे लोक दिवाळी अंक वाचत नाहीत त्यांनी या वर्षापासून नक्की वाचायला सुरुवात करा. माझी खात्री आहे तुम्हाला दिवाळी अंक वाचताना छान मौज येईल..

आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा !

- गौरव भिडे