ये दोस्ती.....

युवा विवेक    01-Mar-2023   
Total Views |

ये दोस्ती.....
असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. तसं मी माझ्या बाबतीत असं म्हणेन की अधूनमधून पांढऱ्यावर काळं करण्याची माझी जी धडपड चालू आहे, त्यासाठी प्रेरणा देणारा तू आहेस. तुझी माझी ओळख होण्यापूर्वीही कधीतरी काहीतरी सुचलं की मी लिहून ठेवायचे. पण ते लिखाण झाल्यावर अगदी कोरडं वाटायचं मला. म्हणजे नक्की शब्दात सांगू शकणार नाही, पण परत लगेच काही लिहावं असं वाटायचं नाही आणि सुचायचंही नाही. असं का व्हायचं ते कारण तेव्हा कधी कळलं नव्हतं. पण तुझी भेट झाली आणि लक्षात आलं. एखाद्या सौंदर्यवतीला तिच्या रुपाचं केलेलं कौतुक जसं आणखीन खुलवतं, तसं आपण लिहिलेल्या लिखाणाचं कौतुक करुन त्याला खुलवणारं कोणीतरी आसपास हवं असं वाटतंच की लिहिणाऱ्याला. तेच काम तू अगदी योग्य वेळी केलंस. कौतुक कोणाला नको असतं रे. पण लिहिलेलं वाचा वाचा म्हणून मागं लागून मिळणारं कौतुक नको होतं मला. ताजं ताजं लिहिलेलं असताना त्याचं कौतुक झालं की एखादं ताजं रसदार फळ खाल्ल्यावर कसं फ्रेश वाटतं ना तसं वाटतं. मनाला छान ओलावा देतं आणि नवीन विषयाचं बीज रोवायलाही मदत करतं. तुझ्याकडून कौतुकाचा तो ओलावा मिळाला आणि तिथून माझी ही धडपड सुरु झाली. मी काही लिहिलं की पहिल्यांदा तुला वाचायला पाठवायचे. तू ही ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीतून सवड मिळाली की वाचून लगेच रिप्लाय करायचास मला. मी तर काय वाटच बघत असायचे तुझ्या मेसेजची. भले तुझा रिप्लाय शब्दात बांधलेला नसला, ईमोजी असल्या तरी मी लिहिलेलं मनापासून वाचतोयस हे कळायचं मला त्यातून. खरंच वाचायचास ना? की मला उगा….असं मी गमतीतीही विचारणार नाही तुला. पण कधी वेळ नसला तर नंतर वाचतो म्हणून मेसेज यायचा तुझा आणि म्हटल्याप्रमाणे नंतर वाचून रिप्लाय द्यायचास. तू वाचणार, कौतुक करणार, बदल सुचवणार याबद्दल खात्री होती. म्हणून तर लिहिलेलं सगळं तुला पाठवत होते.
कितीतरी दिवस मला तुला हे सांगायचं होतं, पण कसं सांगू कळत नव्हतं. प्रत्यक्ष कधी भेट झाली असती तर समोरासमोर तुला सांगायला नक्कीच आवडलं असतं मला. पण अजून भेटलोच कुठं आहोत आपण. म्हणून म्हटलं निदान पत्र पाठवून तरी कळवावं तुला. मी लिहिलेलं तू पहिल्यांदा काय वाचलं होतंस ते आता मला आठवत नाहीये, पण ते वाचूनच थोड्या दिवसांनी तुझा आलेला मेसेज मला आठवतोय…'नवीन काय लिहिलंस?' तुझा हा तीन शब्दांचा मेसेजच मला सुखावून गेला होता. तेव्हा नवीन काही लिहिलं नव्हतंच; नेहमीप्रमाणे सुचतही नव्हतं. म्हणून वेड्यासारखं तुलाच विचारलं होतं की काय लिहू? आठवतंय का? तुझं त्यावर उत्तर आलं होतं…काहीही. खरंतर हसू आलं होतं या उत्तराचं. पण मग त्यातूनच खरंच 'काहीही' लिहायला सुचत गेलं. काहीतरी हलकंफुलकं लिहीत राहिल्यामुळं मन फ्रेश राहिलं…अजून नवीन नवीन विषय मिळत गेले आणि हात लिहिता राहिला. कधी कधी आपल्या गप्पांमधूनही विषय मिळत होते, तर कधी विषय हवाय म्हटल्यावर विषयही पुरवले आहेस तू. आताही ही एवढी पत्र लिहायची म्हटल्यावर विषय काय घ्यायचे विचारात पडले होते. पण एक दिशा आपोआप मिळाली आणि पटापट विषय सुचत गेले. कारण यावेळी जरी आधी तुला वाचायला पाठवलं नसलं तरी वाचल्यावर कौतुक करायला तू आहेसच हे पक्कं माहीत होतं ना मला.
लग्नाच्या गाठी जशा स्वर्गातच बांधलेल्या असतात तशा मैत्रीच्या गाठीही बांधलेल्या असतात का? प्रश्न पडतो मला कधी कधी. नाहीतर बघ ना…शाळेत असताना कधी वर्गाच्या चार भिंतीत एकत्र बसलो नव्हतो, तेव्हा कधी नावाने देखील ओळख नव्हती आणि आता….दोघं दोन दिशांना असलो, भेट झाली नसली तरी मैत्री अशी की जसं काही लहानपणापासून एकत्र बागडलोय. पण अजूनही भेटलो नसलो तरी तसं कधी जाणवलंच नाही नै का? आता तर तसं बोलणंही कमी झालंय, पण त्यानं काय मैत्री कमी होत नाही ना. काय वाटतं तुला?
मला लिहितं केलंस, लिहितं ठेवलंस म्हणून पहिलं पत्र तुला लिहून श्रीगणेशा करायचा विचार करत होते खरंतर, पण मनाने मोडता घातला. मनाचं म्हणणं पडलं की लगेच नको पाठवू. एखाद्या मैफिलीत कसं भैरवीचे कोमल सूर छेडले गेले की मैफल संपत आल्याची जाणीव होते. तुला लिहिलेलं पत्र तसं असू दे असा मनाने निर्णय घेऊन टाकला. मग काय….पण मनाचं ऐकलं ते बरं केलं. भैरवीच्या सुरातून कशी एक प्रकारची तृप्ती, समाधान, सफलतेची जाणीव होत असते की नाही…हे पत्र लिहून तसं वाटतंय आता मलाही. आभार, धन्यवाद हे शब्द मी वापरणारच नाहीये. कधी कधी हे असले शिष्टाचार विसरुन जायला आवडतं मला. तसं आताही विसरलेय. आता कधी भेटणार? हे ही विचारणार नाही. जर मैत्रीची गाठ बांधली आहे तर आपली भेट होणार, नाही होणार ते ही ठरलेलं असेलच आधी. त्यामुळं भविष्यात होणाऱ्या, न होणाऱ्या भेटीबद्दल विचार करत नाही. पत्रलेखनाचेही शिष्टाचार पाळावे वाटत नाहीयेत. त्यामुळं पत्र लिहिणं जसं अचानक सुरु केलं तसंच अचानक थांबवतेही.
जस्मिन जोगळेकर.