जन्मांतरीचे सुकृत....

जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें । ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।।

युवा विवेक    18-Jan-2024   
Total Views |
 
जन्मांतरीचे सुकृत...
जन्मांतरीचे सुकृत....
 
एखादी गोष्ट आकाशातून हळुवार पाण्याचे थेंब पडावेत तशी सहज होते का ? वरवर कितीही म्हंटलं तरी प्रत्येक कर्मामागे कारण हे असतंच.... एखादी आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली नाही तर आपण सहज म्हणून जातो की तो योग होता, ते नशिबातच होतं.... मात्र तेच एखादी फार चांगली गोष्ट घडली तर आपण ते आपलंच कर्तृत्व समजून मिरवत राहतो मात्र संतांच्या रचना वाचल्या की ही वृत्तीच किती उथळ आहे हे कळून येतं.... संत कान्होपात्रांचं जीवनही काहीसं असंच होतं. त्यांचा जन्म झाला तो शामा नावाच्या श्रीमंत गणिकेच्या पोटी. आपल्या मुलीनेही आपला व्यवसाय करावा ही त्यांची ईच्छा होती मात्र कान्होपात्रांची आस होती ती विठ्ठलाची, विठ्ठलाच्या चरणांची. मात्र अशा परिस्थितीचा दोष त्या पांडुरंगाला देत नाहीत, त्याची ओढ लागली ही त्याचीच कृपा समजतात. एका अभंगात त्या म्हणतात,
जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें ।
ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।।
धन्यभाग आजी डोळिया लाधलें ।
म्हणुनी देखिले विठ्ठलचरण ।। २ ।।
विट्ठलाचे चरण बघणं ही नक्कीच साधी गोष्ट नाही, ते आहे अपरंपार पुण्याने, त्याच्याच कृपेने लाभलेलं दर्शन.... ह्याचाच उल्लेख त्या निरातिशय सुस्पष्टपणे ईथे करतात. अनेक जन्मांची पुण्यायी फुलावी, त्यांतला मध ग्रहण करायला मिळावा, पुण्यायी फळावी, त्याचा अर्क हातावर यावा आणि जे त्याचं फलित असावं, त्याचं माधुर्य असावं ते विट्ठलाच्या, त्याच्या चरणांच्या दर्शनाचं.... काही डोळ्यांना अन्न पाहून सुख वाटतं, काहींना अलंकार बघण्यात, काहींना स्वत:चच रूप बघण्यात धन्यता वाटते मात्र हे खरोखरीच डोळ्यांचंही भाग्य आहे की त्यांना पांडूरंगाचे कमलचरण न्याहाळण्याचं भाग्य लाभलं, हातांचं भाग्य आहे जे विट्ठलचरणांना, साक्षात् देवालाच स्पर्श करु शकतात.... मात्र यासाठी गरजेची असते ती भक्ताच्या अंतरंगात असलेली पराकोटीची तळमळ, तेव्हा कदाचित पुण्य कमी असलं तरी ती तळमळ यायला लावते परमेश्वराला, भक्तांसाठी. एका अभंगात संत कान्होपात्रा विश्वासाने सांगतात, 'विठू दीनांचा दयाळ । वागवी दासाची कळकळ ।।१।।' त्या विठ्ठलाचं वर्णन करतात ते 'विठू दीनांचा दयाळ....' म्हणून, किती समर्पक वर्णन आहे हे, तो आहे दीनांचा दयाळ, त्यांचा स्वत:चा असा हक्काचा आधार, जो दासांची कळकळ जाणतो.... तशी जीवाच्या आकांताने त्याला हाक मारली तर ती कृपाळू माऊली दर्शन देते, दर्शनाचा योग फक्त जुळवून नाही तर घडवून आणते.... तेव्हा जणू जीवाची भाग्यकळी उमलून येते, देहाच्या माध्यमातून घेता येते सार्थकाची अनुभूती, आंतरीक समाधानाचा सुगंध तेव्हा सर्वस्वाला व्यापून उरतो....
धन्य चरण माझे या पंथ चालिले ।
म्हणुनी देखिले विठ्ठल चरण ।।३।।
विठ्ठलाचा पंथ, पंढरीला जाणारा गावा-शहरांमधला, डोंगर-घाटांमधला मार्ग हा कदाचित राजमार्ग नाही पण नक्कीच योगमार्ग आहे, तो भक्तियोगाचा सुपंथ आहे. संसाराची चिंता त्याच्याच चरणी अर्पण करुन, विसरुन, घरादाराचा, उपभोगांच्या साधनांचा त्याग करुन चाललेला संयमाचा मार्ग आहे तो. ती कित्येक शतकांची परंपरा आहे, संतांची तशी सामन्यांचीही, नामाच्या जयघोषाची तशी अभंगांच्या निनादाचीही परंपरा आहे.... अशा या पंथावर आपल्या कंठी नामाचे अलंकार घालून चालायला मिळणं, हे चरणांच्या सार्थकतेचा निर्देश करतंच मात्र त्यामुळेच विठ्ठलाच्या चरणांचं दर्शन घेता आलं ही आपली इंद्रियांची अधीनता नसून त्यांच्याप्रतिचीही कृतज्ञता आहे. या सगळ्यातून जीवाला लाभणारी धन्यता चेहर्यावर उजळून येते हे वेगळं नमूद करायची गरज नाही....
येऊनिया देहासी धन्य झाले ।
म्हणुनि देखिले विठ्ठलचरण ।। ४ ।।
घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे ।
जन्मोजन्मीं देखेन विठ्ठलचरण ।। ५ ।।
माणूस जन्माला येतो तो मूळी काही करण्यासाठी, भरण्यासाठी तसा साधण्यासाठीही.... जन्माला येण्याचा निर्देश 'येऊनिया देहासी' असा ईथे संत कान्होपात्रा करतात, किती सुंदर आहेत या ओळी, जन्माला येऊन धन्य झाले.... जणू या धन्यतेच्या घरावर आधारचं, सर्वस्वाला लाभलेल्या संरक्षणाचं छत चढवलं आहे ते पांडुरंगाच्या दर्शनाने, ह्रदयमंदिरावर चढवलेला पूर्णत्वाचा कळस आहे तो 'त्या'च्या चरणांच्या दर्शनाचा, तसा असाही एक अर्थ घेता येतो की जन्माला येऊन धन्य झाले, अवघ्या जन्माचंच जणू सार्थक झालं ते पांडुरंगाच्या चरणदर्शनाने.... हे सांगून संत कान्होपात्रा मोठ्या कौतुकाने आणि आग्रहानेही पांडुरंगाला सांगतात की तू मला गर्भवास दे अर्थात पुन्हा-पुन्हा जन्म दे. अनेकांची ईच्छा असते ती मुक्ती मिळवण्याची तेव्हा ईथे त्यांचा हा आग्रह पाहून आपण चकित होतो. मात्र विठ्ठलाचे चरण हाच खरा, शाश्वत विसावा असल्याची त्यांची दृढ श्रद्धा ईथे दिसून येते. तेव्हा त्यांची गर्भवासी घालण्याची प्रार्थना पांडुरंगाला विश्वासाने सांगते की प्रत्येक जन्मात मी विठ्ठलचरण पाहीन, वंदिन कारण कदाचित सगुणाची भक्ती दोन्ही बाजूंनी इतकी लोभस आहे, इतकी उत्कट आहे की देवही भक्तांसाठी, त्याच्या बाळांसाठी त्यांच्या प्रेमापायी रूप धारण करत असावा.... शृंगाररसाला लागलेली शांतरसाची तहान, मुक्तिलाही प्रसंगी कमी लेखून सगुणाचा धारलेला ध्यास या अभंगातून अंतरंगात भक्तीची नव्याने रुजवात करुन जातो....
~ अनीश जोशी.