शांता शेळके......

मराठी साहित्याच्या अमूल्य ठेव्यामधलं समृद्ध दालन म्हणजे शांता शेळकेंचं साहित्य.

युवा विवेक    21-Dec-2023   
Total Views |

शांता शेळके
मराठी साहित्याच्या अमूल्य ठेव्यामधलं समृद्ध दालन म्हणजे शांता शेळकेंचं साहित्य. त्यांच्या साहित्यावर लिहिणं म्हणजे सामान्य मानवी डोळ्यांनी सुर्याचं निरिक्षण करण्यासारखंच आहे. त्यांना 'साहित्य शारदा' म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही. मराठी कविता आणि गीतलेखनाचा परमोच्च बिंदू म्हणजे शांता शेळके असं त्यांचं चित्र प्रत्येक मराठी माणसाच्या अंतरंगात त्यांच्या लेखनाने कोरलं गेलं आहे. त्यांची बहुतांशी गाणी प्रत्येक मराठी ओठांवर आजही इतकी सहज रेंगाळत राहतात आणि त्यांचं, त्यांच्या लेखनाचं महत्व नेहेमीच पटत राहतं. शांताबाई विविध साहित्य प्रकारांत मुक्तपणे वावरल्या आणि आपल्या प्रतिभेचा कुंचला फिरवत जणू आपल्यालाच समृद्ध करत गेल्या.
शांता शेळकेंची गाणी, त्यांच्या कविता फार प्रसिद्ध असल्या तरी त्यांचं गद्य लेखनही फार महत्वाचं आहे.
शांताबाईंनी कधीच शब्दांची विनाकारण उधळण केली नाही. त्यांनी त्यांच्या लेखनातून नेहेमीच समर्पक शब्दांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या गद्य लेखनाच्या पुस्तकांतील प्रत्येक पानावर आपल्याला समृद्धीचा एक वेगळा अनुभव येतो, कमीत-कमी शब्दांत त्या खूप काही सांगून गेल्याचा अनुभव त्यांचं लेखन वाचताना नेहेमीच येत राहतो. 'एकपानी' आणि या सारख्या अनेक पुस्तकांत त्यांनी त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांना, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांना, आठवणींना शब्दरूप दिलेलं पहायला मिळतं.
त्यांच्या लेखनातील त्यांची समर्पक शब्दांची योजना आणि सहज, साधी शैली प्रत्येक वाचकाला भावेल अशीच आहे. त्यांचे हे अनुभव, त्यांच्या या आठवणी वाचताना आपल्याला त्या आपल्या डोळ्यांसमोर फक्त दिसतच नाहीत तर त्यांतून त्यांच्या अंतरंगाची कोमलता आपल्याला प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायची त्यांची वृत्ती नेहेमीच आदर्श वाटते. त्यांच्या या प्रकारातल्या लेखनातून त्यांच्या आठवणींचा सुगंध नक्कीच प्रत्येक वाचकाच्या अंतरात गंधाळत राहतो. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि उत्तम स्मरण शक्ती आपल्याला त्यांच्याच लेखनाच्या माध्यमातून कळते. भाषेची, शब्दांची आवडही पहायला मिळते. एका लेखात त्या त्यांची एक आठवण सांगताना लिहीतात की, त्या एकदा अभ्यास सहलीसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांसह बाहेर गेल्या होत्या. तिथे एका वाड्यात ते सगळे रात्री थांबले होते. सगळी मुले झोपलेली होती आणि फार पहाटे त्यांना जाग आली. त्या उठल्या आणि वाड्याबाहेर आल्या, तेव्हा त्यांची नजर आकाशाकडे गेली, तसा काळोखच होता, चंद्र आकाशात होता, चमकणाऱ्या चांदण्या दिसत होत्या आणि झाडावरच्या चिमण्या आवाज करत होत्या. तेव्हा एकदम 'चिमण चेटूक चांदणंं' हा कुठेतरी आधी ऐकलेला वाक्-प्रचार त्यांना आठवला. कदाचित तेव्हा त्याचा अर्थ त्यांना फारसा कळलेला नव्हता. तेव्हा, इतकं लख्ख चांदणं पडलेलं होतं की जणू सूर्यच उगवला आहे असं वाटुन चिमण्यांचा चिवचिवाट चालू झाला होता, तेव्हा 'चांदण्याचा इतका प्रकाश की चिमण्यांचं चेटूक होईल' हा त्या वाक्-प्रचारामागचा अर्थ त्यांना कळला. ईथे त्यांची अभ्यासू वृत्ती सहज दिसून येते. इतक्या पहाटेही एखादा वाक्-प्रचार आठवण्यामागे त्यांची शब्दांप्रतिची, भाषेप्रतिची निष्ठा दिसून येते, शब्दांची ओढ दिसून येते आणि नकळत आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो.
गीतलेखनातही त्यांनी कधीच विनाकारण जड शब्द वापरले नाहीत. गीतलेखनाच्या माध्यमातून त्यांचं नाव घरा-घरात पोहोचलं. शब्दांची विषयानुरुप केलेली मांडणी त्यांच्या गाण्यांमधे आपल्याला सहज दिसून येते. त्यांनी रचलेल्या सीनेमांच्या गीतांची संग्रहीत पुस्तकेही आहेत. त्यातली बहुतांश गाणी आपल्या ओळखीची आहेत ती त्यांच्या शब्दांमुळे-अर्थांमुळे. अतिशय गोड आणि मधाळ शब्द वापरुन त्यांनी लिहिलेली, 'वल्लव रे नाकवा....', 'सारंगा माझ्या सारंगा....' यांसारखी तरल कोळी गीतं रसिकांना आजही भावतात. 'गणराज नटरंगी नाचतो....', ' मागे उभा मंगेश....' यांसारख्या त्यांच्या रचना भक्तीच्या दिव्य रंगांची उधळण अंतरंगात करतात. 'पहा टाकले पुसूनी डोळे....' ' जीवलगा राहीले दूर घर माझे....' ही मुक्या भावनांना शब्दरूप देऊ पाहणारी गाणी काळाची सीमा ओलांडताना आज नक्कीच पहायला मिळतात. गीतलेखनातलाच एक उपप्रकार म्हणता येईल तो म्हणजे 'बालगीत'. 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....' म्हणत जणू त्यांच्यातल्या प्रेमळ आजीने लहान मुलांना जिथे कुणी मोठं किंवा लहान नाही असा स्वप्नातला गाव दाखवला. 'वाऱ्याचा  रंग', 'रंजक गोष्टी', यासारखी त्यांची बालसाहित्यात्मक पुस्तकं म्हणजे लहान मुलांसाठी खजिनाच आहे.
शांता शेळके म्हणजे फुला-फुलातच नव्हे तर प्रत्येकाच्या अंतरंगात हळुवार हसणारी कविताच म्हणावी लागेल....
~ अनीश जोशी.