पहिलं प्रेम...

युवा लेख

युवा विवेक    02-Sep-2023   
Total Views |

पहिलं प्रेम...

पहिल्या प्रेमावरची सर्वोत्तम कादंबरी म्हणजे 'पहिले प्रेम'. यात वि.स. खांडेकरांनी शब्दांचं अमृत शिंपल्याचा भास होतो. कादंबरीचं आणि प्रेमाचं नातं अतूट आहे. ‘पहिले प्रेम’ असं म्हटलं म्हणजे कुणाला अर्थ समजणार नाही! मुळात, प्रेम हा माणसाच्या ह्रदयाचा अमूल्य ठेवा आहे. जिथे सुख आणि दु:ख दोघांचं मिलन होतं, ते पहिलं प्रेम... प्रेमाची महती सांगणारी कित्येक काव्ये, कथा, लेख, कादंबऱ्या आपण वाचत आलो आहे; पण पहिलं प्रेम म्हणाल तर त्याचं नातं कादंबरी आणि कविता या साहित्य प्रकारांशी अधिक आहे. खांडेकरांच्या कादंबऱ्यांतलं प्रेम स्वप्नांच्या दुनियेत रमायलाही लावतं आणि तसंच वास्तवातल्या प्रेमाच्या अस्तित्वाला सादही देतं. प्रत्येकाच्याच आयुष्यात पहिलं प्रेम नसलं तरी कुणाचा तरी सहवास नक्कीच हवाहवासा वाटलेला असतोच.

पहिलं प्रेम हे बऱ्याचदा आकर्षणातून निर्माण होत असतं. कुठलाही माणूस वयात यायला लागला म्हणजे आपल्या समवयस्कांशी त्याला संवाद साधावासा वाटतो. मैत्रीच्या नात्याचं घरटं बांधायचं कोवळं वय संपलं की, त्या घरट्यात कुणीतरी हवंहवंसं यावं असं वाटायला लागतं. सहवासाच्या ओढीने माणूस वेगवेगळ्या व्यक्तींच्यात रमू लागतो. त्यातच एखादा मित्र किंवा मैत्रिण अगदी जवळची वाटू लागते. त्या व्यक्तीला मनातलं सगळं सांगावंसं वाटतं... ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते... या सहवासाच्या आभाळातून प्रेमाचा नाजूक वर्षाव होतो... त्या वर्षावात ओल्याचिंब मनाला ऊब देणारी ती व्यक्ती मग क्षणोक्षणी हवीहवीशी वाटायला लागते. जीवन म्हणजे पाणी असा समानार्थी शब्द लिहिण्यापलीकडे जीवनाचा नीटसा अर्थही आपल्याला कळलेला नसतो; पण जीवनसाथी वगैरे शब्दांची ओळख आपल्याला हवीहवीशी वाटू लागते. यात समोरच्या व्यक्तीत आपण रमत जातो. या सगळ्यात त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटतंय हे जाणून घ्यावंसं वाटतं...

हे जाणून घेताना अंगावर शहारे येतात. काही वेळा या शहाऱ्यांना ऊब देणारं घरट्यात हवंहवंसं वाटणारं कुणीतरी होकार देतं तेव्हा काय विचारता! सगळं जग अगदी सौंदर्याची वेगवेगळी रुपं आहेत असंच आपल्याला वाटतं. मनानी भरारी घेतलेली असते; पण जीवनाचा नेमका अर्थ समजत नाही. जीवनाच्या एखाद्या वळणावर गाडी अडते आणि भरारी घेतलेलं मन पुन्हा घरट्यात बिचारं एकटं पडतं. साऱ्या स्वप्नांना गालबोट लागून मनाच्या तळाशी ती स्वप्नं आपलं घर बांधतात. धान्याचे चार दाणे असूनही पक्ष्यांचा सगळा थवा त्याभोवती जमा व्हावा तसं एकाकीपणाच्या गाठीशी आठवणींची गर्दी होते. होकाराची विलक्षण संध्याकाळ आठवताना डोळ्यात आसवांची दाटी होते... सारं सारं पुन्हा घडावंसं वाटतं... काळ जाईल तसं वियोगाचं दु:खं कमी झालं तरी बकुळीच्या फुलासारखं पहिलं प्रेम मनात गंध लेवून असतं; पण माणूस या स्वप्नांच्या नि आठवणींच्या इमल्यात किती दिवस गढून जाणार. झाडालाही पालवी फुटते, पानं नवा आकार घेतात, फांद्या पुन्हा नव्याने हिरव्या होतात..

माणसाचं मन झाडांहून वेगळं नाहीच मुळी! त्यालाही पालवी फुटते. पुन्हा कुणाचा तरी सहवास हवाहवासा वाटतो. घरट्यातल्या उदास मनाला पुन्हा चैतन्याचं वरदान लाभतं. नव्याने प्रेमाचा वर्षाव होतो. हे प्रेमाचं शिंपण जीवनभर होईल ना, असं त्याला वाटायला लागतं. अशावेळी मनाच्या तळाशी गेलेली स्वप्न त्याला आठवतात. तेव्हा पहिलं प्रेम आठवायला लागतं. त्याचं मनातलं अस्तित्व हवंहवंसं वाटतं आणि काहीवेळा नकोनकोसं होतं! इथंच सुखदु:खाचं मिलन होतं. पहिल्या प्रेमात जीवनाशी फारसा संबंध आलेला नसतो; पण आता वास्तवाच्या लहरींवरुन आपली नाव सांभाळताना जीवनाशी हळूहळू संबंध यायला लागतो. पहिल्या प्रेमाची गंमत आता वाटायला लागते; पण तरीही मनात पहिल्या प्रेमाची जागा मात्र निश्चितच असते. जोडीदाराच्या सहवासात आयुष्य सुखावतं; पण तेव्हाच पहिल्या प्रेमाचं मनातलं चित्र नवनवे आकार घेतं आणि आपल्याला त्याची अधिकच गंमत वाटते.

अर्थात, काही जणांना पहिल्या प्रेमाचं वरदान लाभतं. तिथे आनंदाचं रुप विलक्षण दिसतं. सुखाचा पिसारा फुलला की, अगणित रंगांची उधळण होते आणि प्रत्येक श्वास घेताना चैतन्याचा अनुभव येतो; पण हे वरदान लाभलं नाही म्हणून श्वास काही थांबत नाही. फुलं फुलतात, पाऊस पडतो, वारे वाहतात, झरे वाहतात. सारी सृष्टी रोज नव्याने सकाळी जन्म घेते आणि अंधार पडला म्हणजे विराम पावते. माणसाने या सृष्टीशी एकरुप व्हावं... दुस-या प्रेमात मनातली पहिल्या प्रेमाची गंमत अनुभवावी... या लेखाच्या शेवटी वि.स. खांडेकरांनी 'पहिले प्रेम' कादंबरीत लिहिलेली वाक्य अगदी जशीच्या तशी आठवतायत...
"
वादळात दोन होड्यांची योगयोगानं गाठ पडावी, तशी माणसाच्या पहिल्या प्रेमाची स्थिती असते! वादळ संपलं की, त्या होड्या आपापल्या निवाऱ्याच्या जागी जातात. कित्येकदा त्या जागा एकमेकांपासून फार दूर असतात! त्याला कोण काय करणार?"


-
गौरव भिडे