निकाल...येईल लवकरच !

युवा विवेक    09-May-2023   
Total Views |


निकाल...येईल लवकरच !

हा हा..म्हणता दहावीचा निकाल लागेल नि धांदल सुरू होईल. इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचे निकाल विद्यार्थी आणि पालक दोघांसाठीही एक महत्त्वाचा टप्पा असतो, कारण त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि करिअरच्या मार्गावर होऊ शकतो. दहावीच्या निकालानंतर त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक आणि करिअरच्या ध्येयांना पाठिंबा देण्यासाठी पालक काही गोष्टी करू शकतात. पण सर्वांना माहित असलं तरी पुन्हा सांगावं असं वाटतं.

मुलांचा कल तपासून पुढच्या ध्येय आणि वाटा ठरवाव्यात.

कारण आवडीच्या विषयात शिक्षण मिळणं आणि त्यातच कामंही करायला मिळणं फार महत्त्वाची गोष्ट असते.

स्पर्धा जीवघेणी आहे कळतंय, त्यात विद्यार्थ्यांना टिकून रहायचं आहे, ठावूक आहे; पण म्हणून इतर जग विसरून जाऊन विद्यार्थी किंवा पाल्य जीवघेण्या गर्दीत हरवून तर जाणार नाही ना? याची काळजी घेतली पाहिजे.

नंबरमध्ये अडकून न पडता जे गुण मिळालेत त्यात आपल्याला आवडणारे काय काय उत्तमोत्त करता येईल? हे पाहून शांतपणे वेळ घेऊन निर्णय घ्यावा.

छान मुलांच्या सोबत वेळ घालवावा. आपल्या मुलाचे यश साजरे करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. त्यांनी घेतलेले प्रयत्न ओळखणे आणि त्यांच्या मेहनतीची कबुली देणे महत्त्वाचे असते.

प्रत्येक फुलाची फुलायची वेळ जशी वेगवेगळी असते ना अगदी तशीच प्रत्येक मुलाची पण फुलायची वेळ वेगवेगळी असतेच आणि आपण त्यांना ती वेळ घेऊ द्यायला हवी.

भावनिक आधार खूप गरजेचा असतो, अशावेळी तो आपण दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांबद्दल चिंता किंवा तणाव जाणवणे सामान्य आहे. विशेषत: जर त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे कामगिरी केली नाही. या काळात पालक आपल्या मुलाला भावनिक आधार आणि प्रोत्साहन देऊन फार मोठी भूमिका पार पाडत असतात.

शैक्षणिक आणि करिअरच्या उद्दिष्टाविषयी संभ्रम असेल तर करिअर समुपदेशकांचे मार्गदर्शन नक्कीच घेता येऊ शकते.

-  अमिता पेठे-पैठणकर