वयाचे बंधन नाही!

युवा लेख

युवा विवेक    16-Sep-2023   
Total Views |

वयाचे बंधन नाही!

प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात आपला वाढदिवस ही आनंदाची पर्वणी असते. तो सुखाचा दिवस असतो. आप्तेष्ट, स्नेही सारे त्या व्यक्तीला शुभेच्छा देतात, त्याचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस शब्दांतील 'वाढ' या शब्दाचा संबंध वयाशी आहे. वर्षाकाठी आपलं वय वाढत असतं. वय हा शब्द उच्चारला की, त्या पाठोपाठ वयाशी संबंधित अनेक गोष्टींचा लवाजमा उभा राहतोच. विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी घडल्या म्हणजे आयुष्य योग्य मार्गाने चालले आहे, अशी समाजाची एक धारणा असते. लहान वयात निरागसतेला शोभेल असं वर्तन ठेवीत नवनव्या गोष्टी शिकत रहाव्या. थोडे मोठे झालो म्हणजे नोकरी-व्यवसायाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी व ते अभ्यासक्रम शिकावेत. तरुण वयात प्रत्यक्ष नोकरी-व्यवसाय करुन विवाह करावा. यथावकाश मूल व्हावे. पुढे साठीनंतर हळूहळू निवृत्त होऊन ज्येष्ठ नागरिक म्हणून जगावे. कीर्तनास जावे, ईश्वराच्या भजनी आपले ऊर्वरित आयुष्य व्यतित करावे नि बोलावणे आले म्हणजे आनंदाने जावे, अशी विविध वयापरत्वे समाजाची एक धारणा असते..


आज समाज आधुनिकतेचे दाखले देत आहे. परंतु, वयाच्या बाबतीत अमुक गोष्टी घडाव्यात हा आग्रह समाज फारसा सोडताना दिसत नाही. अगदी उदाहरणच सांगायचे झाले तर लग्नासारख्या गोष्टीत समाजात चर्चेचे प्रमाणच राहिलेले नाही. तिशी-पस्तिशीच्या घरात पोहोचलेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला समाज "लग्न केव्हा करणार? किंवा तुझे लग्न का झाले नाही?", असे प्रश्न विचारुन अगदी भांडावून सोडतो. एखाद्या वेळी अशा समाजामुळे तो तरुण किंवा तरुणी डिप्रेशन, आत्महत्या यासारख्या गोष्टीकडे ओढले जातात. परंतु, आधुनिकतेचे दाखले देणारा समाज वयाच्या बाबतीत आधुनिकता दाखवताना दिसत नाही. एखादी व्यक्ती पन्नासाव्या वर्षी विवाह करते, तेव्हा समाज नकारात्मक भूमिका घेतो. तुमचे-माझे पूर्वज तर चौदा-पंधराव्या वर्षी विवाहित होत असत. पुढे बावीस-पंचवीस नि आता तीस-पस्तिशीच्या घरात हे वय पोचले आहे. ही बाब समाजाने मान्य करणे गरजेचे आहे. विवाहाकरिता वयाचे बंधन असावे असा आग्रह समाजाने सोडला पाहिजे असेच माझे म्हणणे नाही. परंतु विवाहाकरिता वयाशी वधू-वरांचा संबंध जोडणे हे मात्र आधुनिकतेला धरुन नाही!

आता दहावीची परीक्षा देखील पन्नासाव्या देणारे लोक आहेतच की अगदी ऐंशी-नव्वद टक्के मिळवून उत्तीर्ण झालेले लोक आपण पाहतो. आजच्या युगात शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बरोबरीनेच कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाचे महत्त्वही वाढत आहे. त्यामुळे, वयाचे बंधन शिक्षणक्षेत्रात ठेऊन उपयोग नाही; कौशल्य हा मुळातच अनौपचारिक शिक्षणाचा भाग आहे. ते आत्मसात केले जात असल्याने त्याला वयाचे बंधन नाही. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रातही वयाचे बंधन ठेवण्यात अर्थ नाही. सत्तरीच्या घरात असलेली व्यक्ती रस्त्यावर उभी राहून पोळी-भाजी विकते. याउलट विशीतला तरुण बेरोजगार असू शकेल. त्यामुळे वयाशी नोकरी-व्यवसायाचा संबंध नसून तो मुळातच कर्तृत्वाशी आहे, हे मान्य केलेच पाहिजे. आधुनिक कवी असोत, फडके व खांडेकर युगातील वेगवेगळे कादंबरीकार असोत किंवा जुने साहित्य असो. साधारण सर्वांनीच प्रेमाचा सन्मान केलाच आहे. कोणत्याही वयात प्रेमाची भावना माणसाच्या मनात उत्पन्न होऊ शकते, असेही कित्येक साहित्यात वर्णिलेले आहे आणि ते योग्यच आहे. प्रेमाचा संबंध वयाशी नाहीच मुळी, तो संबंध आहे शुद्धतेशी, पावित्र्याशी, मनातल्या आपलेपणाच्या भावनेशी. एखाद्या तरुणाला कीर्तनाची आवड असेल, एखाद्या सत्तरीच्या वृद्धास आधुनिक गीते आवडत असतील. म्हणजे ती व्यक्ती देवाची भक्ती करत नाही नि तो तरुण असूनही देवमार्गाला लागला, असे समाजाने बोलून दाखविण्याची गरज नाही. देवाच्या भक्तीला वयाचे बंधन नाही. किंबहुना, भक्तीला कसलेही बंधन नसते.


अमुक वयात अमुक गोष्ट केली तर समाज काय म्हणेल, असा विचार करत राहण्यात अर्थ नाही. आपल्याला हवे ते काम कोणत्याही वयात करावे. त्या-त्या वयात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत, म्हणून नैराश्येत जाऊन आत्महत्येचा आधार घेत ईश्वराने निर्मिलेले सुंदर आयुष्य संपविण्याचा आपल्याला अधिकार नाही. आज आधुनिक जगात सर्व काही करणे शक्य आहे. आपण जे काही करु त्याचा समाजाला चांगला उपयोग होणार असेल, समाजाला आनंद मिळून स्वतःस समाधान प्राप्त होणार असेल, तर अशा कोणत्याही कामास वयाचे बंधन नाही! सिंधुताई सपकाळ यांनी न डगमगता अगदी तरुण वयातच समाजसेवेचा विचार केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत वयावर मात करीत अनेक अनाथांचे ममत्व स्वीकारले. मंगेशकर कुटुंबीय नव्वदीच्या घरातही सूरांची सेवा करीत आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी याही वयात देशाच्या दृष्टीने उत्तम उपक्रम राबवत आहेत. भारताचे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे देखील वयाची साठी ओलांडलेले होते; पण देशसेवेसाठी चांगले प्रयत्न ते त्याही वयात करु शकले. अनेक थोर मंडळी वयाचे बंधन न ठेवता चांगले कार्य करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही चांगल्या आणि मनापासून केलेल्या कामाला वयाचे बंधन नाही!

-
गौरव भिडे