आतून येते कविता...

कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक ओळी नाचू लागतात.

युवा विवेक    23-Dec-2023   
Total Views |
 
आतून येते कविता
   कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक ओळी नाचू लागतात. लहानपणापासून आपण कविता वाचत आलो आहोत. पूर्वी काव्यसंमेलन , वृत्तपत्रे , मासिके आणि काव्यसंग्रह इतकीच कवितेची पोच होती. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक मार्ग कवितेला उपलब्ध झाले आहेत. पूर्वी काव्यरसिक आवर्जून काव्यसंग्रह विकत घेत असत किंवा वाचनालयात पुस्तक मागवण्याच्या सूचना देत असत. आता सोशल मिडीयावर कुठूनही , कुठेही , कधीही , कुणालाही कविता पाठवणं सहज शक्य झालंय. त्यामुळे काव्यसंग्रहांना एक प्रकारची मर्यादा आली आहे. पण प्रसिद्धीचा विचार करता त्यात फारसा बदल झालेला जाणवत नाही.. कवीच्या प्रतिभेचा मान अजूनही राखला जातो , हीच काय ती समाधानाची बाब ! ही कविता रसिकांच्या ह्रदयात वास करते हे आपल्याला ठाऊक आहे पण ती नेमकी येते कुठून हे मात्र त्या कवितेच्या कवीलाही ठाऊक नसतं.. कविता लिहिण्याच्या दिवशी त्याला निसर्गाकडून , भगवंताकडून एखादा संदेश देखील येत नाही. कविता येण्याआधी स्थानकावर होते तशी कुठली अनाउन्समेंट सुद्धा होत नाही.. ती आली की एकदम येते.. लांब पल्ल्याची गाडी डब्यामागून डबा घेत जशी जाते तसे शब्दामागून शब्द येतात.. ती येण्यापूर्वीचा क्षण आणि ती येऊन कागदावर उतरवल्यानंतरचा क्षण यात कितीतरी फरक असतो.. पण तरीसुद्धा कविता नेमकी येते कुठून हा प्रश्न आपल्याला पडतोच.. एखादी कविता कुणाला आवडली तर बरेचदा , " कसं काय सुचतं तुला?" किंवा "कुठून सुचलं?" असं काही जण मला विचारतात. त्यावेळी सुचेल ते उत्तर मी देतो.. पण खरंच ज्या प्रश्नाचं उत्तर मलाही ठाऊक नाही तर मी ते देणार तरी कसं..

   आजवर अनेक लेखक आणि कवी मंडळींनी मनाला डोहाची उपमा दिली आहे , ती अगदी बरोब्बर आहे. मन म्हणजे एक डोह.. स्वतःलाही ज्याच्यात काय आणि किती भरलेलं आहे याचा पत्ता लागत नाही असा डोह.. भूत , वर्तमान , भविष्य या तिघांचा प्रवाह मनातून उगम पावतो आणि पुन्हा मनालाच येऊन मिळतो. म्हणूनच तर मन गूढ असतं. एखादी गोष्ट मनापासून स्वीकार , मन:पूर्वक शुभेच्छा वगैरे शब्द आपण म्हणूनच तर वापरतो.. अशा या पत्ता न लागणा-या मनातूनच कवितेचा उगम होतो किंवा त्या डोहातूनच कविता उगम पावत असावी. कविता करता येत नाही अशी व्यक्ती जगात नसते. प्रत्येकच व्यक्ती कविता करु शकते. जसं आपण तबला किंवा व्हायोलिन किंवा कुठलंही वाद्य वाजव असं म्हटलं की नुसतं हात त्यावर थोडा आपटून किंवा व्हायोलिनच्या तारांना स्पर्श करुन नाद निर्माण करु शकतो म्हणजेच वाजवू शकतो. पण त्याला वादन म्हणता येणार नाही. त्यासाठी स्वतःच्या आतल्या वादकाची स्वतःला ओळख व्हावी लागते. वादनाचं खास कौशल्य आत्मसात करावं लागतं. हे जे 'आतून' येणं आहे ते आल्याशिवाय वाद्य वाजवता येत नाही. तसंच कवितेचं आहे. कविता 'आतून' येते. त्यासाठी कवीपण असावंच लागतं. असंख्य भावनांतून नेमक्या भावनेला आपला स्पर्श व्हावा लागतो. स्पर्श झाला की त्या भावनेवर हळूहळू तरंग निर्माण होतात.. त्यातल्या काही तरंगातून शब्द साद घालू लागतात.. त्या साद घालणा-या शब्दांची कविता तयार होऊ लागते.. हातातल्या लेखणीतून शब्द कागदावर उमटू लागतात.. त्या शब्दांना लय मिळाली की त्याची कविता होते. हे सारं क्षणार्धात घडून येतं किंवा शंभर- दोनशे - पाचपाचशे दिवससुद्धा काहीवेळा वाट पहावी लागते. पण हे देखील क्षणार्धात होईल का शंभर दिवसात होईल ते निश्चित सांगता येत नाही. त्या मनातल्या भावनेला तुमचा नेमकेपणाने स्पर्श होणं ही कवितेची प्रथम कृती ! त्यामुळे कागद आणि लेखणी आपल्याजवळ आहे म्हणजे कविता करता येत नाही.. भावनांचं आभाळच्या आभाळ आपल्याजवळ हवं !

   आता तुम्ही म्हणाल , पण कवितेच्या तर कार्यशाळाही असतात.. तिथे जाऊन आम्ही कविता शिकू शकतो. कविता शिकवता येते किंवा कार्यशाळा असते या विधानाशी मी देखील सहमत आहे.. कविता कशी लिहावी किंवा छंद , अलंकार आणि एकूणच व्याकरण म्हणजेच भाषेच्या नियमानुसार ती कशी लयबद्ध करावी ह्याची कार्यशाळा असते.. पण प्रतिभा तुम्हाला येताना वरुनच आणावी लागते.. त्या प्रतिभेशी मिळतीजुळती प्रतिमा तुम्हाला सापडली की कविता तुम्हाला करता येईल.. कविता म्हणजे प्रतिभा आणि प्रतिमा यांचा मिलाफ आहे. म्हणूनच कवितेसाठी आणखी एक शब्द वापरला जातो तो म्हणजे , स्फुरणे ! जन्म , मृत्यू , मातृत्व , माया , प्रेम , वात्सल्य , अन्याय , एकटेपणा , निसर्ग , मित्र, बाप इत्यादी इत्यादी अनेक विषयांवर कविता करता येते. त्या भावना तुमच्या मनात हव्यात आणि त्या भावनेला स्पर्श व्हायला हवा.. म्हणूनच आतून येते कविता...

- गौरव भिडे ,
पुणे
२३ डिसेंबर २०२३