नागपंचमी - काही नवे अन्वय!

युवा लेख

युवा विवेक    27-Aug-2023   
Total Views |

नागपंचमी - काही नवे अन्वय!

भारतीय सणांच्या आरंभाचा मंगल पर्वकाळ म्हणजे श्रावण! संस्कृती परंपरांच्या सौंदर्यात्मक जागरणाचा श्रावण म्हणजे शंखनाद! श्रावणाची चाहूल लागली की, अर्थातच पहिला सण येतो तो श्रावण शुद्ध पंचमीला - नागपंचमी! आपल्या सण उत्सवांचा थोडा तरी सखोल विचार केला, तरी किती काही हाती लागून जातं! केवळ आपल्यालाच नाही तर संपूर्ण जगाला सांगता यावं असं बरंच पाथेय त्यात दडलेलं आहे.

'नागपंचमी' म्हणजे शब्दशः पंचमीला केली जाणारी नागांची पूजा हे आपण जाणतोच. पण ती का करावी? असा प्रश्न पडतो तेव्हा अर्थातच कुठल्याही भारतीय सणाप्रमाणे त्यामागे आपल्याच पूर्वजांनी बनवलेल्या कल्पित व काही सत्य अशा कितीतरी कथा हाती लागतात. लोक वाड्मयाच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या वाटतात या कथा! एकाच वेळी तो सण साजरा करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, त्यासोबत एक समाजभान देणाऱ्या, वैयक्तिक आणि सामाजिक संस्कार करणाऱ्या आणि आयुष्याचा उत्सव साजरा करणाऱ्या या कथा अनेक अर्थांनी मोलाच्या वाटतात. नागपंचमी मागेही अशाच काही कथा आहेत; पण प्रामुख्याने कालिया नागाचा पराभव करुन श्रीकृष्ण ज्यावेळी नदीतून बाहेर आला तो दिवस म्हणजे नागपंचमी. अशी कथा प्रचलित आहे शिवाय शेतकऱ्याच्या फाळ्यामुळे नागपिल्लांना झालेली इजा आणि मग पश्चात्ताप आणि कृतज्ञता यांची व्यक्तता म्हणून हा दिवस, अशीही कथा आहेच. खरंतर अशा अनेक कथा सांगता येतील; पण या सणाचा विचार करता आणखीही काही महत्त्वाचे पदर उलगडात जातात...

साप किंवा नाग हा खरंतर स्वाभाविक भीतीचा विषय. कुत्र्या-मांजरांविषयी प्रेम वाटावं तसं त्याच्याबद्दल अर्थातच वाटत नाही, वाटणं सामान्यतः शक्यही नाही; पण लोकमानसातील ही भीती दूर करण्यासाठी या सणाचं प्रयोजन असावं का? असाही एक सहज प्रश्न पडतो. नागाला आपला भाऊ मानून बायका त्याची पूजा करतात, दूध लाह्यांचा नैवेद्य अर्पण करतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करता असं वाटतं की, त्याच्याशी नातं जोडून आपलाच भीतीभाव कमी करण्यासाठीची ही सुंदर शैली आहे. सोबत मानव आणि निसर्गातले असे हे भयाण घटक यांच्या साहचर्याची ही एक सुंदर सोय आहे, नाही का? भारतात अगदी वैदिक काळापासून ते रूढी परंपरांतून केल्या गेलेला निसर्गविचार हा जागतिक पातळीवर नक्कीच महत्त्वाचा आणि विशेष आहे. या

नागपूजेतून निसर्गविचार तर व्यक्त होतोच, शिवाय नाग हा दंशकारी असला तरी त्याच्या अस्तित्वाचा मान राखून त्याचा समंजस स्वीकार कुठेतरी या सणातून केला गेला आहे असं वाटतं. परंपरेने जोडलेलं नाग भाऊरायाशी नातं सांगणार एक लोकगीत सरोजिनी बाबर यांच्या संग्रहातून -

'नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी

नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी

नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा

तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा

नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या

तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा

आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा'

निसर्गाशी आणि निसर्गातील विविध घटकांशी नव्याने नातं प्रस्थापित करण्याचा, करत राखण्याचा आपल्या प्रत्येक सणातून केला गेलेला प्रयत्न हा भारतीय पर्यावरण भान स्पष्टपणे व्यक्त करतो. अर्थात, हे नातं प्रेमाचं आणि कृतज्ञतेचंच राहिलेलं आहे हे विशेषत्वाने उल्लेख करण्यासारखं आहे.

नागपंचमीची आणखी एक प्रथा म्हणजे मुलीबाळी या दिवशी आपल्या माहेरी जातात. मोठ्या झाडांना झोके बांधून झोके खेळतात, झिम्मा फुगडी इत्यादी खेळ खेळतात, मेंदी काढतात, माहेरपणाचा गारवा भोगतात. थोडक्यात, मनसोक्त आनंद करतात! ही प्रथा आजही गावाखेड्यांमध्ये प्रचलित असून पाळली जाते. याचा स्त्रीकेंद्री विचार करता सहज असं वाटून जातं की, श्रावणापासून साधारण सगळे महत्त्वाचे सण सुरू होतात. मग अश्विनातल्या दिवाळीपर्यंत सणांची रेलचेल अखंड सुरू असते. हे सण पार पाडताना, त्यातील रूढी परंपरा जपताना अर्थातच घरातील स्त्रीची अधिक दमछाक होते. अर्थात त्यात तिला आनंदही असतोच, पण तरीही पुढे जी धावपळ होणार असते त्यासाठी आधीच आज आपण ज्याला ब्रेक म्हणू त्या ब्रेकची ही सोयच तर नाही ना? असं वाटतं! परंपरेमधील हा स्त्रीकेंद्री विचार खूप महत्त्वाचा आहे. या दृष्टीने विचार केल्यावर असं वाटतं की, भारतीय समाजातील स्त्रीला दिलेला मान किंवा तिच्या आनंदाची करून ठेवलेली सोय याच गोष्टी तेव्हाच्या समाजाचा स्त्री संबंधित दृष्टिकोन अत्यंत स्पष्टपणे मांडतात. त्यादिवशी त्या बाईला आपल्या माहेरी जाता यावं, आनंद करता यावा म्हणूनच तर तवा ठेवायचा नाही, काहीच चिरायचं किंवा कुटायचं नाही, शिवणकाम करायचं नाही, असे नियम अजय असावेत का? कारण या नियमांचं असणं हे त्या बाईला रोजच्या कामांमध्ये न अडकता माहेरी जाण्यासाठी खूप सोयीचं आहे. या नियमांची पारंपरिक कथेतून संगती लावता येतेच; पण अगदी प्रॅक्टिकल अशी संगती याही दृष्टीतून लावता येते. भारतीय समाजात स्त्री बद्दलचा आस्थेवायक दृष्टिकोन नसता तर ही प्रथा केव्हाच बंद पाडली गेली असती. प्रचलित व्हायच्या आधीच ती बंद झाली नाही आणि आत्ता आत्तापर्यंत सर्व दूर भारतभर प्रचलित होती यातून भारतीय समाजातील स्त्रीसंवादी दृष्टिकोन नितळ स्पष्ट आहे.

नागपंचमी या एकाच सणाचा म्हणजे खरंतर गणपती, दिवाळी नवरात्र, यांच्याइतकं महत्त्व नसलेल्या सणाचा विचार केला तरी त्यातील मानसिक, सामाजिक, नैसर्गिक, स्त्रीसंवादी असे कितीतरी विचार आणि मंगलकारक हेतू स्पष्ट होतात. केवळ एक सण एवढ्या आघाड्यांवर समाजाची घडी सुरळीत ठेवतो, आनंदाचं कारण ठरतोच; पण मोकळा श्वासही देतो, हेच भारतीय सणाचं श्रेष्ठत्व आहे. भारत देश 'द ग्रेट' असण्याचा हा केवळ एक लहानसा पण तरीही एक अवीट ठसा उमटवणारा दाखला. परंपरेतून जोपासला गेलेला एक रिफ्रेशिंग झरा म्हणजे नागपंचमी!

- पार्थ जोशी