गर्दी...

युवा विवेक    13-Jul-2023   
Total Views |

गर्दी...

वेधून घेतले लक्ष तयाने

जो गर्दी सोडून गेला
आपला मार्ग सुखाचा
आपण तयार केला

कुणी चेंगारते गर्दीत
कुणा वाटते दाटी
कुणी म्हणे हतबलतेने
हे का माझ्या वाटी?

मळक्या मार्गी चालताना
तक्रारीचा हक्क नसे
जागा नसे थांबण्यास
प्रवाही वाहणे असे

परि नवी वाट शोधता
हवी तयारी सोसण्याची
लाज नसावी कधी मनात
इतरांना पुसण्याची

चमक स्वप्नांची डोळ्यांत
परि काट्यांची जाणीव
चालता तोल सांभाळावा
सहज यावी शहाणीव

जशी आकांक्षा यशाची
अपयश भान हवे
स्वीकार भावना जपून
मार्गी नवख्या चालावे

'
स्व'तत्वे जपताना
त्याग आपोआप येतो
हे कळते जयाला
तोच मार्ग नवा निवडतो...

- अनीश जोशी.