ऋतुंच्या खुणा

युवा विवेक    02-May-2023   
Total Views |


 
ऋतुंच्या खुणा

 

चढणीचा मुरमाड आपलासा वाटणारा..

तरीही अनोळखी रस्ता चालताना

घोळत आसतात चित्तात

कोवळ्या सूर्यकिरणांच्या तेजाचे शब्द

शब्द प्रवास करत राहतात

मेंदूतून मनात

मनातून ह्दयात

हृदयातून पोटात

पोटातून छातीत

छातीतून श्वासात

श्वासातून उश्वासात

उश्वासातून भवतलात

नि भवतालातून डोळ्यात

डोळ्यातून नजरेत

नि पुनः परतीचा प्रवास

नजरेतून मेंदूत

मेंदूतून....

फिरत राहतात शब्द तसे

चकव्यात अडकत जातो आपण

पावलांखाली येणाऱ्या

पाला पाचोळ्याचा मोह होतो

वैरण भारा पायात येतो

पावला गणिक चुरचुरतात

पानगळतीच्या ऋतूची देहफुले

करकरत राहतात

आयचन काट्यात अडकून पडतात

उभ्याने वाळलेल्या सूर्याच्या काड्यांचे देह..

कुठंतरी पलानीला तग धरून असते घाणेरी. आपल्या खरबरीत पानांना नि जांभळट धामुक्यांना घेउन

ह्या अशा ऋतुंच्या खुणा

रानोमाळ पसरलेल्या आसतात

पिवळट,पांढरट काहीशा मातकट करड्या रंगात

आणि मी त्यांच्यातलीच एक तरीही तटस्थ राहुन साक्षीदार होऊ पहाते या उन्हाच्या सोहळ्याचा..

 

- अमिता पेठे पैठणकर