' लय ' भारी...

मुलं संगीत , साहित्य , कला यातून शिकत असतात.. नवनवीन विचार , जीवनाचा अर्थ शोधू पाहतात.. तो त्यांना शोधू दिला तरच जगण्याची लय त्यांना सापडणार आहे.. ही लय म्हणजे अगदी "लय" भारी असेल , यात शंका नाही !

युवा विवेक    27-Jan-2024   
Total Views |
 
' लय ' भारी...
' लय ' भारी...

तेरा आणि चौदा तारखेला 'विवेक' चं नुक्कड आणि बालसाहित्य संमेलन झालं. अतिशय नियोजनबद्ध आणि अबालवृद्धांना आवडेल असंच हे संमेलन पार पडलं. प्रत्येक सत्राच्या शेवटी येणा-या टाळ्या पाहता सर्वांनाच संमेलनातली सर्वच सत्रे नक्की आवडली असणार , यात शंका नाही. ॲम्फी थिएटरमध्ये झालेल्या या संमेलनात वेगवेगळ्या शाळेतील , वेगवेगळ्या शहरातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बालसाहित्य लहान मुलांसाठी असतं. पण प्रत्येक मोठ्या माणसातही एक लहान मूल दडलेलं असतंच की ! या बालसाहित्य संमेलनातल्या सर्वच सत्रांनी त्या दडलेल्या लहान मुलाला साद घातली. त्याला स्वतःच्याही नकळत टाळ्या वाजवून , मोकळेपणाने त्यानं हसून प्रतिसाद दिला. साद आणि प्रतिसादाचं नातं जीवनाला आनंद आणि अर्थ देत असतं.. म्हणून घातलेल्या प्रत्येक सादेला आपण मनापासून प्रतिसाद द्यावा.

लहान मूल म्हणजे निरागसतेचा झरा.. या पाण्याच्या प्रत्येक तरंगातून उडणारे निरागसतेचे तुषार जगातल्या प्रत्येक जीवाला स्पर्शातल्या वात्सल्याची ओळख करून देत असतात. बालसाहित्य संमेलनाला मीना चंदावरकर , आनंद घैसास , डाॅ. माधवी वैद्य , डाॅ. निलिमा गुंडी , पारखी सर अशी दिग्गज मंडळी पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून लाभली. मीना चंदावरकर हे इतकं मोठं व्यक्तिमत्व.. पण समोर हसरी खेळती मुलं दिसल्यावर मीनाताई त्यांच्यात अगदी सहज मिसळल्या.. या मोठ्या लोकांकडून आपण हेच शिकावं. सर्वांच्यात मिसळण्याची वृत्ती , साधेपणा आणि तनामनातल्या ऊर्जेच्या स्रोतातून समाजाला हे लोक आनंद वाटत असतात. संगीताशी आणि पुस्तकांविषयी मुलांच्या मनात ओढ कशी निर्माण करता येईल याचं अतिशय सोप्या सोप्या उदाहरणातून त्यांनी एक चित्रच उभं केलं. इंग्रजी कवितांच्या चालीत बसवलेल्या छोट्याशा मराठी कवितात मुलं अगदी रमली होती. त्यांना त्यामुळे लय सापडली. लहान मुले चौकस असतात. एकदा तुम्ही त्यांना लय शोधायला शिकवलंत की त्या लयीत ती तासन् तास रमतात. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना लय लवकर सापडते. त्यांना काळजी नसते असं नाही. लहान मुलांना अभ्यासाची , परीक्षेची, आईबाबांकडून धम्मक लाडू तर मिळायचा नाही ना अशा एक नि अनेक काळज्या असतात.. पण त्या काळजीचा ती त्रास करुन घेत नाहीत . म्हणूनच त्यांना लय लवकर गवसते. एका लयीतून सगळी मुले चालतात , गातात , हसतात , नाचतात तेव्हा देवाघरच्या नाजूक , नक्षीदार , अमृतगंधी फुलांचा भास होतो. तेव्हा ही लय अधिक भारी वाटते..

शाळेत आणि क्लासमध्ये कंटाळावाणा वाटणारी मुलं 'खगोल ते भूगोल 'या सत्रात आनंद घैसास आणि राजीव तांबे यांच्या गप्पांत रंगून गेली होती. सोप्या भाषेत घैसास सरांनी पाऊस कसा पडतो , पूर्व पश्चिम वगैरे दिशा म्हणजे काय , प्रकाशाचा नेत्रपटलांशी असणारा संबंध साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितला. राजीव तांबे सरांनी मुलांचं इतकं मनोरंजन केलं की आपल्याला असे सर वर्गशिक्षक म्हणून मिळाले तर किती मजा वाटेल असंच मुलांना वाटलं असेल. मुलं आपापल्या परीने एकेक शब्द , वाक्य वेचत असतात.. इवल्याशा मनात त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात... त्या प्रयत्नांना लय हवी असते.. ' ऐकताय ना माझी कविता ' सत्रात मुलांनी केलेल्या कवितातून त्यांच्या अफाट आकलन शक्तीची ओळख झाली. शिक्षण , स्वप्न , क्रिकेट , आईबाबा असे निरनिराळे विषय निवडून गोड गोड पण तेवढ्याच मार्मिक शब्दांतून भाष्य करणा-या कविता केल्या होत्या. लहान मुले किती नि काय काय टिपत असतात.. त्यावर त्यांना व्यक्त व्हायचं असतं.. पण ''गप रे '' , "अभ्यासाला बस " अशा अनेक वाक्यातून ते व्यक्त होणंच दाबून टाकतो. त्यापेक्षा त्यांना व्यक्त होऊ द्यावं.. या व्यक्त होण्यातूनच त्यांना जगण्याची लय सापडून त्यांचं आयुष्य वलयांकित होणार आहे.

'आली सुटी आली ' हे धम्माल बालनाट्य सर्वांनाच आवडलं. त्यातली विशिष्ट लयीत बसवलेली गाणी कानाला आनंद देणारी होती. या मुलांचे आपल्याला पापे घ्यावेसे वाटतात.. त्यांच्यातली निरागसता गोडवा वाढवत असते. कथाकथनाच्या सत्रात डाॅ. निलिमा गुंडी यांनी कथाकथनाचे निरीक्षण केले.. आपल्या भाषणातून त्यांनी विचार , भाषा , तर्कशुद्धता , रंजकता यावर मार्गदर्शन केलं. यात सादर झालेल्या कथा रंजक , वर्णन आणि तात्पर्य अशा होत्या. आवाज , पद्धत , रंजकता यातून मुलं नवनवीन शिकत असतात. नाट्यछटा सादरीकरण सत्राला तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारखी सरांनी सांगितलेले नाट्यछटेचे नियम , इतिहास आणि सादरीकरण हे मुलांनी समजून घेतलं. तेव्हा जाणवलं , मुलं आपापल्या परीने सारं सारं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 'आभाळमाया ' एकांकिकेतून निसर्गासंबंधी भाष्य केलं आहे. पर्यावरणाच्या पुस्तकातून मुलांना जे शिकायचं ते या एकांकिकेतून शिकता येतं.. समारोपाचं भाषण करताना डाॅ. माधवी वैद्य यांनी सांगितलेले विचार पटले. मुलांना खेळू द्या , बागडू द्या , गुणांना प्रोत्साहन द्या , गाणं गाऊ द्या.. हे विचार खूप काही सांगून गेले. खरंच मुलं संगीत , साहित्य , कला यातून शिकत असतात.. नवनवीन विचार , जीवनाचा अर्थ शोधू पाहतात.. तो त्यांना शोधू दिला तरच जगण्याची लय त्यांना सापडणार आहे.. ही लय म्हणजे अगदी 'लय' भारी असेल , यात शंका नाही !

- गौरव भिडे