होमिओस्टॅसिस आणि मानवी निष्काळजीपणा

युवा विवेक    15-Apr-2023   
Total Views |

 
Homeostasis and human negligence

 
नमस्ते मित्रांनो! कसे आहात सर्व? मजेत ना? चला तर मग, आज एका वेगळ्याच पण खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. तो विषय म्हणजे,

Homeostasis and human negligence

Homeostasis म्हणजे शरीराची स्वतःला स्थिर राखण्याची क्षमता. ही स्थिरता सगळ्याच बाबतीत असते. शरीर स्वतःचे तापमान, आरोग्याची पातळी, रक्तपेशी, इतर घटक योग्य प्रमाणात राखण्यासाठी स्वतः कार्यरत असते. त्याच प्रमाणे शरीरातील ऊर्जेचे प्रमाणसुद्धा योग्य पातळीत राखले जावे अशी यंत्रणा शरीरात असते. हे काम अंतर्गत पातळीवर करणे शरीराला शक्य झाले नाही, तर शरीर आपल्याला काही सिग्नल. देते. काही उदाहरणे देऊन हे समजावते.

१. आपल्या शरीराचे तापमान उन्हाळ्यात वाढू लागले तर ते पुन्हा स्थिर करण्यासाठी आपले शरीर स्वेदग्रंथी कार्यान्वित करते. आपल्याला घाम येतो आणि तापमान पुन्हा कमी होते.

२. आपल्या शरीरात आपण अन्नाच्या रूपात जी ऊर्जा घेतो, त्याचे एकूण तीन भाग होतात. साठ टक्के ऊर्जा अशा कार्यांसाठी वापरली जाते जी जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके, अन्न पचन, रक्ततयार होणे, मेंदूचे कार्य, इत्यादी. उरलेल्या चाळीस टक्के उर्जेपैकी तीस टक्के ऊर्जा इतर हालचालींसाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, चालणे, हालचाली करणे, इत्यादी. बाकीची दहा टक्के ऊर्जा अन्न स्वतः स्वतःला पचवण्यात खर्च करते. समजा एखाद्या दिवशी आपण दिवसभर काही खाल्ले नसेल, भूकेचे सिग्नल मिळूनही आपण त्याकडे काही कारणांनी दुर्लक्ष केले असेल तर काही वेळाने आपण इतके अशक्त होतो की आपल्याला झोपून राहावेसे वाटते. काहीही हालचाल करावीशी वाटत नाही. याचे कारण म्हणजे जी काही ऊर्जा शरीरात शिल्लक असते ती महत्त्वाच्या साठ टक्के कामांसाठी वापरली जाण्यासाठी वाचवून ठेवता यावी म्हणून आपल्या हालचाली मंदावतात आणि बाकीच्या अंतर्गत बाबी सुरू राहतात. तसे नाही झाले तर जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रियांमध्ये अडथळा येऊ शकतो.

३. एखाद्या घटकाची कमतरता शरीरात अचानक काही काळापुरती निर्माण झाली तर शरीर आपल्याला तशा सूचना देऊन ती कमतरता आपल्याला पूर्ण करायला प्रवृत्त करते. उदाहरण, मासिक पाळीमध्ये फार रक्तस्त्राव होत असताना शरीरात जर लोहाची कमतरता निर्माण झाली तर महिलेला चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होते. परंतु हीच कमतरता प्रदीर्घ काळासाठी तशीच राहिली किंवा कोणत्याही उपायांनी ती भरून निघत नसेल तर मात्र शरीर त्या कमतरतेचा स्वीकार करून स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, नेहमी हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असणाऱ्या व्यक्तीचे हिमोग्लोबिन अचानक काही कारणांनी कमी झाले तर तिला धाप लागते आणि जाणीव होते की हिमोग्लोबिन कमी झाले आहे. मात्र काही व्यक्ती ज्यांचे हिमोग्लोबिन कायमच सात किंवा आठ असते त्यांना मात्र काहीही विशेष फरक जाणवत नाही. त्यांचे शरीर या कमतरतेचा स्वीकार करून चालत राहते.

Homeostasis हे माणसाला वरदान आहे. थोडक्यात सांगायचे तर शरीर आपला जीव जाऊ नये, आरोग्य बिघडू नये याची काळजी कायम स्वतः घेत असते. म्हणूनच काही सिग्नल ते आपल्याला वेळोवेळी देत असते. आपण म्हणतो ना, त्याला अचानक हार्ट अटॅक आला... असं अचानक काहीही घडत नसते. आपण सिग्नलकडे दुर्लक्ष करतो. जर आपण आपल्या शरीराचे सिग्नल समजून घेऊन त्याप्रमाणे वागलो तर आजारपणे नक्की दूर राहू शकतात.

पण इतर कामांमध्ये इतके व्यग्र झालेल्या आपल्याला शरीराचे सिग्नल वाचण्यासाठी कसा वेळ मिळणार? बरोबर ना?

तुम्ही असं करू नका. कारण तुम्ही सुजाण वाचक आहात. बरोबर ना? चला, आता निरोप घेते. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नव्या विषयासह.

Till then stay healthy be happy

- दीप्ती काबाडे