जनरेशन गॅप..

युवा लेख

युवा विवेक    25-Nov-2023   
Total Views |

जनरेशन गॅप..

बदल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नवीन बदल स्वीकाराणं म्हणजे अधुनिक होणं , ही जगण्याची व्याख्याच झाली आहे. कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते स्वीकारायचे नाहीत हे व्यक्तिपरत्वे भिन्न असले तरी बदल स्वीकाराण्याची प्रवृत्ती ही प्रत्येक व्यक्तीत थोड्याफार प्रमाणात असतेच. मग पिढी म्हणजेच जनरेशन हा घटक तरी त्याला कसा अपवाद ठरेल ! मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही वेगळी असणारच.. बदलाची ही एक साखळी असते. त्या साखळीत हस्तक्षेप केला किंवा त्या बदलाच्या साखळीला स्पर्श केला की जनरेशन गॅप नावाचं स्टेशन लागतं. मग ही गॅप वागण्या-बोलण्यात जाणवायला लागते.


आमच्या वेळी असं नव्हतं , तुमच्यावेळची गोष्ट वेगळी होती.. वगैरे वाक्य कानावर पडली की ही जनरेशन गॅप आपल्याला जाणवू लागते. एकवेळ मणक्याची गॅप वैद्यकीय उपचारानी भरुन येईल ; पण जनरेशनची गॅप भरुन येणं अवघड आहे. ही गॅप तुम्ही जितकी भरु पाहता तितकं उलट अंतर वाढत राहील. त्यामुळे ती भरण्याचा प्रयत्न करुन फारसा उपयोग नाही. त्याऐवजी बदल स्वीकारण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला चालना द्यायला हवी. पुढची पिढी बदलतेय असं वाटणारी पिढी त्यांच्या मागच्या पिढीपेक्षा बदललेलीच असते. कालानुरूप प्रत्येक माणूस बदल हा स्वीकारतोच. या गॅपचं प्रमुख कारण म्हणजे सामाजिक वातावरण हे आहे. सोळाशे-सतराशे सालातील शिवकालीन पद्धती वेगळ्या होत्या , सतराशे अठराशे सालात पेशवेकालीन पद्धती वेगळी होती , ब्रिटीशकाळात त्यात आणखी बदल झाले , अधुनिक युगात अजूनही बदल होत आहेत. युद्ध , व्यापार , मैत्री , करार अशा अनेक कारणांमुळे दोन देशांचा एकमेकांशी संबंध येतो. आर्थिक , सामाजिक देवाणघेवाण होत असताना सांस्कृतिक देवाणघेवाण होत असते. या संस्कृतीचा थेट परिणाम आपल्या आचार-विचारांवर होत असतो. त्यामुळे पिढी बदलेल तसं नवनवीन बदल होत राहतात. त्यामुळे कुठल्या पिढीला मागे टाकण्याच्या उद्देशाने हे बदल होत नाहीत. ती मुळातच एक सहज घडून येणारी प्रक्रिया आहे. या सा-या बदलांचं एकत्रित नाव म्हणजे जनरेशन गॅप..


वागण्या-बोलण्यातून ही गॅप जाणवते. मागच्या पिढीत वडिलांना , नव-याला अहो-जहो म्हणत असत. आता अरे-तुरे म्हणतात. आपला नातू त्याच्या वडिलांना 'ए बाबा' असं म्हणतो तेव्हा त्या आजीला आवडत नाही. सूनेनं नव-याला अरे तुरे म्हटलं तर ते तिला खपत नाही. समजवण्यास जावे तर वाद होतात. तिथे गॅप तयार होते. आता कदाचित पुढची पिढी वडिलांना नावाने देखील हाक मारेल. ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. या गोष्टी किंवा बदल एका ठराविक वयानंतर स्वीकारता येत नाहीत तिथे एकमेकांच्या पिढीचा यथेच्छ उद्धार केला जातो. पण तरीही अमुक पिढी योग्य , तमुक पिढी अयोग्य असं नेमकेपणाने म्हणता येत नाही. त्यामुळे एकमेकांना नावं ठेवण्याआधी रितीभाती , पद्धती या का आहेत , त्यांचा उगम का झाला असावा , जीवनात किंवा दैनंदिन आयुष्यात त्यांचं नेमकं स्थान काय असे विचार केले पाहिजेत. आता जुनी पिढी अधुनिकतेकडे वळते आहे ही सकारात्मक बाब आहे. यंत्रयुगाला नावे ठेवण्यापेक्षा यंत्रयुगाशी ही पिढी मैत्री करु पाहत आहे. मोबाईल , संगणक यासारखी साधने आणि त्यावरील विविध ॲप व माध्यमांचा वापर ही पिढी करते आहे. पण तरीदेखील कुठेतरी जनरेशन गॅप असल्याचे जाणवते. अर्थात ती असणारच. आपणही मैत्री करताना आपले विचार ज्याच्याशी जुळतील त्याच्याशीच मैत्री करतो. यात समवयस्क गट अधिक असतो. आपल्या वयानुरूप व्यक्ती आपले मित्र असतात. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींचं आपल्याशी लगेच जमेल असं सांगता येत नाही.


ही जनरेशन गॅप भरुन येण्यासाठी आपण ऐकून घेण्याची थोडीफार सवय स्वतःला लावायला हवी. आपलं कुणीतरी नुसतं ऐकून घ्यावं हीच ज्येष्ठ मंडळींची छोटीशी मागणी असते. मागच्या पिढीनी देखील पुढच्या पिढीला ठेवायची म्हणून नावे ठेवू नयेत. नावे ठेवण्यामागे काहीतरी मुद्दा , काहीतरी कारण , अर्थ निश्चितच असावा. आपल्याला गॅप भरुन काढता येणं शक्य नसलं तरी ती गॅप आपण वाढवत तर नाही ना , याकडे नक्की लक्ष द्यावं. डाॅ. विजया वाड यांचं 'तिसरी घंटा' हे पुस्तक वाचलं की आपल्याला ब-याच प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. यात जनरेशन गॅप या स्पेसिफिक विषयावर भाष्य केलेलं नसलं तरी त्याकडेच थोडाफार झुकणारा पुस्तकाचा विषय आहे. वपुंचं कितीतरी सुंदर साहित्य उपलब्ध आहे. अनेक लेखकांनी आपल्या साहित्यातून यावर भाष्य केलेलं आहे. त्यामुळे साहित्याचा आधार अगदी आवश्य घेता येईल. संगीतासारखी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. सात सूरांचा जसा मिलाफ करतो तसा दोन पिढ्यांचा मिलाफ व्हावा म्हणून काही संगीतात करता येण्यासारखं आहे. खेळाच्या माध्यमातून ही गॅप दूर करता येईल. कितीतरी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. संगीत , कला , क्रीडा , साहित्य , योग , पर्यटन , अध्यात्म या साध्यासोप्या गोष्टी वापरुन गॅप भरुन काढता येईल.. 'आमच्यावेळी' आणि 'तुमच्यावेळी' या शब्दांना ' आपल्यावेळी 'या एकाच शब्दांत गुंफता यायला लागलं म्हणजे जनरेशन गॅप थोडी कमी होईल.. पण या जनरेशन गॅप मधल्या गोड रुसव्या-फुगव्यांच्या प्रेम वाढवणा-या भांडणांपुरतीच जनरेशन गॅप असावी..


- गौरव भिडे