एकटी तू गाणे गासी..

युवा लेख

युवा विवेक    05-Nov-2023   
Total Views |

एकटी तू गाणे गासी..

झाडलोट करता करता, शेण आणता टाकताना जनाबाई गाणं गात आहेत. गाणं? कदाचित त्यांच्या विठ्ठलाचंच, कदाचित एखादं लोक गीत, ओवी कुठलंतरी गाणं त्यांच्या ओठांवर लहरत आहे. श्रम हलके होत आहेत आणि गाण्यातून मनाला घातलेली साद त्यांना आतला आनंद देत आहे. गावकर्‍यांसाठी जनाईच्या कामाचं हे दृश्य अपरिचित नाही. त्यात काही वेगळंही नाही. पण आज.. आज मात्र जनाबाई गात आहे, एकटीच गात आहे, पण तिच्या शब्दामागून दुसरा शब्द उमटतो आहे. कुणीतरी तिच्या बरोबर राहून गाण्यात सोबत करावी तसा तो आवाज. पण आजूबाजूला कुणी म्हणता कुणीच नाहीय. तो आवाज कुणाचा? ती सोबत कुणाची? हे स्वाभाविक प्रश्न पडून तिला विचारलं जात आहे.. तुझ्या सोबत निरंतर गाणं गाणार आहे तरी कोण? तेव्हा जनाबाई जे उत्तरतात ते किती वेगळं आहे. त्यांच्यासाठी तितकंच सहज, स्वाभाविक आणि आपल्यासाठी तितकंच अद्भुत, तितकंच अलौकिक आणि विलक्षण! त्या म्हणतात की तो पांडुरंग नाही का विटेवरी, तोच तर आहे माझ्या सोबत. निरंतर! तो माझा पिता आहे, म्हणूनच रखूमाई माझी माता झाली आहे.. विठ्ठल रुक्मिणीला पितामाता मानणार्यांचं घर होतं नामदेवांचं. त्यांच्या घरी येऊन मी धन्य झाले हा जनाबाईंचा निर्वाळा. अनुभवातून आलेला हा कृतार्थतेचा सानंद उद्गार. हा एक सुंदर नि तितकाच अद्भूत प्रसंग किंवा कथात्म अनुभव मांडणारा जनाबाईंचा अभंग आहे.

एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥

कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥

पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥

ऐशियाच्या घरीं आलें । जनी ह्मणे धन्य झालें ॥४॥

वर वर पाहता हा जनाबाईंच्या आयुष्यातील प्रसंग वाटतो. तो खरंच घडला होता का? असं विचारणारे अनेक असतीलही. पण पांडुरंगालाच प्रत्यक्ष अनुभवल्याचे, माणसासारखे वागवल्याचेचे जनाबाईंचेच अनेक अभंग पाहता हा अभंगही खरा मानण्यास पुष्कळ वाव आहे. तो खरा प्रसंग असेलही. पण वाटतं, की त्याहूनही अधिक व्यापक अर्थ या अभंगातून मिळतो. तो अर्थ स्विकारणं तर आणखीन सहज आणि भावसुंदर आहे. या अभंगात म्हटलेले 'गाणे' हे एखादे विशिष्ट गीत थोडीच आहे? ते आहे जनाबाईंच्या आयुष्याचं गाणं. आपल्या आयुष्याचं गाणं त्यांनी गायलं ते अगदी एकट्यानेच यात शंका नाही. 'माय मेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला' असा त्यांचा एखादा करुणार्त उद्गार असेल किंवा 'तुज वाचूनी विठ्ठला, कुणी नाही रे मजला' ही त्यांच्या जाणिवेची प्रांजळ अभिव्यक्ती कदाचित कबुलीही असेल, यावरून लौकिक जगातील त्यांचं एकटेपण स्पष्ट होतं. असं असलं तरी त्या एकट्या कुठे होत्या? त्यांचा अलौकिकातला 'दुजा शब्द' त्यांच्या बरोबर निरंतर होता. केवळ आशीर्वाद वा कृपारूपाने नाही, तर लौकिक रूप घेऊन होता हे त्यांच्या अभंगांतून अखंड दिसत राहातं. विठ्ठल नावाचं सावळं परब्रह्म त्यांच्यासाठी जितकं लौकिक झालं, जितक्या वेळा त्याने त्यांच्यासाठी कामं केली, त्याचं तितकं लौकिक होणं क्वचितच कुठल्या अन्य संत चरित्रात दिसून येतं. म्हणूनच तो दुजा शब्द त्यांच्यासाठी अखंड साकार होता. झाडलोट करताना केर भरणारा, न्हाऊ घालणारा, काळजी घेणारा तोच तर होता! त्यामुळे हे गाणं आहे ते जनाबाईंच्या आयुष्याचं. त्यांच्या नशिबी ते एकटेपणाने गाणं असलं तरी तसं झालं नाही. कारण नश्वर नशिबापुढे उभा होता तो साक्षात विठ्ठल! जनाबाईंचं आयुष्य म्हटलं की डोळ्यांसमोर कायम एक चित्र उभं रहातं. दिसतात जनाबाई जात्यापुढे बसून जातं फिरवताना, आणि दिसतो विठ्ठल त्यांच्यासमोर बसून जात्याला सप्रेम हातभार लावताना. जनाबाईंच्या आयुष्याचं जातं असं या दोघांनी मिळून फिरवलं. ते फिरवताना गाणंही दोघांनी मिळूनच तर गायलं! त्यातूनच आलेला प्रसाद म्हणजे जनाबाईंचे अभंग!

संतांना हवासा वाटणारा एकांत स्वागतार्ह असला, तरी एकाकीपण मात्र त्यांच्या आणि विठू भक्तांच्या वाटेला कधीच लिहिलेलं नाही. कारण, आपण कधीही कुठेही कसेही असलो, तरी 'तो' सोबत असोच ही अढळ श्रद्धा. अनुभवाला येणारी श्रद्धा! त्याची सोबत तर जन्मांना पुरून उरणारी, त्यात एखादा प्रसंग तर किती लहान म्हणावा! पण असा एखादा प्रसंगच निरंतर सोबतीची खूण मनोमन पटवून देतो हे मात्र नक्की. संतांनी गायलेल्या अभंगांमधे त्याचाच दुजा शब्द आहे. तो दुजा शब्द श्रेय न घेता शांत प्रसन्न उभा आहे. पण विशेष गंमत म्हणजे पहिला शब्द तिथे.. त्या सोबतीच्या दुसर्‍या शब्दाकडेच नेणारा आहे. पहिल्या शब्दाचं, पहिल्या गाण्याचं चिंतन मनापासून करुचयात, पण सोबतीला तो दुजा शब्द ऐकण्याचाही प्रयास करुयात.

ऐकूयात.. ऐकू येईल!

- पार्थ जोशी