बहुत कनवाळू...

युवा लेख

युवा विवेक    28-Sep-2023   
Total Views |

बहुत कनवाळू...

संतांनी गायला आहे पांडूरंगाचा महिमा, त्यांनी सांगीतलं आहे त्याच्या कृपास्पर्शाचं माहात्म्य. आपल्या रचनांमधून ते सांगतात 'त्या'ची कृपा. तेव्हा कृतार्थ होतो आपण ते वाचून. त्याचा महिमा कितीही ऐकला तरी ओढ असते ती अजून ऐकायची, त्याच्या दर्शनाची, कृपेची. एका अभंगात संत चोखा मेळा म्हणतात,

बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥

पांडुरंगाच्या कृपेचा स्पर्श संतांच्या शब्दांत जणू उमटत जातो. जणू त्याचं रूप शब्दांसह काही प्रमाणात कळत जातं आपल्याला. संतानी विट्ठलाला माऊली म्हंटलं आहे, आई म्हंटलं आहे. त्याचाच प्रत्यय इथे जणू आपल्याला वेगळ्या प्रकारे येतो. संत चोखामेळा म्हणतात की, तो पांडूरंग खूप कनवाळू आहे, खूप दयाळू आहे. तो भाविकांचं, भक्तांचं पालन करणारा आहे. त्याला माऊली म्हंटलं असल्याने त्याच्या कनवाळूपणाची, दयेची विशालता सहज पटू लागते, त्यात आपलेपणाची जाणीव भरुन राहते.

जात वित गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥

त्याला माऊली म्हंटलं असल्याने तो प्रत्येकाला आपला वाटतो. आई ज्याप्रमाणे सगळ्या मुलांना सारखीच वागणूक देते त्याप्रमाणे त्याला सगळे सारखेच असतात. तेव्हा जात, गोत, इ. भेद मुळी उरतच नाही. त्याच्यापाशी असतं ते फक्त प्रेम, दया, भेदभावाला स्थान नसतं. जणू म्हणूनच संत चोखामेळा सांगतात की, त्याच्या पायाला मिठी मारावी. कशी असेल ही मिठी? वाटतं की, प्रत्येकाची मिठी वेगळी असेल. कोणाची असेल भक्तीने, प्रेमाने भरलेली, भारलेली, कोणाची असेल दु:खावर उपाय शोधण्याची इच्छा धरणारी, कोणाच्या मिठीत असेल सुखाचा सूर किंवा आणखी काही वेगळं. मात्र नक्कीच घालावी त्याच्या पायाला मिठी, नक्कीच अनुभवावा त्याच्या कृपेचा स्पर्श... त्याचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. एके ठिकाणी ते म्हणतात,

सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना ॥१॥

ते म्हणतात की, सुखाची सुखराशी पंढरीत आहेत, असं असताना तिथे जायला हवं, तो अनुभव घायला हवा.

न मागतां आभारी आपेंआप होती । भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥

चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरूशने ॥४॥

जणू त्याचं थोरपण सांगत संत चोखामेळा पुढे म्हणतात की, न मागताच तो भक्तांच्या इच्छा जाणतो आणि कौतुकाने तो आपल्या भक्तांच्या इच्छा पुरवतो. आपल्या भक्तांना तो भुक्ती-मुक्ती देतो. तो भक्तांची माऊली असल्यामुळे न मागताच अखंड देत राहतो.

तो पांडूरंग लाघवी आहे. भक्तांवर प्रेम करणारा, त्यांची काळजी घेणारा आहे तो. दर्शनानेच भवभय हारणारा असा तो आहे. दर्शन मात्र आपण नक्कीच घ्यायला हवं...

- अनीश जोशी.