हृदयी आलिंगीला भक्तराज....

संत नामदेव महाराज आपल्या भेटतात ते त्यांच्या अभंगांमधून, आपल्या कुवतीनुसार समजलेल्या त्यांच्या शब्दांमागच्या निखळ भावातून, आणि विठ्ठलभक्तीच्या अखंड प्रवाही असणार्‍या प्रेमझर्‍यातून.

युवा विवेक    08-Feb-2024   
Total Views |
 
हृदयी आलिंगीला भक्तराज....
हृदयी आलिंगीला भक्तराज....
संत नामदेव महाराज आपल्या भेटतात ते त्यांच्या अभंगांमधून, आपल्या कुवतीनुसार समजलेल्या त्यांच्या शब्दांमागच्या निखळ भावातून, आणि विठ्ठलभक्तीच्या अखंड प्रवाही असणार्‍या प्रेमझर्‍यातून. स्वत:हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा भक्तशिरोमणी म्हणुन सार्थ गौरव केला तर खुद्द पांडुरंगानेही 'हे कृपेचे पोसणे....' म्हणुन जणू नामदेवांसाठी लेकुरवाळ्या मातेची भूमिका घेतलेली दिसून येते. असे हे संत नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात -
सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम ॥१॥
म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव । ब्रह्मादिकां माव न कळे याची ॥२॥
जणू एक चित्रच उभं राहतं डोळ्यांसमोर.... वारकरी नामाच्या, विठ्ठलप्रेमाच्या, कीर्तनाच्या आनंदाची लयलूट करतात ती मुळी गाऊन-नाचून. त्यामधे भान उरतं ते केवळ 'त्या'चं, परमानंदाची अंतरंगात झंकारणारी तार जणू मिटवून टाकते वरवरचे बदलणारे सूर, त्या सावळ्याचा प्रकाश आत खोलवर पडतो आणि त्याहून वेगळं काहीच दिसेनासं होतं, बाहेर तसं आतही. किती धन्य आहे ही अनुभूती, जन्माला लागलेल्या तहानेच्या शमनाच्या यत्नाचा मार्ग.... कदाचित या मार्गावर चालताना वाढत जाते ही अंतरीची सात्विक तहान मात्र शमनाची ग्वाही देणारा 'तो' चालत असतो आपल्यासाठी, आपला होऊन. तेव्हा ते जीवा-शिवातलं अंतर असतं ते मुळी आई- बाळातलं, निखळ पारदर्शी प्रेमाचं, संवादातल्या स्नेहाचं, हक्काच्या गोडव्याचं.... नामदेव महाराज ह्या अभंगात वर्णन करत आहेत ते संतांचं, टाळ्या वाजवून नाम केवळ घेणार्‍या नाही तर गाणार्‍या संतांचं. कदाचित हे त्यांनी पाहिलेलं दृश्य असेल किंवा कदाचित ती संतांची स्थिती आहे, भक्तांची स्थिती आहे, नाम गाणारी, नामात डोलणारी, आनंद तरंगांशी एकावणारी स्थिती. असा हा वैष्णव निधडा आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मेणाहूनही माऊ मात्र प्रसंगी कठीण वज्रासही भेदणारा असा निधडा आहे. जणू परमेश्वराच्या कृपेने नित धन्य होणार्‍या या भक्तांचा हेवा वाटतो तो देवांनाही, ब्रह्मादिकांनाही याची माव कळत नाही....
कैसा ऋणिया केला पंढरीनाथ । आहे सदोदित याचेजवळी ॥३॥
पंढरीनाथाने ह्या संतांना ऋणी करून अखंड त्याच्या जवळ ठेवलं आहे. त्याचा हा सहवासचा मुळी सदोदित आहे, सदा उदयरुप असलेला, उदीत करणारा आहे. या ओळींचा वेगळा अर्थही कदाचित घेता येऊ शकतो. ऋणांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक माणसावर देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण असतात. मात्र इथे माणसावर देवाचे नसून देवावर माणसाचे ऋण आहेत, संतांचे देवावर ऋण आहेत. कदाचित तो त्यांचा अधिकार आहे किंवा हे भक्तीचं सौंदर्य आहे, ऋणांतूनही कृतार्थ करणारं लोभस सौंदर्य....
पूर्वी तो प्रल्हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतामधीं ॥४॥
नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥५॥
इथे संत नामदेव महाराज उल्लेख करतात तो श्रेष्ठ भक्त प्रल्हादाचा, पूर्वी श्रवणी ऐकलेल्या थोर भक्ताचा, ज्याने परमेश्वराच्या नामात हरवून जाण्यात धन्यता मानली, ज्याने देवाचं नाम घेण्यासाठी स्वत:च्या वडिलांचा विरोध स्विकारला, ज्याने प्रसंगी शिक्षाही स्विकारली आणि पुन्हा त्यातूनही परमेश्वराचा प्रेमानुभव नव्याने घेतला असा प्रल्हाद. ज्याच्यासाठी स्वत:हा विष्णुनी अवतार घेतला असा प्रल्हाद.... एका श्रेष्ठ भक्ताने मुक्तपणे केलेला आपल्या आधीच्या श्रेष्ठ भक्ताचा हा गौरव वाटतो मात्र तो तिथेच न थांबता नामदेव महाराजांना संतांमधेही दिसतो, तेव्हा ती तुलना न राहता उपमा होते, त्यांच्या केशराजाच्या निर्मळ, सुगंधित भक्तीची. किती महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट आहे ही. प्रत्येक संतांची स्वत:ची अशी वेगळी भाषा आहे, वेगळा व्यवसाय आहे, वेगळा काळही आहे मात्र नामदेव महाराजांना सगळ्यांमधे तो एक प्रल्हादच दिसतो, कदाचित अभिव्यक्ती वेगळी असली तरी विष्णु तोच आहे, त्याप्रतिचा भाव तोच आहे, भक्ती तीच आहे, अभिजात.... नामदेव महाराज अशा या संतांच्या चरणी नतमस्तक होतात, जणू भक्तीची वाट दाखवणार्‍या ह्या संतांना नमस्कार करत त्यांच्या अंतरी वसणार्या भक्तराजाला, पांडुरंगाला हृदयातून आलिंगन देतात....
~ अनीश जोशी.